सजीव सृष्टीचे वर्गीकरण आजपर्यंत अनेक पद्धतींनी करण्यात आले आहे. गेल्या शतकाच्या प्रारंभी हे वर्गीकरण एकपेशीय व बहुपेशीय, वनस्पती व प्राणी असे करताना एकपेशीय सजीवामध्ये हरीतलवके व कशाभिका दोन्ही असतील तर त्यांचा समावेश कोणत्या वर्गात करायचा असा प्रश्न उद्भवू लागला. त्यामुळे १९६९ मध्ये रॉबर्ट एच्. व्हिटाकर (Robert Harding Whittaker) यांनी वर्गीकरण विज्ञानाची सुरुवात केलेल्या कॅरॉलस लिनियस (Carolus Linnaeus) यांच्या प्राथमिक वर्गीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी जनुकीय विश्लेषणावर  आधारलेली पद्धत रूढ केली. या पद्धतीस ‘पंचसृष्टी वर्गीकरण’ असे म्हणतात. त्यानुसार सजीवांचे मोनेरा (Bacteria), प्रोटिस्टा (आदिजीव), कवके (Fungi), वनस्पती (Plantae), प्राणी (Animalia) अशा पाच सृष्टीमध्ये वर्गीकरण करण्यात आले.

पंचसृष्टी वर्गीकरण

मोनेरा सृष्टी : यातील सजीवांचे शरीर एकाच अकेंद्रकी पेशींनी बनलेले आहे. पेशीमध्ये आभासी केंद्रक असून याभोवती केंद्रकावरण नसते. पेशीआवरण प्रथिन व ग्लायकोप्रथिन मिश्रणाने (Glycoprotein) बनलेले असते. प्रजनन अलैंगिक (Asexual) असून द्विखंडन (Binary fission) पद्धतीने होते. आर्किया (Archaea) व जीवाणू (Bacteria) ही मोनेरा सृष्टीची उदाहरणे आहेत. मोनेरा सृष्टीतील सजीव पृथ्वीवर सर्वत्र म्हणजे सागरी पाणी, गोडे पाणी, मचूळ पाणी, लवण खाणी, माती, चिखल अशा विविध ठिकाणी आढळतात. एक ग्रॅम मातीमध्ये सुमारे ४ कोटी जीवाणू असतात. तर मानवी शरीरातील जीवाणूंची संख्या मानवी शरीरातील पेशीहून अधिक असते. सन २०१८ पर्यंत मोनेरा सृष्टीतील  ४,०००—१०,००० जातींचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

प्रोटिस्टा सृष्टी : यातील सजीव एकपेशीय किंवा बहुपेशीय असून पेशी केंद्रक असते. प्रजनन अलैंगिक किंवा लैंगिक पद्धतीने होते. प्लाझ्मोडियम, अमीबा व युग्लीना ही प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांची काही उदाहरणे आहेत. प्रोटिस्टा सृष्टीत समावेश केलेला एक मोठा गट प्रोटोझोआ असून या सजीवांचे पेशीआवरण प्राणी पेशीप्रमाणे असते, तर दुसरा गट वनस्पती पेशीप्रमाणे असून त्यामध्ये हरित लवके असतात. डायाटम (करंडक सजीव) हा सूक्ष्म, एकपेशीय व हरितलवके असणारा सजीव असून याचे पेशीआवरण सिलिकायुक्त असते. सन २०१८ पर्यंत प्रोटिस्टा सृष्टीतील सुमारे ८०,००० जातींचे वर्गीकरण करण्यात आले.

कवक सृष्टी : यातील सजीव क्वचित एकपेशीय व मुख्यत्वे बहुपेशीय असतात. अळिंबे व बुरशी (Mushroom and Molds) ही बहुपेशीय कवकाची उदाहरणे आहेत. परंतु, किण्व (Yeast) हे एकपेशीय कवक आहे. सर्व कवक सृष्टीतील सजीवांच्या पेशीभित्तिका कायटिक द्रव्याने बनलेल्या असतात. या सजीवांना स्वत: हालचाल करता येत नाही. यातील सजीव कवकतंतूंच्या साहाय्याने अन्न मिळवतात. त्यांना पोषणासाठी कार्बन व नायट्रोजन संयुगे आवश्यक असतात. अन्न साखळीत विघटक व परजीवी कवकांचे स्थान आहे. हे सजीव ग्लायकोजेनच्या स्वरूपात कार्बन साठवून ठेवतात. वनस्पतीप्रमाणे कवक पेशीमध्ये स्टार्च तयार होत नाही. प्रजनन लैंगिक व अलैंगिक पद्धतीने  बीजाणूपासून (Spore formation) होते. पेनिसिलियम या कवकापासून पेनीसीलीन हे प्रभावी प्रतिजैविक बनवण्यात आले आहे. २०१८ सालापर्यंत कवक सृष्टीतील ७०,०००—७२,००० जातींचे वर्गीकरण करण्यात आले आहे .

वनस्पती सृष्टी : यातील सजीव (Plantae) बहुपेशीय केंद्रकी पेशीयुक्त आहेत. त्यांच्या पेशीभित्तिकेमध्ये सेल्युलोज असते. पेशींचे रूपांतर विविध वनस्पती पेशींमध्ये होऊन वनस्पतीतील ऊती बनतात. वनस्पती पेशीमध्ये हरीतलवके असतात. हरितलवके हालचाल करीत नाहीत. पेशीमध्ये अवर्णलवके व वर्णलवकेही असतात. हरितलवकांच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे अन्न निर्मिती होते. वनस्पती स्वयंपोषी सजीव असून स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. वनस्पतींचे प्रजनन लैंगिक व अलैंगिक पद्धतीने होते. उदा., शैवाळे, नेचे, शंकूधारी व सपुष्प वनस्पती. सन २०१८ पर्यंत सुमारे २,७०,००० वनस्पती जातींचे वर्गीकरण झाले आहे.

प्राणी सृष्टी : यातील सजीव बहुपेशीय केंद्रकी पेशीयुक्त असतात. त्यांची पेशीरचना बहुतांशी वनस्पती पेशीप्रमाणे असते. पेशीआवरण सेल्युलोज विरहित असते. प्राणी पेशीमध्ये बदल होऊन स्नायू पेशी तयार झाल्या आहेत. त्यांचा हालचालीसाठी वापर होतो. प्राणी सृष्टीतील सजीव परपोषी असून स्वत:चे अन्न तयार करू शकत नाहीत. हे सजीव ऊर्जेसाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात. प्राणी सृष्टी पेशीमध्ये हरीतलवके नसतात. सन २०१८ पर्यंत प्राणी सृष्टीतील १३,२६,२३९—१५,००,००० जातींचे वर्गीकरण झाले आहे. उदा., स्पंज वर्गीय प्राणी, कीटक, संधीपाद, कृमी, मासे, उभयचर, सरीसृप, पक्षी, स्तनी वर्ग इत्यादी.

पहा : कवक सृष्टी, तीन अधिक्षेत्र वर्गीकरण, प्राणी सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, मोनेरा, वनस्पती सृष्टी, सजीव वर्गीकरण.

संदर्भ :

  • www.biologydiscussion.com/biology/kingdom-classification-of…organism/5542
  • https://www.ruf.rice.edu/~bioslabs/studies/invertebrates/kingdoms.html
  • http://tolweb.org/tree/ Tree of life web Project Internationally accepted website for classification

  समीक्षक : मोहन मद्वाण्णा