(हर्बेरियम). शास्त्रीय अभ्यासाकरिता जतन करून ठेवण्यात येणारा वनस्पतींचा संग्रह. वनस्पतिसंग्रह तयार करण्यासाठी निसर्गातून वनस्पतींचे नमुने जमा केले जातात. या नमुन्यांची ओळख वनस्पतितज्ज्ञांकडून पटवली जाते. जमा केलेल्या नमुन्यांवर खालून-वरून दाब देतात आणि त्यातील आर्द्रता शोषून घेतात. नंतर एका जाड टीपकागदावर वनस्पतीचे सर्व शारीरिक गुणधर्म सहज दृष्टीला पडतील अशा रीतीने नमुन्यांची काळजी घेऊन त्याला आरोहित करतात. संदर्भासाठी तत्काळ उपलब्ध होण्यासाठी अशा आरोहित वनस्पतीची ओळख, त्याचे शास्त्रीय नाव, कोणी जमा केली, ती कोठून गोळा केली, वनस्पती लागवडीची माहीत असलेली पद्धत, कुल व प्रजाती आणि इतर माहिती यांनुसार एका नस्तीमध्ये जतन करून ठेवतात. या प्रक्रियेला वनस्पतिसंग्रह तयार करण्याची प्रक्रिया म्हणता येईल.

वनस्पतींचे अशा प्रकारचे संग्रह शक्यतो वनस्पती उद्यान, निसर्ग-इतिहास संग्रहालय आणि विद्यापीठांच्या वनस्पती विभागांमध्ये ठेवले जातात. यूरोपातील वनस्पती संग्रहालये फार मोठी असून तेथे वनस्पतींचे लाखो नमुने संग्रहित केलेले आहेत. यातील काही नमुने शतकानुशतके जुने आहेत. उदा., इंग्लंडमधील ब्रिटीश म्यूझीयम (लंडन) आणि रॉयल बोटॅनिकल गार्डन (क्यू). भारतातील सर्वांत मोठा व जुना वनस्पतिसंग्रह आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बोटॅनिकल गार्डन (सेंट्रल नॅशनल हर्बेरियम, कोलकाता) येथे आहे (पहा: वनस्पती उद्यान). वनस्पतिसंग्रह हा एक प्रकारे वनस्पतींच्या नमुन्यांचा कोश असून तुलनात्मक अभ्यासासाठी महत्त्वाचा दुवा असतो. वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या क्षेत्रात वनस्पतिसंग्रह मोलाची भूमिका बजावतात आणि ते तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी प्रत्येक वनस्पतीच्या नमुन्यावर तिची संपूर्ण माहिती, तसेच स्थानिक, शास्त्रीय/वैज्ञानिक आणि लॅटिन नावे लिहितात. त्यामुळे नव्याने सापडलेल्या वनस्पतींची ओळख पटवताना वाद कमी होतात. वनस्पतिसंग्रह हा प्रामुख्याने संदर्भग्रंथ म्हणूनच वापरला जातो. त्यामुळे नवीन मिळविलेल्या वनस्पतींचे, नवीन जातींचे योग्य नामकरण आणि ओळख पटवणे सुलभ होते. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था, वनसंशोधन संस्था तसेच इतर मोठ्या संस्थांमधील वनस्पतिसंग्रहालये आधुनिक व अद्ययावत करण्यात येत आहेत.

अंकीयीकरण केलेला वनस्पतिसंग्रह : (१) वर्षावृक्ष, (२) संकेश्वर.

वनस्पती वर्गीकरणाखेरीज वनस्पतिसंग्रह परिसर विज्ञान, वनस्पती शरीरक्रियाविज्ञान, संवर्धन जीवविज्ञान, जीवभूगोलशास्त्र, वनस्पती वंशविज्ञान (एथ्‌नोबॉटनी) आणि जीवाश्म वनस्पतिविज्ञान या क्षेत्रांसाठीही उपयोगी आहेत. वनस्पतिसंग्रहातील माहितीनुसार वनस्पतीची स्थिती, तिची उपलब्धता, ती विपुल प्रमाणात आहे की संकटग्रस्त आहे, इ. समजते. वनस्पती जेथून जमा केलेली आहे त्या स्थानावरून जमा करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास आणि मार्ग यांचाही अंदाज येतो. शुष्क वनस्पतिसंग्रहातील वनस्पतीनमुना हा त्या वनस्पतीच्या डीएनएचा स्रोत असतो. परंतु विश्लेषणासाठी दर वेळी त्या नमुन्यातील लहानसा तुकडा कापून घेतल्यास काही कालावधीत तो वनस्पती-नमुना संपुष्टात येऊ शकतो किंवा वनस्पती-नमुना विदीर्ण होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून आता वनस्पतिसंग्रहालयांमध्ये अविनाशी पद्धतीने नमुन्यांचे विश्लेषण करून, डीएनए क्रम माहीत करून त्या वनस्पतीसंबंधी संशोधन केले जाते.

वनस्पतिसंग्रहालयातील वनस्पतींच्या फुलांच्या परागकणामधील डीएनएच्या विश्लेषणामधून नवीन नमुन्यांची ओळख पटवता येते. अनेक वनस्पतिसंग्रहालयात आता अंकीयीकरण (डिजिटलायझेशन) पद्धतीचा वापर केला जातो. त्याद्वारे अभ्यासक व संशोधक यांनी वनस्पतीचा नमुना प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय अंकीय (डिजीटल) चित्रांवरून माहिती मिळू शकते. अंकीयीकरण करताना वनस्पती नमुन्याची विदा (डाटा) व चित्र अंकीय स्वरूपात साठवले जाते आणि ते चित्र व माहिती अभ्यासकाला हाताळता येते. काही वेळा क्रमवीक्षक (स्कॅनिंग) प्रकाराने देखील अंकीयीकरण केले जाते. या पद्धतीने अंकीयीकरण केलेला वनस्पतीचा नमुना इतका स्पष्ट दिसतो की, पाहणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष नमुना पाहतोय असा भास होतो. अशा पद्धतीमुळे वनस्पतींचे नमुने प्रत्यक्ष रीत्या हाताळले जात नसल्याने दीर्घकाळ टिकतात.

कुलकर्णी, किशोर