सजीव वर्गीकरणामध्ये समान रचनेच्या सजीवांना एका वर्गात समाविष्ट केले आहे. हे वर्ग म्हणजे वर्गीकरण विज्ञानानुसार सजीवांचे  वर्ग, संघ, कुल, सृष्टी, गण अशा पद्धतीने केलेले विशिष्ट गट होय.

जीवविज्ञानात वर्गीकरण व्यवस्थेला इंग्रजीमध्ये टॅक्सॉनॉमी म्हणतात. यातील टॅक्सॉन म्हणजे व्यवस्था आणि नोमिया म्हणजे पद्धत. सजीवांचे वर्गीकरण करण्याचा प्रारंभ झाला तेव्हा समान बाह्य लक्षणांवरून सजीवांचे वर्गीकरण करण्यात आले. समान लक्षणे असलेल्या सजीवांना एका गटात घालण्यात आले. अधिक समान लक्षणे असलेल्या गटांचे स्थान निश्चित केल्याने वर्गीकरण अधिक सुलभ झाले. आपल्या नेहमीच्या आयुष्यात सुद्धा आपण लक्षणांवरून वर्गीकरण करीत असतो. उदा., फळे, पाने, फूले, कडधान्ये, जनावरे, पक्षी, मासे, कीटक असे वर्गीकरण विज्ञानाचे फारसे ज्ञान नसलेल्या सामान्य व्यक्तीस सुद्धा करता येते.

सजीव वर्गीकरण (उतरत्या क्रमाने)

यानुसार वर्गीकरण करताना सजीवांचे स्थान निश्चित केलेले आहे. हे स्थान एका विशिष्ट श्रेणीप्रमाणे करण्यात आले आहे. श्रेणी म्हणजे सर्वोच्च ते सर्वांत कनिष्ठ अशा क्रमाने केलेली स्थान निश्चिती होय. सजीवांमधील सर्वांत वरिष्ठ श्रेणी अधिक्षेत्र (Domain) ही आहे. त्यानंतर उतरत्या क्रमाने सृष्टी (Kingdom), संघ (Phylum), वर्ग (Class), गण (Order), कुल (Family), प्रजाती (Genera) आणि जाती (Species) अशा श्रेणीनुसार प्राणी वर्गीकरण करण्यात येते. याच उतरत्या क्रमाने वनस्पतींचे वर्गीकरण करतात. सध्या प्रचलित असलेल्या वर्गीकरण पद्धतीस द्विनाम वर्गीकरण म्हणतात. या पद्धतीचा प्रारंभ स्वीडिश वनस्पती वैज्ञानिक कार्ल लिनियस यांनी केली. सजीवांच्या या वर्गीकरण पद्धतीस ‘लिनियन टॅक्सॉनॉमी’ असे म्हणतात. यातूनच पुढे वंशेतिहास, शाखा इतिहास (फायलोजेनेटिक्स; Phylogenetics), (क्लॅडिस्टिक्स; Cladistics) आणि उत्क्रांती संबंध ; वर्गीकरण विज्ञान (सिस्टेमॅटिक्स;  Systematics) अशा वर्गीकरण विषयक शाखा तयार झाल्या.

वरील श्रेणी रचना थोडी लवचिक आहे. कधी कधी पूर्वापार पद्धतीने केलेल्या वर्गीकरणात नव्या माहितीची भर पडली म्हणजे एका कुलातून दुसऱ्या कुलात सजीवांचे वर्गीकरण केले जाते. उदा., खुरी गणात खूर असलेल्या आठशेहून अधिक सस्तन प्राण्यांचा समावेश केला आहे. गेंडा, हरीण, घोडा, डुक्कर हे खूर असलेले प्राणी असून यांचे पुढील वर्गीकरण खुरांच्या संख्येवरून करण्यात आले . त्यामुळे समखुरी व असमखुरी असे दोन उपगण केले गेले. गेल्या पन्नास वर्षांत डॉल्फिन, सुळे असलेले व्हेल यांचे खूर उत्क्रांतीमध्ये नाहीसे होऊन त्याचा वल्ह्यासारख्या अवयवात रूपांतर झाल्याचा पुरावा मिळाला आहे. पूर्वी खूर असलेल्या प्राण्यांचा समावेश खुरी गणात करण्यात आला. परंतु, त्यांना असलेले खूर बाहेरून दिसत नसल्याने या प्राण्यांना सुप्तखुरी उपगणामध्ये स्थान देण्यात आले. त्याचबरोबर खुरी गणाऐवजी खुरी अधिगण (गणाहून अधिक वरचे स्थान) म्हणण्यात आले. अर्थात असा वर्गीकरणातील निर्णय तज्ञांच्या मंडळावर अवलंबून असतो.

वर्ग व्यवस्थेच्या संबंधी विशिष्ट नियम नाहीत. परंतु, एखाद्या जातीचे नाव ठरवण्याबद्दल अधिकुलापासून उपजातीपर्यंत आंतरराष्ट्रीय प्राणिनामकरण हे इंटरनॅशनल कोड ऑफ झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर (ICZN Code) या संस्थेमार्फत केले जाते. शैवाले, कवके व वनस्पती यांचे नामकरण आंतरराष्ट्रीय नियमांनुसार इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर फॉर अल्गी, फंजाय अँड प्लँट्स (ICN) या संस्थेमार्फत होते.

या नामकरणासाठी काही मुख्य बाबी पाहिल्या जातात. दिलेले नाव लॅटिन भाषेतील सव्वीस अक्षरांमधून दिले गेले पाहिजे. ते नव्या जातीसाठी द्विनाम पद्धतीचे व प्रजातीपासून अधिक वरच्या श्रेणीत एका नावाने दर्शवले पाहिजे. शास्त्रीय नावानंतर ज्या व्यक्तीने हे नाव सुचवले त्याचे नाव द्विनाम नावानंतर देण्याची पद्धत आहे. उदा., Elephas maximus Linnaeus, 1758. या नावातील एलिफस मॅक्झिमस म्हणजे भारतीय हत्ती. लिनियस यांनी हे नाव १७५८ मध्ये प्रचलित केले. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार लिनियस ऐवजी  L. असे लघुरूप दिले तरी चालते.

पहा : तीन अधिक्षेत्र वर्गीकरण, पंच सृष्टी वर्गीकरण.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Taxonomy_(biology)
  • https://en.wikipedia.org/wiki/Tree_of_Life_Web_Project
  •  http://tolweb.org/tree/

                                                                                                            समीक्षक : मोहन मद्वाण्णा