मांडण : (इ. स. १५१८ दरम्‍यान). गुजरातमधील ज्ञानमार्गी संतकवी. काव्‍यातून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे ते राजस्‍थानमधील शिरोही या ठिकाणचे. ज्ञाती बंधारा (साडी बांधणारे). वडिलांचे नाव हरि/हरिदास व आईचे नाव मेधू. कवीची सर्वात महत्‍वाची रचना म्‍हणजे प्रबोधबत्रीशी/मांडण बंधारांना उखाणा. ही कबीर शिष्‍य ज्ञानीजी यांच्‍या ज्ञान-बत्‍तीसीने प्रभावित होऊन लिहिली असे मानण्‍यात येते. त्‍यात पट्पदी चोपाईवाल्‍या वीस वीस कड्या अशा ३२ विसात गुंफल्‍या असून गुजरातीत पहिल्‍यांदा उखाणाग्रथित अशी रचना पाहावयास मिळते. या उखाणारचनेची  त्‍याच्या पुढे अखाच्‍या (१७ वे शतक)  छप्‍पावरही प्रभाव दिसतो. लोकमानसातील दंभाचार, बुद्धिजडता यातील वैयर्थ्‍य उघडे करीत त्‍यांना ज्ञानबोध करण्‍याचा कवीचा प्रयत्‍न आहे. तत्‍कालीन प्रजा जीवनातील प्रचलित अनेक उखाणे कथनात सामावण्‍याचा कवीचा आग्रह असल्‍याने कृतीच्‍या प्रासादिकतेला काही वेळा झळ पोहचते, पण त्‍याचबरोबर तत्‍कालीन समाज जीवनातील आचार-विचार समजण्‍याच्‍या दृष्‍टीने व भाषिकतेच्‍या दृष्‍टीनेही ही रचना महत्‍वाची ठरते. तसेच ७०-७५ कड्यांच्‍या ७० खंडात चोपाई आणि दुहा या रचनाबंधातील रामायण  व याच काव्‍यबंधातील रुक्‍मांगदकथा / एकादशी महिमा  या कवीच्‍या आख्‍यानकोटीतील रचना आहेत. त्‍यांच्‍या नाममुद्रेतील काही पदांवर मराठीचा परिणाम आहे, असे अभ्‍यासक म्हणतात.

संदर्भ : शास्त्री,केशवराम,कविचरित : १-२, १९४२.