सजीवांना निर्जीवापासून वेगळे दर्शविणाऱ्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया म्हणतात. वास्तविक सजीवांमध्ये असणारी सर्व संयुगे आणि मूलद्रव्ये निर्जीव आहेत. परंतु जैवरेणू पेशीबद्ध झाल्याने काही जीवन प्रक्रिया पेशींमध्ये घडून येतात. या जीवन प्रक्रिया पेशीबाहेर घडत नाहीत. कृत्रिम घटकांच्या साहाय्याने काही प्रक्रिया घडल्या तरी त्यातील जैवरेणू पेशीमधून मिळवावे लागतात. जीवन प्रक्रियांचे पुढील गुणधर्म आहेत : चलन, संवेदनक्षमता, पोषण, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, वृद्धी आणि मृत्यू.

चलन : सजीवांमधील चलन किंवा हालचाल ही एक गुंतागुंतीची क्रिया आहे. ॲक्टिन, मायोसिन, सूक्ष्मनलिका, लवके पक्ष्माभिका आणि कशाभिका यांच्या साहाय्याने पेशींचे तसेच सजीवांमध्ये चलन होते. वनस्पतिपेशींमध्ये होणारे चलन दृढ पेशीआवरणामुळे स्पष्ट दिसत नाही. मात्र, पेशीअंतर्गत पेशीद्रव्यामध्ये चलन होतच असते. फुले उमलणे, पाने मिटणे, लाजाळूच्या पानांना स्पर्श झाल्यानंतर ती मिटणे, ही वनस्पती चलनाची काही उदाहरणे आहेत. प्राण्यांच्या स्नायूंमुळे होणारी हालचाल त्यामधील ॲक्टिन आणि मायोसिन या प्रथिनांमुळे होते.

संवेदनक्षमता : सजीवांमध्ये संवेदनक्षमता असणे, ही सुरक्षिततेसंबंधी प्रतिक्रिया आहे. परिसरातील बदलांनुसार सजीवांमध्ये होणारा बदल त्याचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आवश्यक असतो. संवेदनक्षमतेच्या विविध पातळ्या आहेत. एकपेशीय सजीवांहून बहुपेशीय सजीवांमधील संवेदनक्षमता अधिक प्रगत असते. प्रारंभी उत्पन्न झालेले सजीव स्पर्श, तापमानातील बदल आणि परिसरातील रासायनिक बदलांसंबंधी संवेदनशील होते. प्रगत सजीवांमध्ये प्रकाश, ध्वनी, चव, गंध व स्पर्श यांसाठी इंद्रिये विकसित झाली आहेत.

पोषण : प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते. त्यामुळे सजीवाचे पोषण होऊन वाढ होते. मिळविलेल्या अन्नावर झालेल्या चयापचय क्रियांपासून पेशींना ऊर्जा मिळते. ही ऊर्जा कार्यक्षम राहण्यासाठी तसेच जीवन प्रक्रियेसाठी वापरली जाते.

श्वसन : श्वसन ही महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. श्वसन म्हणजे वायूंची देवाणघेवाण. श्वसनक्रियेत हवेतील ऑक्सिजन शोषला जातो आणि कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर सोडला जातो. वनस्पतींना बाह्य श्वसनांगे नसतात, परंतु वनस्पती श्वसन करू शकतात. पेशी पातळीवर श्वसन ही जीवरासायनिक क्रिया आहे. श्वसनामध्ये अनेक रासायनिक क्रिया विकरांच्या मदतीने साखळी पद्धतीने घडतात. श्वसनक्रियेत पेशींमधील ऊर्जा मुक्त होते. रासायनिक पातळीवर विनॉक्सिश्वसन आणि ऑक्सिश्वसन अशा दोन प्रकारे श्वसन होते.

उत्सर्जन : पेशीमधील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्याच्या क्रियेस उत्सर्जन म्हणतात. श्वसन क्रियेत कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकला जातो. प्रथिन चयापचयात अमोनिया, यूरिया आणि यूरिक आम्लाच्या स्वरूपात नायट्रोजन उत्सर्जित होतो. वनस्पती पेशींमध्ये उत्सर्जित द्रव्ये मृत पेशींच्या स्वरूपात साठविली जातात.

प्रजनन : प्रत्येक सजीव प्रजननादवारे आपल्यासारख्या सजीवाची निर्मिती करतो. सजीवांमध्ये प्रजननाच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी वंशसातत्य राखणे, हे सजीवांचे मुख्य लक्षण आहे.

वृद्धी : सजीवांमध्ये जन्म, वृद्धी आणि मृत्यू अशा तीन स्थूल अवस्था असतात. एकपेशीय सजीवामध्ये पेशीच्या आकारात विशिष्ट वाढ झाली की पेशीचे विभाजन होते; मात्र, वृद्धी होत नाही. बहुपेशीय सजीवाची वाढ होताना पेशीचे विभाजन होते. तसेच पेशींची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या आकारमानात वृद्धी होते.

मृत्यू : सर्व सजीवांना ठराविक आयु:काल असतो. त्यानंतर त्यांना मृत्यू येतो. सजीव मृत होणे हा त्यांच्या जीवन प्रक्रियेचा शेवट आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा