भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई.

पार्श्वभूमी : भारतीय सैन्याच्या ४ इन्फन्ट्री ब्रिगेडने नामकाचू नदीवर उभारलेल्या मोर्चावर दिनांक २० ऑक्टोबर १९६२ रोजी पहाटे चिनी सैन्याने सर्व तयारीनिशी हल्ला चढविला. थांगला डोंगरसरींच्या उत्तरेस तिबेट पठाराचा प्रदेश तुलनेने सखल असल्याने चिन्यांनी रस्ते बांधले होते. त्यामार्गे ते तोफखाना हल्ल्याच्या टप्प्यात आणू शकले होते. त्याचबरोबर त्यांच्याजवळ दारूगोळा, अन्नपुरवठा, मोटारगाड्या, खेचरे पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होते. भारतीय सैन्याची नामकाचूवरील मोर्चेबंदी आणि ९ ऑक्टोबर रोजीच्या थांगला डोंगरसरींवरील हालचाली यांमुळे चिनी सैन्याला युद्धाचे निमित्त मिळाले.

मोठ्या संख्येने चिनी सैनिकांनी केलेल्या या पूर्वनियोजित आणि जबरदस्त हल्ल्यापुढे ७ इन्फन्ट्री ब्रिगेडला पराभव पत्करावा लागला. २१ ऑक्टोबर रोजी केवळ ३६ तासांत नामकाचू सर करून त्सांगधार आणि हथुंगला खिंडी यांवर चिन्यांनी ताबा मिळविला. ७ इन्फन्ट्री ब्रिगेडच्या १/९ गोरखा रायफल्स (जी. आर.), २ राजपूत, ९ पंजाब आणि ४ ग्रिनेडियर या पलटणींचे काही जीवंत जवान युद्धबंदी झाले, तर काही शत्रूला चकवून छोट्याछोट्या तुकड्यांत पश्चिमेकडे भूतानमार्गे भारतात गेले. ७ इन्फन्ट्री ब्रिगेडचे सैनिकी अस्तित्व संपुष्टात आले होते.

चिनी सैन्याची योजना : तवांगवर हल्ला करण्यासाठी चिनी फोर्स ४१९ च्या कमांडरने तवांगची सर्व बाजूने कोंडी केली व योजना बनविली. त्यासाठी फोर्स ४१९ च्या १५४, १५५ आणि १५७ या तीन रेजिमेंट (ब्रिगेड) आणि ११ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या तीन रेजिमेंट (३१, ३२ आणि ३३) अशा सहा ब्रिगेड उपलब्ध होत्या. त्यातील सर्वांत पश्चिमेकडे फोर्स ४१९ आपल्या तीन रेजिमेंटसह लुंपू-लुमला-योंगबांग ब्रिज-लुमुचीमार्गे तवांगवर दक्षिणेकडून हल्ला चढविणार होता. त्याच्या पूर्वेस टाकसन गोम्पा-गांगशेन खिंडीमार्गे ३१ रेजिमेंट तवांगवर पश्चिमेकडून आघात करणार होती. त्याच्या पूर्वेला ३१ रेजिमेंटखाली एक बटालियन बुमला-टाँगपेंगला-मिलाटेंगलामार्गे तवांगवर उत्तरेकडून हल्ला करणार होती. त्याच्या पूर्वेला ३२ रेजिमेंट बुमलावरून कोणतीही पायवाट न वापरता तडक येऊन वायव्य दिशेने धाड घालणार होती. सर्वांत पूर्वेकडे ३३ रेजिमेंट जिया आणि मुकडांगला खिंडीमार्गे तवांग-जंग रस्त्यावरील तवांगचू नदीवरील एकमेव पुलाकडे मोर्चा वळवून त्याचा कब्जा करणार होती. यामुळे तवांगहून माघारी येणाऱ्या सर्व भारतीय तुकड्यांचा परतीचा मार्ग गोठणार होता. तवांगमधील हंगामी कमांडरच्या हाताखाली केवळ दोन भारतीय पायदळाच्या बटालियनविरुद्ध चीनचा जवळजवळ अठरा बटालियनचा फौजफाटा उभा ठाकणार होता.

चिनी सैन्याची आगेकूच आणि हल्ले : २१ ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता चिनी सैन्याच्या तिबेट मिलिटरी कमांडने लुंपू काबीज करण्यासाठी विनाविलंब कारवाई चालू ठेवण्याचे आदेश दिले. त्यासाठी चिनी १५७ इन्फन्ट्री रेजिमेंट त्सांगधार ते कारपोलामार्गे लुंपूकडे, तसेच ४१९ फोर्स मुख्यालय व चिनी १५४ इन्फन्ट्री रेजिमेंट हथुंगला-सरखिम-लुंपू आणि झिमीथांगच्या दिशेने आगेकूच करू लागले. २२ ऑक्टोबरला लुंपू आणि झिमीथांग या दोन्ही जागी भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी कडवा प्रतिकार केला; परंतु संध्याकाळपर्यंत ही दोन्ही ठाणी चिन्यांच्या हातात पडली. यापुढील तवांगकडील आगेकूच सुकर करण्यासाठी चिन्यांना बुमला ही महत्त्वाची खिंड काबीज करणे आवश्यक होते. बुमलामधे भारताच्या ५ आसाम रायफल्सची आणि १ शीख पलटणीची प्रत्येकी एक प्लॅटून मोर्चेबंद होती. १ शीखच्या कंपनीचे ठाणे टाँगपेंगलावर होते. बुमलावर हल्ला चढविण्यासाठी चिन्यांच्या ३ रेजिमेंटची एक बटालियन तैनात करण्यात आली. २३ ऑक्टोबरला सकाळी ५ वाजता १ शीखच्या प्लॅटूनवर हल्ला सुरू झाला. आपल्यापेक्षा आठपट जास्त संख्या असलेल्या शत्रूशी शिखांनी शर्थीने लढत दिली. चिन्यांना तीन हल्ले चढवावे लागले आणि कुमक आणावी लागली. या एका प्लॅटूनने चिन्यांना तब्बल २४ तासांचा विलंब केला. शीख प्लॅटूनचे कमांडर सुभेदार जोगिंदरसिंग लढतालढता धारातीर्थी पडले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च वीरसन्मान प्रदान करण्यात आला. १९६२च्या युद्धातील तीन परमवीर विजेत्यांपैकी ते एक होते. टाँगपेंगलावरील शीख कंपनी सुरक्षित माघार घेऊन तवांगला पोचली.

वास्तविक आरंभी तवांग लढविण्याची जबाबदारी ७ इन्फन्ट्री ब्रिगेडला मिळाल्यावर त्यांनी योजनाही बनविली होती. परंतु आतताईपणे त्यांना नामकाचूवर हलविण्यात आल्यावर ब्रिगेडियर दळवी पुढे गेल्यामुळे  ही जबाबदारी ४ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या तोफखान्याचे कमांडर ब्रिगेडियर कल्याणसिंग यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या हाताखाली १ शीख आणि ४ गढवाल रायफल्स या दोन पलटणी आणि एक आर्टिलरी (तोफखाना) रेजिमेंट एवढाच फौजफाटा देण्यात आला. २३ ऑक्टोबरला पहाटे चिनी सैन्याची तवांगच्या दिशेने वरील पाच आघातरेषांमध्ये आगेकूच सुरू झाली. तवांगमधील भारतीय ठाण्यांवर सर्व बाजूंनी हल्ला झाल्यानंतर त्यापुढे त्यांचा टिकाव लागणे अशक्यच होते. २४ ऑक्टोबरपर्यंत तवांग चिन्यांच्या हातात पडले. तवांगचू नदीच्या उत्तरेकडील कामेंग विभागाचे सर्व क्षेत्र चिन्यांच्या हातात आले होते.

चिन्यांनी एकूण सहा रेजिमेंटपैकी चार रेजिमेंट शत्रूच्या मोर्चांना वेढा घालून त्याची कोंडी करण्यासाठी वापरल्या (Outflank). फक्त दोन रेजिमेंट हल्ला चढविण्यासाठी त्यांनी वापरल्या. हा चिन्यांचा विशेष युद्धविजयी डावपेच होता. तो त्यांनी पुढे सेला व बोमार्डवरील लढायांदरम्यानही यशस्वी रीत्या अमलात आणला. तवांगच्या लढाईदरम्यान (२० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर) भारताचे ८३८ सैनिक धारातीर्थी पडले आणि १०६५ युद्धबंदी झाले. चिन्यांचे १५१ सैनिक (१६ अधिकारी, १३५ जवान) ठार झाले, तर ३३४ (३० अधिकारी, ३०४ जवान) जबर जखमी झाले.

संदर्भ :

  • Maxwell, Neville, India’s China War, Dehradun, 2013.
  • Sandhu, P. J. S. 1962 – The Battle of Namka Chu and Fall of Tawang : A View from other Side of The Hill,
    USI Journal, vols. 163
    , April – June 2013.
  • Singh, Amarinder, Lest We Forget, New Delhi, 1999.
  • पित्रे, शशिकान्त, न सांगण्याजोगी गोष्ट : १९६२च्या पराभवाची शोकांतिका, पुणे, २०१५.

समीक्षक – सु. र. देशपांडे

#भारत चीन युद्ध, #१९६२ ची लढाई

प्रतिक्रिया व्यक्त करा