एक अपृष्ठवंशी बाह्यपरजीवी प्राणी. जळूचा समावेश ॲनेलिडा (वलयांकित) संघाच्या हिरुडिनिया वर्गात करण्यात येतो. जगभर यांच्या सु.३०० जाती आहेत. शरीराची लांबी १ ते २० सेंमी. असते आणि ताणल्यावर लांबी वाढते. शरीराच्या अग्र टोकाला एक लहान चूषक असून यात तोंड असते; पश्च टोकाला मोठे चूषक असते. सर्व जळवांच्या शरीरात ३३ खंड असतात. प्रामुख्याने त्या गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर राहणाऱ्या असून तळी, डबकी, तलाव, दलदलीच्या जागी अथवा संथ वाहणाऱ्या पाण्यात असतात. काही जळवा मासे, बेडूक, गायी-म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर जगतात, काही कुजलेल्या पदार्थांवर जगतात तर काही परजीवी असतात. काही जळवा समुद्रात तसेच जमिनीवरील दमट जागी राहतात.
जळू (हिरुडिनेरिया ग्रॅनुलेसा)

भारतात आढळणाऱ्या जळूचे शास्त्रीय नाव हिरुडिनेरिया ग्रॅनुलेसा आहे. भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगला देश इत्यादी देशांमध्ये ही जळू आढळते. ही जळू १०—१५ सेंमी. लांब असून तिचा रंग करडा-तपकिरी किंवा तपकिरी-हिरवा असतो. शरीर लांब किंवा अंडाकृती असून वरून खाली चपटे असते. ते अतिशय लवचिक असल्यामुळे आखडता येते, ताणून लांब करता येते किंवा पसरता येते. शरीर ३३ खंडांचे असून प्रत्येक खंडावर १—५ उपवलये असतात. प्रत्येक खंड हा एका पातळ खाचेमुळे लगतच्या खंडापासून वेगळा दिसतो. शरीराच्या अग्र व पश्च टोकास असलेल्या चूषकांचा वापर हालचाल करण्यासाठी आणि पोशिंद्याला पकडून ठेवण्यासाठी होतो. अन्नग्रहण आणि रक्त शोषण्यासाठी लहान अग्र चूषकाचा वापर केला जातो. तोंड अधर बाजूला असून त्याभोवती तीन जबडे असतात. प्रत्येक जबड्यावर ८५—१२८ सूक्ष्म दात असतात. या जबड्यांनी जळू पोशिंद्याच्या त्वचेवर ‘Y’ आकाराची चीर करते. जळूच्या अन्ननलिकेत असणाऱ्या ग्रसनीभोवती असंख्य एकपेशीय लालोत्पादक ग्रंथी असतात. या ग्रंथी हिरुडिन स्रवतात. या स्रावामुळे जखम झालेली जागा बधिर होते, तेथील रक्तप्रवाह वाढतो आणि रक्त गोठण्याला प्रतिबंध होऊन जळू पोशिंद्याच्या नकळत रक्त शोषून घेते. शोषलेले रक्त ग्रसनीमधून अन्नमार्गाद्वारे अन्नपुटात येते. अन्नपुटाचे १०—११ कप्पे असतात. यात रक्त साठविले जाते. तसेच रक्तपेशींचे विलयन होऊन हीमोग्लोबिनाचे द्रवात रूपांतर होते. रक्तातील पाणी शोषले जाऊन रक्त जेलीसारखे घट्ट व काळसर रंगाचे होते. हे रक्त जठर आणि आतड्यात पोहोचल्यानंतर अत्यंत मंदगतीने त्याचे पचन होते. जळू एकावेळी तिच्या वजनाच्या तीनपट रक्त शोषून घेते. एकावेळी शोषलेल्या रक्ताचे पचन आणि अभिशोषण होण्यासाठी ६—१२ महिने लागतात. त्यामुळे जळूच्या दोन अन्नशोषणांमध्ये मोठे अंतर असते. जळूमध्ये श्वसन त्वचेमार्फत होते. रक्ताभिसरण संस्थेत रक्तकोठरे असतात. उत्सर्जनासाठी वृक्ककांच्या १७ जोड्या असतात. चेतासंस्था पूर्ण विकसित असते. जळू उभयलिंगी असली तरी त्यांच्यात परफलन होते. मानवाच्या दृष्टीने जळवा उपद्रवी आणि उपकारकही आहेत. हिरुडो व हिरुडिनेरिया प्रजातीतील जळवा माणसांच्या किंवा गुरांच्या शरीराला चिकटल्या तर त्रास होतो. मात्र मृत्यू येत नाही. मध्यपूर्व देशांमध्ये गोड्या पाण्यातील लिम्नॅटिस निलोटिका जातीची जळू आढळते. नद्यांत व ओढ्यात राहणाऱ्या लहान जळवा शरीरात जेव्हा प्यायलेल्या पाण्यातून शिरतात तेव्हा नाकपुडीत किंवा घशाच्या भागात चिकटून राहतात आणि तेथून फुप्फुसात प्रवेश करतात. व्यक्तीच्या शरीरात जेव्हा अनेक जळवा शिरतात तेव्हा त्यांनी शोषलेल्या रक्तामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन पांडुरोग होऊ शकतो. काही वेळा शरीरात शिरलेल्या जळवांमुळे श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोशिंदा मृत्युमुखी पडू शकतो. पाळीव गुरे व माणसे मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना आशिया खंडात घडल्या आहेत. काही जळवा मासे पकडण्यासाठी आमिष म्हणून गळाला लावतात.

रुग्णाच्या शरीरातील साखळलेले व दूषित रक्त काढून टाकण्यासाठी जळवांचा वापर केला जातो. या उपचारात हिरुडो जातीच्या जळवा वापरतात. ज्या भागातील रक्त काढावयाचे असते तेथे या जळवा ठेवतात. जळवा त्यांच्या जबड्यातील सूक्ष्म दातांनी त्या जागी जखम करतात. त्यामुळे रक्त वाहू लागते. जळवा त्यांच्या सवयीप्रमाणे हिरुडिन स्रवतात आणि रक्त शोषून घेतात. स्रवलेल्या हिरुडिनामुळे त्या भागाला बधिरता येते आणि जखमेची वेदना कळून येत नाही. काही शल्यविशारद हल्लीदेखील शस्त्रक्रिया करताना रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाहित ठेवण्यासाठी हिरुडिनचा वापर करतात. त्वचेतील रक्त साखळले तर ते वाहते करण्यासाठी हिरुडिनयुक्त मलम वापरण्यात येते. सध्या जळवांच्या लाळेतील पॉलिपेप्टाइडांचा उपयोग हृदय आणि रक्तवाहिन्यांतील रक्ताभिसरणाच्या विकारांवर होऊ शकेल का, यासंबंधी संशोधन चालू आहे.

This Post Has One Comment

  1. Sandeep shivaji lohar

    खुप छान माहिती आहे. वाचायला आवडेल सर्वांना ज्ञानात भर पडेल….

प्रतिक्रिया व्यक्त करा