ज्या दोन देशांमधील संघर्षात एक किंवा दोन्ही प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांशी प्रत्यक्ष युद्ध करण्याचे टाळतात; परंतु आपले उद्दिष्ट त्यांना अनुकूल असलेल्या दुसऱ्या संघटनेमार्फत साधण्याचा प्रयत्न करतात, त्याला परभारी युध्द अशी संज्ञा आहे. परभारी युद्धासाठी ‘छुपे युद्ध’ असा शब्दप्रयोग मराठीत बऱ्याचदा केला जातो; परंतु ‘छुपे युद्ध’ ही शब्दावली गनिमी काव्यासाठी वापरणे अधिक संयुक्तिक ठरेल. ‘प्रॉक्सी’ म्हणजे मुखत्यार किंवा दलाल. अशा मुखत्याराला सर्वतोपरी लष्करी साधने पुरवून त्याच्यामार्फत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध संघर्ष करणे, हा परभारी युद्धामागील मुख्य हेतू आहे. थोडक्यात, त्या मुखत्याराच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हे युद्ध आयोजिले जात असल्याने ‘परभारी युद्ध’ हा शब्दप्रयोग ‘प्रॉक्सी वॉर’साठी योग्य ठरेल.

अशा प्रक्रियेत परभारी युद्धाची रणनीती अनुसरणारे एक किंवा दोन्ही देश शस्त्रसंघर्षाच्या सर्व परिमाणांचा अवलंब करतात. आपल्या प्रतिस्पर्ध्याशी असलेल्या दुसऱ्या कोणाच्या तरी संघर्षाचा फायदा घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या राष्ट्रहितांवर किंवा प्रदेशावर प्रहार करणे, हा त्यामागील प्रमुख हेतू असतो. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आणि विशेषेकरून शीतयुद्धाच्या प्रारंभानंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा युद्धप्रकार अधिकाधिक प्रचलित झाला आहे. रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्तींमधील कोणत्याही संघर्षाचे रूपांतर अण्वस्त्रयुद्धात होण्याच्या भीतीमुळे एक कमी जोखमीचा पर्याय या दृष्टिने परभारी युद्धाकडे पाहिले जात आहे. त्याचबरोबर परदेशात युद्ध करण्यात सैन्यदलांना येणारा थकवा आणि त्यासाठी लागणारा अमाप खर्च हे दोन्ही टाळण्यासाठी परभारी युद्ध हा सुलभ मार्ग आहे. सोव्हिएट रशियाच्या अफगाणिस्तानमधील युद्धादरम्यान झालेल्या मुजाहिदीनच्या उत्पत्तीमागे हेच प्रमुख कारण होते. सौदी अरेबिया आणि इराण किंवा इझ्राएल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षामागे हीच भूमिका आढळते. एवढेच नव्हे, तर सिरियामधील नागरी युद्ध आणि इस्लामिक स्टेट (I. S.) चा उदय ही परभारी युद्धाचीच परिणती आहे.

मंदगती संघर्ष (L. I. C.) हे आता दोन राष्ट्रांमधील शत्रुत्वाच्या अभिव्यक्तीचे एक प्रभावी साधन झाले आहे. विशेषतः आकाराने लहान आणि शक्तीने कमजोर अशा राष्ट्रांना आपल्या बलशाली शेजारी राष्ट्रांबरोबर संघर्षाची ज्योत तेवत ठेवून त्यांची शक्ती क्षीण करण्याचे ते एक परिणामकारक माध्यम झाले आहे. त्यासाठी राजकीय, आर्थिक आणि सैनिकी या तिन्ही मार्गांचा अवलंब केला जातो. आपल्या शेजाऱ्याबरोबरचे आपले राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी सैन्यदलांचा उपयोग न करता शेजारी राष्ट्रातील असंतुष्ट घटकांना चिथवून आणि त्यांच्यात फुटीरवादाचे बीजारोपण करून सरकारविरुद्ध उठाव करण्यास त्यांना भरीस पाडायचे आणि यथावकाश त्याचे सुसंबद्ध लढ्यात रूपांतर करावयाचे हा परभारी युद्धाचा आत्मा आहे.

देशामधील प्रत्येक समुदायाच्या तसेच देशांतर्गत प्रांतांच्या काही उत्कट आशा-आकांक्षा असतात. स्वातंत्र्यप्रियता ही त्यातलीच एक. देशांतर्गत काही प्रांतांतील समाजांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये एकरूप होणे कधीकधी कठीण होऊन जाते. त्याची विविध कारणे असू शकतात. उदा., जात किंवा धर्माची भिन्नता, बहुसंख्याकांबद्दल अल्पसंख्याकांना वाटणारी भीती आणि द्वेष, सामाजिक विषमता, राज्यकर्त्यांची अनास्था आणि अपात्रता, शासनातील लाचलुचपतीची परिसीमा इत्यादी. अशा अनेक कारणांमुळे या असंतुष्ट घटकांत देशापासून विभक्त होऊन आपल्यासाठी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची आसक्ती जन्म घेते. असे समुदाय सीमावर्ती भागात असतील, तर ही फुटीरतावादी प्रवृत्ती शेजारी देशांच्या चिथावणीमुळे द्विगुणित होते. विघ्नसंतोषी शेजारी राष्ट्रांना परभारी युद्धासाठी ही मोठी पर्वणीच असते. त्याची पहिली पायरी म्हणजे अशा विघटनवादी वृत्तींना प्रारंभी नैतिक आणि आर्थिक पाठिंबा देऊन त्यांना सरकारविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करायचे आणि त्यांच्यातूनच ह्या बंडाचा पुढाकार करण्यासाठी नेतृत्व निर्माण करावयाचे. एकदा का त्या असंतोषाने पुरेसे मूळ पकडले आणि त्याचे विस्तृत लढ्यात रूपांतर झाले, की त्यांमधूनच तरुण आणि जहालमतवादी घटकांची निवड करून, त्यांना लष्करी वा निमलष्करी प्रशिक्षण देऊन तसेच त्यांना शस्त्रास्त्रांची मदत देऊन त्या लढ्याला हिंसक स्वरूप द्यायचे, ही दुसरी पायरी. अशी संघटना तयार झाल्यावर त्यांकरवी हिंसाचार घडवून आणून प्रसार माध्यमांतर्फे त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी द्यायची. यजमान देशाचे सैन्य या बंडखोरीचा नायनाट करण्यासाठी तैनात झाल्यावर मग हा संघर्ष तेवत राहील आणि सेनेच्या तथाकथित जुलमांविरुद्ध मानवी हक्कांच्या पायमल्लीचा आरोप करत नवनवीन कारणांनी त्याची व्याप्ती वाढत राहील याची खबरदारी घ्यावयाची, ही तिसरी पायरी.

आपल्या सैन्याचा वापर न करता केवळ पंचमस्तंभी हस्तकांकरवी शेजारी राष्ट्राला आपले सैन्य तैनात करण्यासाठी भाग पाडून त्याची सैन्यशक्ती क्षीण करण्याची ही अभिनव क्लृप्ती आहे. पारंपरिक (Conventional) युद्धाचा अवलंब टाळून आणि शत्रूच्या देशातीलच असंतुष्ट घटकांकरवी त्याच्याविरुद्ध संघर्षाचे अभियान पार पाडून आपली राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे, हे परभारी युद्धाचे गमक आहे. अलीकडच्या काळात दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद यांमुळे परभारी युद्धाला एक दुधारी परिमाण प्राप्त झाले आहे आणि त्याची परिणामकारकता अनेक पटींनी वाढली आहे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तानने काश्मीर हस्तगत करण्यासाठी भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रातील मूलतत्त्ववादी घटकांना हाताशी धरून योजलेले परभारी युद्ध. पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेच्या छत्राखाली त्याचा वापर हे त्या परभारी युद्धाचे त्याचे एक विशेष वैशिष्ट्य आहे.

त्यामुळे भारतासारख्या, पाकिस्तानच्या तुलनेने बलवत्तर असलेल्या देशाच्या, राष्ट्राच्या पारंपरिक युद्धशक्तीची कोंडी झाली आहे, हे परभारी युद्धपद्धतीच्या उपयुक्ततेचे यश आहे.

संदर्भ :

  • पित्रे, शशिकान्त, डोमेल ते कारगिल, पुणे, २०००.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा