आजतागायत होऊन गेलेल्या अद्वितीय सेनापतींमधील फ्रान्सचा अग्रणी सेनापती नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटनचा धुरंधर सेनाप्रमुख ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि त्याचे मित्रपक्ष यांत १८ जून १९१५ रोजी बेल्जियममधील वॉटर्लू येथे झालेली घनघोर लढाई. या लढाईत नेपोलियनचा निर्णायक पराभव झाला. त्याचबरोबर नेपोलियनच्या अनन्यसाधारण राजकीय व लष्करी वाटचालीची सांगता झाली आणि युरोपीय इतिहासाला लक्षणीय वळण लाभले.

परस्परविरोधी सेनाबल : या युध्दात सर आर्थर वेलस्ली (ड्यूक ऑफ वेलिंग्टन) याच्या नेतृत्वाखाली ब्रिटन, नेदर्लंड्स, हॅनोव्हर, बुरनस्वीक व नासाऊ या दोस्त राष्ट्रांचे ६८,००० सैन्य आणि फील्ड मार्शल गेबार्ड फॉन ब्ल्यूखर याच्या नेतृत्वाखाली प्रशियाचे ४५,००० सैन्य एकाबाजूला, तर त्यांच्याविरुद्ध नेपोलियनचे १,१८,००० सैन्य उभे होते. फ्रेंच सेनेमध्ये ४८,००० पायदळाचे सैनिक, १४,००० घोडदळ आणि २५० तोफा होत्या. नेपोलियनची मदार प्रामुख्याने त्याच्या घोडदळातील सुप्रसिद्ध ‘कुरेसिअर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौदा हेवी कॅव्हलरी पलटणींवर आणि सात लान्सर पलटणींवर होती. त्याच्या सैन्यात कसलेले सैनिक होते आणि किमान एका मोहिमेचा अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी होता. ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या दोस्त संघटन सैन्यात ५०,००० पायदळ, ११,००० घोडदळ आणि १५० तोफा होत्या; परंतु त्यांचे घोडदळ फ्रेंच सैन्याइतके प्रबळ नव्हते. प्रशियन सैन्याची त्या वेळी पुनर्रचना चालू होती. ते तुलनेने कनिष्ठ होते. त्यांचे घोडदळ आणि तोफखाना नगण्य होते.

रणांगणाची मांडणी आणि व्यूहनीती : १५ जूनच्या सकाळी दोन्ही बाजूंची सैन्ये उत्तरेत ब्रुसेल्स आणि दक्षिणेस बीमाँ यांमधील प्रदेशात पोहोचली होती. (नकाशा पाहा). शत्रुसैन्याची जमवाजमव अजून चालूच असल्याचे पाहून नेपोलियनने १५ जूनच्या पहाटे आपल्या सैन्याला आगेकूच करण्याचे आदेश दिले. परंतु १६ जूनच्या दुपारपर्यंत सॉयन्यानिवेन कात्रेब्रा-वावर या रेषेत नेपोलियनला थोपवून धरण्यात ड्यूक ऑफ वेलिंग्टनला यश आले आणि आता वॉटर्लू परिसरात एक अभेद्य संरक्षणफळी उभारण्याचे त्याने आपल्या सैन्याला आदेश दिले. १७ जूनला हे ‘स्टेलमेट’ कायम राहिले.

वेलिंग्टनने आपल्या सैन्याची मोर्चेबांधणी प्रामुख्याने मॉसॉजॉच्या पठाराच्या उत्तरेकडील उतारावर केली होती. आपल्याकडे इतक्या मोठ्या क्षेत्रात संरक्षणफळी उभी करण्यासाठी आणि नेपोलिअनचे आक्रमण परतवून लावण्यासाठी पुरेशा पायदळाची संख्या नाही, याची वेलिंग्टनला जाणीव होती. त्यामुळे त्याच्या सैन्यातील प्रभावी १५६ मिलिमीटर तोफांवर त्याची भिस्त होती. त्याचबरोबर प्रशियाचे उरलेले सैन्य लवकरात लवकर रणांगणात दाखल होऊन आपली डावी फळी (पूर्वेकडील बाजू) सांभाळेल, अशी त्याची अपेक्षा होती. मॉसॉजॉच्या दिशेने चालून येणाऱ्या फ्रेंच सैन्याला उगोमाँ, लाएसॅट आणि पॅपेलॉ मोर्चांकरवी जितका वेळ थांबवता येईल आणि खुल्या मैदानात तोफांच्या माऱ्याकरवी त्यांची संख्या जितकी जास्त क्षीण करता येईल, तेवढी पराकाष्ठा करून अखेरीस ते जेव्हा मॉसॉजॉवरील मोर्चांपर्यंत पोहोचतील, तेव्हा त्यांचा कणखर सामना करायचा आणि शत्रूचा पराभव साधायचा, ही ड्यूक ऑफ वेलिंग्टनची व्यूहनीती होती.

सर्वप्रथम उगोमाँवर जोराचा हल्ला चढवून शत्रूचे लक्ष विचलित करण्याचा नेपोलियनचा बेत होता. त्याचबरोबर आघाडीवरील इतर मोर्चांना तोफखान्याच्या भडिमाराने खिळखिळे करून आपल्या प्रबळ घोडदळाच्या साहाय्याने मॉसॉजॉवर तो घणाघाती प्रहार करणार होता. इंपिरिअल गार्डला नेपोलियनने मुद्दाम मागे ठेवले होते. शत्रूची फळी कोलमडू लागल्यावर त्याच्यावर निर्णायक प्रहार करण्यासाठी किंवा संकटाच्या वेळी मदत करण्यासाठी त्याचे ते राखीव दल होते.

वास्तविक, १८ जूनच्या भल्या पहाटे कारवाईस आरंभ होणे आवश्यक होते; परंतु त्याच्या आधी दोन दिवस पाऊस पडल्याने जमीन भिजलेली होती. त्यामुळे घोड्यांची आणि तोफांची हालचाल करणे दुरापास्त होत होते. विशेषत: ओल्या चिखलात वेगाची घोडदौड नामुष्कीची होती. हे पाहून नेपोलियनने सकाळी सात वाजता हल्ल्याची वेळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. उन्हाने तीन-चार तासांत परिस्थिती सुधारेल, अशी त्याची अपेक्षा होती. उरलेल्या काही तासांतच आपण शत्रूची गठडी वळू शकू, यावर त्या रणधुरंधराचा भरवसा होता. नेमका हाच विलंब नेपोलियनला घातकी ठरणार होता. प्रशियाच्या राखीव तुकडीचा प्रमुख  झीटन बराच जवळ पोहोचल्याची बातमी वेलिंग्टनला आधीच मिळाली होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत नेपोलियनचा हल्ला न आलेला पाहून वेलिंग्टनला हायसे वाटले होते.

लढाई : तीन-चार तास वाट पाहिल्यानंतर ११ वाजता नेपोलियनने आपल्या सेनापतींना अर्ध्या तासानंतर पूर्वयोजनेनुसार चढाईला आरंभ करण्याचे आदेश सोडले. ठीक साडेअकरा वाजता उगोमाँवर हल्ला सुरू झाला. ११.५० ला फ्रेंच सैन्याच्या ‘ग्रांद बॅटरी’ तोफखान्याच्या ८० तोफा शत्रूवर आग ओकू लागल्या.

नेपोलियनचा अंदाज होता की, वेलिंग्टनच्या सैन्याचे मुख्य मोर्चे मॉसॉजॉ कडेपठाराच्या दक्षिणेकडील उतारावर किंवा त्याच्याही पुढे असतील. किंबहुना हे नित्यनियमाच्या लष्करी प्रघातानुसार असल्याने तसे गृहीत धरण्यात त्यात काही चूक नव्हती. परंतु वेलिंग्टनने हा शिरस्ता मोडून शत्रूला फसवण्यासाठी उत्तरेकडील उतारावर मोर्चेबांधणी केली होती. फ्रेंच सैन्याच्या घोडदळाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी ब्रिटिश सेनेच्या पायदळाच्या पलटणींनी चौरसाच्या आकृतीत सैनिकांची रचना केली होती. पाचशे सैनिक ६० मीटर X ६० मीटर चौरसामध्ये चारी बाजूंनी एकामागे एक ओळीत शत्रूशी सामोरे जाण्यास सज्ज होते. घोड्याला सगळ्यात भय ते संगिनीचे. त्यामुळे कितीही वेगाने येणाऱ्या घोडदळाला ही संगिनींची तटबंदी पार करणे अशक्य होत होते. ब्रिटिश तोफखाना दोन चौरसांमधील मोकळ्या जागेतून चालून येणाऱ्या शत्रूवर वर्षाव करीत; पण शत्रू जवळ आला की, ते चौरसामध्ये आश्रय घेत. चौरसांच्या या अभिनव डावपेचामुळे फ्रेंच तुकड्या ब्रिटिश संरक्षणफळी भेदू शकल्या नाहीत. शत्रू कितीही प्रबळ असला, तरी निर्धार आणि जिद्दीने लढवलेली संरक्षणफळी भेदू शकत नाही, याचे हे उत्तम उदाहरण!

दुपार ढळत असतानाच झीटनच्या नेतृत्वाखाली प्रशियाचे कोअर वेलिंग्टनच्या मुख्य मोर्चापर्यंत पोहोचले. ही मौल्यवान कुमक वेलिंग्टनला जणू ईश्वरदत्त देणगी होती. त्यानंतर फ्रेंच सैन्याला शत्रूचा सामना करणे नामुष्कीचे झाले आणि ते माघार घेऊ लागले. ते पाहून नेपोलियनने शेवटचा हुकमी एक्का वापरण्याचे ठरवले. त्याच्या मुरब्बी नेतृत्वाखाली इंपिरियल गार्डने वेलिंग्टनवर करारी हल्ला चढविला. त्या वेळी संध्याकाळचे साडेसात वाजले होते. वेलिंग्टनच्या मोर्चांवर जणूकाय एक वावटळच दाखल झाली; परंतु वेळ निघून गेली होती. दुर्दैवाने नेपोलियनला माघार घ्यावी लागली. केवळ आठ तासांच्या अवधीत फ्रेंच सैन्याचे २८,००० सैनिक मरण पावले होते, १५,००० बेपत्ता होते आणि ८,००० सैनिकांना बंदी बनवण्यात आले होते. ब्रिटिश, डच आणि प्रशियन सैन्याचे ४,७०० सैनिक धारातीर्थी पडले होते. १५,००० जखमी, तर ४,७०० बेपत्ता होते. इतक्या मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली युद्धे बोटावर मोजण्याइतकीच!

वॉटर्लूमधील नेपोलियनच्या निर्णायक पराभवाचा युरोपवरील सर्वांत महत्त्वाचा परिणाम म्हणजे १७९० च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सातत्याने युद्धग्रस्त असलेल्या युरोपमध्ये पुढील पन्नास वर्षे शांतता नांदली.

संदर्भ :

  •  Barbero, Alessandro, The Battle : A History of Waterloo, London, 2006.
  •  Chandler, David, The Campaigns of Nepoleon, New York, 1996.
  •  Davies, Huw, Wellington’s Wars : The Making of A Military Genius,  New York, 2012.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा