मत्स्यवर्गातील हा एक सागरी अस्थिमासा असून याचे शास्त्रीय नाव झिपिअस ग्लेडियस आहे. पर्सिफॉर्मिस गणातील झिपिइडी कुलात त्यांचा समावेश होतो. हा मासा आकाराने मोठा व स्थलांतर करणारा आहे. त्याचा वरचा जबडा लांब तलवारीप्रमाणे दिसत असल्याने त्याला ‘तलवार मासा’ हे नाव पडले आहे. हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, भूमध्य समुद्र तसेच अटलांटिक महासागराच्या उष्ण आणि समशीतोष्ण भागांत हा मासा मोठ्या संख्येने आढळतो.

पाण्याबाहेर उसळी घेतलेला तलवार मासा

तलवार मासा काळपट चंदेरी रंगाचा असून १.८–३.१ मी. लांब व ४५.४–९१ किग्रॅ. वजनापर्यंत वाढतो. परंतु ६.१ मी. लांबीचे व ५४५ किग्रॅ. वजनाचे मासेही आढळले आहेत. शरीर दणकट असून प्रौढ तलवार माशाच्या शरीरावर खवले नसतात. डोळ्यांपासून वरच्या जबडयाची लांबी शरीराच्या एकूण लांबीच्या एक-तृतीयांश असते. पृष्ठपर दोन असतात; दुसरा पृष्ठपर अतिशय लहान असून तो शेपटीपाशी असतो. याला पोटाकडे पर नसतात. शेपटीच्या दोन्ही बाजूंवर एक धारदार रेषा (कील) असते. किनाऱ्याजवळ राहणारे हे मासे सतत स्थलांतर करणारे व शिकारी असतात. ते आपला वरचा जबडा भक्ष्याला जखमी करण्यासाठी वापरतात. मादी नराहून आकाराने मोठी असते. तलवार मासा अतिशय जलद (८० किमी. / प्रति तास) पोहू शकतो. पोहताना चंद्रकोरीच्या आकाराच्या पुच्छपक्षाचे जोरजोराने फटकारे मारून तो जलद गतीने सरळ पोहत जातो.

तलवार माशाची मादी वयाच्या ४–५ वर्षांत प्रजननक्षम बनते तर नर ३–४ वर्षांत प्रजननक्षम बनतो. उत्तर पॅसिफिक समुद्रात २४० से.हून अधिक तापमानाला मार्च–जून महिन्यात आणि विषुववृत्ताकडील समुद्रात संपूर्ण वर्षभर थोड्याथोड्या अंतराने अंडी घातली जातात. मादीच्या अंडाशयात १–२९ अब्ज अंडी असतात.

तलवार माशाचे समुद्राच्या वरच्या थरात आढळणारे लहान गेदर (ट्युना), दांडेली (बॅराक्युडा), पाखरू मासा, बांगडा इ. तसेच समुद्रतळाशी राहणारे काही मासे, म्हाकुळ इ. खाद्य आहेत. तलवारीसारख्या जबड्यामुळे या माशाला नैसर्गिक शत्रू कमी आहेत. मात्र, शॉर्टफिन मॅको शार्क हा त्याच्यासारखा जलद पोहू शकणारा मासा त्याची शिकार करू शकतो. त्याचप्रमाणे, स्पर्म व्हेल व ऑॅर्का व्हेल हे तलवार माशाचे शत्रू आहेत. तलवार माशांची पिले मात्र इतर मोठ्या माशांचे भक्ष्य ठरतात.

भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीत तसेच अमेरिका, कॅनडा या देशांत तलवार मासे पकडले जातात. भारताच्या किनाऱ्यावर हा मासा सापडल्याची नोंद नसली तरी लक्षद्वीप व श्रीलंका येथे तो आढळतो. शीत रक्ताचा हा मासा, डोळ्याजवळील खास स्नायूंच्या मदतीने आपले डोळे व मेंदू यांना उष्ण ठेवतो. हे तापमान भोवतालच्या पाण्यापेक्षा १०–१५ से. जास्त असल्याचे नोंदविले गेले आहे. यामुळे या माशाची दृष्टिक्षमता वाढते व त्यामुळे भक्ष्य पकडायला मदत होते. माशांच्या माहीत झालेल्या २५,००० जातींपैकी केवळ २२ जातींच्या माशांमध्ये ही क्षमता आढळली आहे. त्यामुळे जलद गतीने पोहणारे भक्ष्य पकडणे तलवार माशाला सोपे होते.

‘स्पोर्ट फिशिंग’ म्हणूनही याची शिकार केली जाते. गळाने केल्या जाणाऱ्या या शिकारीला ‘अँगलिंग’ म्हणतात. गळाला लागल्यावर हा मासा सुटकेसाठी जीवापाड प्रयत्न करतो. यासाठी तो बोटींना धडक देऊन त्यांचे नुकसान करू शकतो. छोट्या बोटींना बिचकणारा, घाबरणारा हा मासा मोठ्या बोटींच्या अगदी जवळ येतो. त्यामुळे भाला वापरूनही त्याची शिकार केली जाते.

तलवार मासा त्याच्या उत्कृष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. या माशाचे छोटे तुकडे करून ते भाजून खातात. त्याचे मांस काहीसे चिवट असल्यामुळे सळ्यांना लावून ते भाजता येते. या माशाने खाल्लेल्या खाद्यानुसार त्याच्या मांसाचा रंग बदलतो. उदा., कोळंबी खाल्लेल्या तलवार माशांची ‘पमकिन सोअर्ड फिश’ म्हणून विक्री होते आणि त्याला किंमतही अधिक मिळते. मेदाचे प्रमाण जास्त असलेला हा मासा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पण त्यातील ‘मिथाइल मर्क्युरी’ च्या उच्च प्रमाणामुळे अमेरिकेच्या अन्न व औषध व्यवस्थापनामार्फत मुले, गर्भवती व तरुण स्त्रियांना या माशाचा आहारात समावेश न करण्याचा सल्ला दिला जातो.

तलवार मासा संरक्षित नसला तरी त्यांची झपाट्याने कमी होत जाणारी संख्या लक्षात घेऊन २०१० साली ग्रीन पीस इंटरनॅशनल संस्थेने या माशाला सी-फूड रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे.