रक्तचंदन वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस सँटॅलीनस आहे. दक्षिण भारताच्या पूर्व घाटातील परिसरात हा वृक्ष आढळून येतो. श्रीलंका ते फिलिपीन्स या देशांच्या दरम्यान असलेल्या देशांमध्येही तो दिसून येतो. रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो.

रक्तचंदन वृक्ष सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत सु. ५ मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खोड सरळ वाढत असून साल खडबडीत असते. पाने संयुक्त व लहान असून त्याच्या लहान संयुक्त पानाला बहुधा तीन एकाआड एक दले असतात. प्रत्येक दल ३–९ सेंमी. लांब असते. फुलोऱ्यात फुले थोडी असून ती पिवळी आणि लहान असतात. निदलपुंज पाच, संयुक्त व हिरव्या दलांनी बनलेला असून दलपुंजात पाच मुक्त असमान गुलाबी पाकळ्या असतात. पुमंगात १० पुंकेसर असून त्यांपैकी नऊ संयुक्त व एक मुक्त असते. जायांग ऊर्ध्वस्थ असून त्यात एकच अंडपी असते. परागण कीटकांमार्फत होते. शेंग लहान, चपटी, गोलसर व पंखयुक्त असते. पिकल्यावर ती फुटते. बिया लहान व शेंदरी असतात.
रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे. लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. तसेच त्याला सहजासहजी वाळवी लागत नाही. लाकूड सहाणेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाह कमी करण्यासाठी लावतात. पानांचा रस कृमिनाशक व सूक्ष्मजीवरोधी आहे. जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते. त्याचा उपयोग औषधांना रंग येण्यासाठी आणि लाकूड, रेशीम व चामडे रंगविण्यासाठी करतात. खोडाच्या मध्यभागातील लाकडापासून बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवांच्या मूर्ती, बुद्धिबळाच्या सोंगट्या व फर्निचर अशा विविध वस्तू तयार करतात. रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तो तोडण्यावर बंदी घातली आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
राजा ढेपे सर, अतिशय उपयुक्त माहिती. सुटसुटीत व सोपी भाषा शैली. विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी व दाखविण्यासाठी उत्तम संग्रह…