डिप्टेरा गणातील क्लोरोपिडी कुलात चिलटांच्या १६० प्रजाती असून त्यांतील सु. २,००० जातींचे वर्गीकरण झाले आहे. हा उपद्रवी कीटक जगभर आढळतो. चिलटांच्या हिप्पेलेट्स व सायपंक्युला या प्रजातींतील कीटकांना आयफ्लाय किंवा आयनॅट म्हणतात. माणूस आणि पाळीव प्राण्यांभोवती चिलटे आढळतात. सायपंक्युला फ्युनिकोला ही जाती भारतात तसेच दक्षिण आशियात आढळते.
चिलटे आकाराने लहान असतात. शरीराची लांबी १.०-१.६ मिमी. असते. रंग काळा चमकदार असतो. शरीरावर कोणत्याही प्रकारचे केस नसल्याने ते चमकतात. शरीर घरमाशीप्रमाणे असून ते डोके, वक्ष आणि उदर या तीन भागांनी बनलेले असते. मुखांगे द्रव पदार्थ शोषून घेता येतील अशी असतात. चिलटाचे जीवनचक्र २१ दिवसांचे असते. जीवनचक्रात अंडे, अळी, कोश आणि प्रौढावस्था असे चार टप्पे असतात.
बहुतेक चिलटांच्या अळ्या वनस्पतिभक्षक आहेत. गवतावर त्या पोसतात. काही जाती परभक्षी व परजीवी आहेत. थोडया जाती दुसऱ्या प्राण्यांनी पकडलेल्या भक्ष्यावर किंवा मिळविलेल्या अन्नावर जगणाऱ्या आहेत. जनावरांच्या व मानवी डोळ्यांमधील अश्रू हे या कीटकांचे अन्न. या चिलटांमुळे डोळ्यांचे जीवाणुजन्य आणि विषाणुजन्य विकार संक्रमित होतात. चिलटे माणसाचे डोळे, कान, नाक व तोंड यांभोवती दिवसा घोंघावून हैराण करतात. डोळे येण्याच्या साथीचे ते वाहक आहेत. चिलटांमुळे उघडया जखमा दूषित होतात. टांगलेल्या दोऱ्या, झाडाच्या वाळलेल्या फांदया व निरोधक तारा यांवर चिलटे विश्रांती घेतात. विश्रांतिकाळात त्यांवर विष्ठा सोडतात. निऑन साइन्स, विजेचे बल्ब व टयूब्ज यांकडे ती आकर्षित होतात. घरात तेलकट कागद किंवा शेराची फांदी टांगून ठेवल्यास चिलटांचा त्रास कमी होतो. कीटकनाशकाचा फवारा मारून चिलटांचा नाश करतात. त्यांचा त्रास टाळण्यासाठी डासांना पळवून लावणारी धावने (क्रीमे) वापरतात.