स्वाद ओळखणारे मुख्य इंद्रिय. या इंद्रियाचा समावेश पाच ज्ञानेंद्रियांमध्ये होतो. अन्नग्रहण करताना होणाऱ्या चघळणे, चावणे, गिळणे इत्यादी क्रियांना जीभ मदत करते. मनुष्यामध्ये शब्दोच्चार करणे हे जिभेचे आणखी एक कार्य आहे. जीभ हे मुखगुहेच्या तळाशी असलेले स्नायुयुक्त व अस्थिविरहित इंद्रिय आहे. मानवी जिभेची सरासरी लांबी सु. १० सेंमी असते. तिचा पृष्ठभाग आकाराच्या सीमारेषेने दोन भागांमध्ये विभागलेला दिसतो. पुढील दोन – तृतीयांश भागाला जिभेची काया म्हणतात, तर आतील एक – तृतीयांश भागाला जिभेचे मूळ म्हणतात. जीभ तिच्या मुळाशी ग्रसनीच्या (किंवा घशाच्या) समोरच्या तसेच लगतच्या भित्तिकेला आणि मानेतील कंठिका अस्थी यांना जोडलेली असते.
जीभ वेगवेगळ्या प्रकारच्या ऐच्छिक कंकाल स्नायूंनी (इच्छेप्रमाणे हालचाल करता येणारी व लांब तंतूंनी) बनलेली असल्यामुळे तिच्यावर जाणिवपूर्वक नियंत्रण करता येते. खालचा जबडा आणि शंखास्थीचा आतील पृष्ठभाग आणि कंठिका अस्थीपासून जिभेतील स्नायू वाढलेले असतात आणि ते तीन वेगवेगळ्या प्रतलांमध्ये असतात. मानवी जीभेतील आठ स्नायूंचे वर्गीकरण अंतस्थ आणि बहिस्थ प्रकारांत करतात. अंतस्थ स्नायू चार प्रकारचे असून ते जिभेत असतात. हे स्नायू कोणत्याही हाडाला जोडलेले नसून त्यांच्यामुळे जिभेला विशिष्ट आकार येतो. बहिस्थ स्नायू हाडांपासून उगम पावतात आणि जिभेत शिरतात. हे स्नायू हाडांना जोडलेले असतात. जीभ बाहेर काढणे, आत घेणे आणि दोन्ही बाजूंना वळविणे हे या स्नायूंचे कार्य असते. तिच्यादवारे अन्न तोंडात फिरवून दातांखाली आणले जाते. त्यामुळे अन्नाचे लहान लहान तुकडे करता येतात. अन्न गिळताना तिच्यामार्फत अन्न घशात ढकलले जाते. त्यावेळी जीभ तालूवर दाब देते आणि तोंडाच्या आतील बाजूंना पसरते.त्यामुळे तोंडातील अन्न बाहेर न पडता घशाकडे सरकते. तसेच दातांमध्ये व गालफडांमध्ये अडकलेले अन्नकण जिभेने काढून तोंड स्वच्छ ठेवले जाते. बोलताना जीभ पुढच्या दातांना व तालूला आपटल्यामुळे काही अक्षरांचे व शब्दांचे उच्चार योग्य आणि स्पष्ट करता येतात.
जिभेचा टोकाकडील भाग स्पर्शाला शरीराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा अधिक संवेदनशील असतो. त्यावर श्लेष्मल पटलाचे आवरण असून लाळेमुळे ती ओलसर राहते. तिचा खालचा भाग मऊ असतो. जीव्हा धमनीमार्फत तिला रक्ताचा पुरवठा होतो.
जिभेच्या कायेच्या वरच्या पृष्ठभागावर अनेक उंचवटे असतात. या उंचवटयांना अंकुरक म्हणतात. त्यामुळे जीभ खरखरीत भासते. तसेच तिच्या मुळाच्या कडांवरदेखील अनेक अनियमित फुगवटे असतात. या फुगवटयांमध्ये श्लेष्म ग्रंथी असतात. अंकुरक सामान्यपणे चार प्रकारचे आहेत; तंतुरूप, कवकरूपी, परिखावृत आणि पर्णी. प्रौढ मनुष्यात यांतील तीन प्रकारचे अंकुरक प्रामुख्याने दिसून येतात. अनेक प्राण्यांमध्ये पानांच्या आकाराचे पर्णी अंकुरक विकसित झालेले असले तरी मनुष्यात मात्र विकसित झालेले नसतात. तंतुरूप अंकुरक संख्येने सर्वांत जास्त असून सूक्ष्मदर्शकाखाली ते शंक्वाकृती दिसतात. तंतुरूप अंकुरकांमध्ये रुचिकलिका नसतात.अन्न तोंडात फिरताना घर्षण निर्माण करणे, हे यांचे मुख्य कार्य असते. या अंकुरकांमध्ये कवकरूपी अंकुरक विखुरलेले असतात.त्यांची संख्या तंतुरूप अंकुरकाच्या खालोखाल असते.त्यांचा आकार गोल मुठींप्रमाणे असून ते जिभेवर बहुधा मध्यभागी असतात आणि त्यांच्यात रुचिकलिका असतात. तिसरे परिखावृत अंकुरक आकाराने सर्वांत मोठे असतात आणि त्यांच्यातदेखील रुचिकलिका असतात. त्यांची संख्या १०-१४ असून ते जिभेची काया आणि मूळ यांना विभागणाऱ्या सीमाक्षेत्रात असतात. गोड, आंबट, खारट, कडू अशा पदार्थांची वेगवेगळी चव जिभेच्या वेगवेगळ्या भागात समजते, हा एक गैरसमज आहे. सर्व रुचिकलिका सर्व प्रकारची चव ओळखायला मदत करतात. रुचिकलिकांची संख्या २,०००-८,००० असते.
अधोजिव्हा चेता ही जिभेतील अंतस्थ आणि बहिस्थ स्नायूंची प्रेरक चेता आहे. तिच्यामार्फत जिभेतील स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण होते. जिभेच्या कायेतील संवेद मेंदूपासून निघालेल्या त्रिशाखी चेतामार्फत आणि मूळाकडील संवेद जिव्हाग्रसनी चेतामार्फत मेंदूकडे जातात. जिभेच्या कायेवरील चव आननी चेता आणि मुळावरील चव जिव्हाग्रसनी या चेतांमार्फत मेंदूला मिळते.
जिभेमुळे अनेक रोगांचे संक्रामण समजून येत असल्यामुळे रोगनिदान करताना जीभ पाहतात.तिचा रंग सामान्यपणे फिकट गुलाबी असतो. वेगवेगळ्या रोगांच्या संक्रामणानुसार जिभेत रंगबदल, जमणारा थर, ओलसरपणातील बदल किंवा श्लेष्मातील बदल दिसून येतात. तिच्या खालच्या भागातील श्लेष्म अत्यंत पातळ स्वरूपाचे असून या भागात रक्तवाहिन्यांचे जाळे असते. शरीरात विशिष्ट औषधे कमीत कमी वेळात परिणामकारक ठरण्यासाठी जिभेखाली ठेवतात. जसे, हृदयविकारात रुग्णाच्या छातीमध्ये दुखायला लागल्यास सॉरबिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवल्यास काही क्षणात हे औषध रक्तप्रवाहात मिसळते.
बहुतेक पृष्ठवंशी प्राण्यांना जीभ असते. माशांमध्ये जीभ प्रारंभिक स्वरूपाची असून तिची हालचाल होत नाही. काही उभयचर प्राण्यांची जीभ माशांसारखी असते तर भेक, बेडकासारख्या उभयचर प्राण्यांची जीभ मांसल असून तिची हालचाल होते. म्हणून बेडूक जीभ वेगाने बाहेर फेकून कीटक पकडतो. कासव आणि मगर यांना जीभ बाहेर काढता येत नाही तर पाल, साप यांसारखे प्राणी जीभ बाहेर काढू शकतात. साप जिभेने वेगवेगळी माहिती जमा करतो. तो जेव्हा जीभ बाहेर काढतो तेव्हा आजुबाजूला असलेल्या भक्ष्याचे, शत्रूचे किंवा मादीचे गंधकण जिभेला चिकटतात आणि त्यांच्या माहितीच्या संवेदना जॅकोबसन इंद्रियामार्फ त मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदूमध्ये माहितीचे विश्लेषण झाले की, त्यानुसार साप त्याचे काम पार पाडतो.
सस्तन प्राण्यांमध्ये जिभेचे पुढील टोक सुटे असल्यामुळे ती विविध कार्य करते. चावताना अन्न दाताखाली आणण्यासाठी आणि गवत पकडून तोडण्यासाठी गायी-म्हशींसारख्या प्राण्यांना जिभेचा उपयोग होतो. घोड्यासारखे प्राणी जिभेद्वारे तोंडात कमी दाब निर्माण करून पाणी पितात. कुत्रा व मांजर त्वचा साफ करण्यासाठी आणि पातळ पदार्थ पिण्यासाठी जिभेचा वापर करतात. कुत्र्याची जीभ शरीराचे तापमान नियमित राखते. कुत्रा धावला की जिभेतील रक्तप्रवाह वाढल्यामुळे तिचा आकार वाढतो. अशा वेळी कुत्र्याची जीभ बाहेर येते आणि तिच्यावरील ओलसरपणामुळे रक्तप्रवाह थंड होतो. मुंगीखाऊ प्राण्याला जीभ लांबपर्यंत बाहेर काढता येते. तिच्यावर चिकट श्लेष्मल थर असल्यामुळे हा प्राणी वारुळातील मुंग्या जिभेने खातो.