बुरगुंड हा मध्यम आकाराचा वृक्ष बोरॅजिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॉर्डिया वॉलिचाय आहे. हा वृक्ष कॉर्डिया ऑब्लिका या शास्त्रीय नावानेही ओळखला जातो. भोकर व शेंदरी भोकर या वनस्पतीही बोरॅजिनेसी कुलातील आहेत. भारतात बुरगुंडाच्या कॉर्डिया प्रजातीमध्ये सु. १४ जाती आढळतात. बुरगुंड वृक्षाला ‘मोठी भोकर’ असेही म्हणतात. त्याचा प्रसार भारतात गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र अशा पश्‍चिम भागातील पानझडी वनांत झालेला आहे.

बुरगुंड (कॉर्डिया वॉलिचाय): पाने आणि फळे यांसह फांदी

बुरगुंड वृक्ष सु. १० मी. उंच वाढतो. खोडाची साल काळसर व खडबडीत असते. हिवाळ्यात पानगळ होते; परंतु पाणी उपलब्ध झाल्यास पानगळ कमी होते. पाने साधी, एकाआड एक, १०–१५ सेंमी. लांब व अंडाकृती किंवा लंबगोलाकार असतात. पानांची वरची बाजू हिरवी असते, तर खालची बाजू पांढरट करडी दिसते, कारण खालच्या बाजूला तारकाकृती केसांची लव असते. फुलोरे ५–१० सेंमी. लांब असून शेंड्याकडे किंवा पानांच्या बगलेत येतात. फुले लहान, पिवळट पांढरी, पंचभागी व नियमित आकाराची असतात. कच्ची फळे लंबगोलाकार व हिरवट असून पिकल्यावर ती लालभडक होतात. फळांत चिकट गर असून १–४ बिया असतात.

बुरगुंडाचे लाकूड भोकराच्या लाकडासारखे मजबूत असून बांधकामासाठी उपयुक्त असते. फळे खाद्य असून कच्च्या फळांची भाजी करतात. फळे शामक, कफोत्सारक आणि स्तंभक असून श्‍वासनलिका विकार व मूत्रमार्गातील दाह यांवर उपयुक्त असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा