स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील मृग (सर्व्हिडी) कुलाच्या म्युंटिअ‍ॅकस प्रजातीतील सर्व प्राण्यांना भेकर (म्युंटजॅक) म्हणतात. तो मूळचा भारत, आग्नेय आशिया आणि दक्षिण चीनमधील असून त्याच्या काही जाती इंग्लंड आणि फ्रान्समध्ये प्रस्थापित झाल्या आहेत. जगात सर्वत्र भेकराच्या १२ जाती आढळून येतात. धोक्याची जाणीव झाल्यानंतर तो भुंकल्यासारखा आवाज काढतो, म्हणून त्याला ‘बार्किंग डियर’ किंवा ‘भुंकणारे हरीण’ असेही म्हणतात. भारतात आढळणाऱ्या भेकराचे शास्त्रीय नाव म्युंटिअ‍ॅकस म्युंटजॅक आहे. तो बांगला देश, नेपाळ, श्रीलंका, चीनचा दक्षिण भाग, व्हिएटनाम, जावा, बाली व कंबोडिया येथे आढळून येतो.

नर भेकर (म्युंटिअ‍ॅकस म्युंटजॅक)

भेकर आकाराने सडपातळ आणि लहान असतो. त्याची खांद्याजवळील उंची ५०–७५ सेंमी., शरीराची लांबी ८०–१०० सेंमी. आणि वजन २२–२३ किग्रॅ. असते. शरीराचा रंग गडद तपकिरी किंवा पिवळसर-तपकिरी असून पोटाकडील रंग पांढुरका असतो. पायावरील केसांचा रंग किरमिजी-तांबडा असतो. त्याचा रंग ऋतुमानानुसार बदलतो. अंगावरचे केस मऊ, जाड आणि दाट असतात. नर भेकराच्या वरच्या जबड्यातील सुळे लांब असून ते तोंडाबाहेर आलेले दिसतात. मृगशिंगे कपाळाच्या हाडांपासून उत्पन्न होत असून ती दरवर्षी गळून पडतात व पुन्हा वाढतात. मृगशिंगे आखूड असून जास्तीत जास्त ५–७ सेंमी. वाढतात. केवळ नरालाच शिंगे असतात.

भेकर दिनचर तसेच निशाचर आहे. पिके तयार झाल्यानंतर रात्री फिरणे त्यांना अधिक सुरक्षित वाटते. समुद्रसपाटीपासून १,५००–२,५०० मी. उंचीपर्यंतच्या दाट वनांत त्यांचा वावर असतो. तो सर्वभक्षी असून त्याच्या आहारात फळे, कोवळ्या डाहळ्या व बिया आणि पक्ष्यांची अंडी, क्वचित लहान सस्तन प्राणी व मृत प्राणी यांचा समावेश असतो. दाट वनांतून तो अधूनमधून चरण्यासाठी गवताळ रानात किंवा पिकांच्या शेतात शिरतो. झाडांची साल खरवडून काढण्याच्या आणि पिकावर धाड घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे शेतात घुसलेल्या भेकरांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते.

भेकर बहुधा एकएकटे राहतात. विणीच्या काळात ते जोडीने किंवा मादी पिलांसोबत वावरताना दिसतात. नर आपल्या क्षेत्राबद्दल अतिशय जागरुक असतात. अधिवासाची सीमा निश्‍चित करण्यासाठी नर भेकर डोळ्याजवळील गंधग्रंथींचा स्राव झाडावर घासतो. स्वत:च्या हद्दीमध्ये एक नर दुसऱ्या नराला घुसू देत नाही. स्वत:च्या क्षेत्रामध्ये घुसलेल्या अन्य नराला आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांना तो त्यांच्या लहानशा शिंगांनी आणि मोठ्या सुळ्यांनी पिटाळून लावतो. शत्रूचा धोका जाणवताच किंवा अडचणीत सापडल्यास तो भुंकायला लागतो. कधीकधी त्यांचे भुंकणे तासभर चालू असते.

मादी भेकर (म्युंटिअ‍ॅकस म्युंटजॅक)

भेकराचा विणीचा हंगाम वर्षभर असतो. मादी पहिल्या-दुसऱ्या वर्षात प्रजननक्षम होते. सहा-सात महिन्यांच्या गर्भावस्थेनंतर मादी एक किंवा दोन पिलांना जन्म देते. सहा महिन्यांपर्यंत पिले मादीसोबत राहतात. एका कळपात दोन-तीन माद्या, पिले आणि एक नर असतो. काही वेळा दुसऱ्या कळपातील मादी मिळविण्यासाठी नर आपल्या क्षेत्राचे उल्लंघन करून दुसऱ्या कळपामध्ये जातात.

भेकरांच्या गुणसूत्रांत आढळणाऱ्या विविधतेमुळे उत्क्रांतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्यांना खास महत्त्व आहे. भारतीय भेकरात गुणसूत्रांची संख्या सस्तन प्राण्यांत सर्वांत कमी आहे; त्यांच्या नरामध्ये गुणसूत्रांच्या ७ जोड्या असतात, तर मादीमध्ये केवळ ६ जोड्या असतात. या तुलनेत, चिनी भेकरामध्ये गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा