भारतातील माळरानात आढळणारा एक पक्षी. पक्षिवर्गातील ग्रुईफॉर्मिस गणाच्या ओटिडिडी कुलात माळढोक पक्ष्याचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव आर्डेओटिस नायग्रिसेप्स आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांतील कोरड्या गवताळ प्रदेशांमध्ये माळढोक आढळतात. एके काळी भारतात ते मोठ्या संख्येने होते. मात्र मांसासाठी त्यांची शिकार झाल्यामुळे आणि त्यांच्या अधिवासावर होत असलेल्या अतिक्रमणामुळे त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. २०११मध्ये केलेल्या गणतीनुसार भारतात सु. २५० माळढोक आढळले होते. पूर्वी आसाम वगळता भारताच्या पूर्व, पश्‍चिम, मध्य, उत्तर आणि दक्षिण भागांत विशेषेकरून रूक्ष गवताळ प्रदेशांत आणि झुडपांच्या वनांत त्यांचा वावर असे. जलसिंचनाखाली असलेले हिरवेगार प्रदेश मात्र ते टाळतात.

माळढोक (आर्डेओटिस नायग्रिसेप्स)

माळढोक नराची उंची सु. १ मी. असते. मादी ही नरापेक्षा लहान असते. तिची उंची सु. ७६ सेंमी. असते. नराचे वजन ८–१४·५ किग्रॅ., तर मादीचे वजन २–६ किग्रॅ. असते. नराचे डोके पांढरे असून त्याच्यावर टोपीसारखा काळा तुरा असतो. मान पांढरी असून मानेच्या मागील शरीराचा आकार अन्य पक्ष्यांप्रमाणे निमुळता होडीच्या आकारासारखा नसून तो रुंद असतो. पाठीचा रंग गडद तपकिरी अथवा करडा असून त्यावर पांढऱ्या रेघा किंवा ठिपके असतात. पोटाकडचा रंग पांढरा असतो. नराच्या छातीवर आडवा काळा पट्टा असतो. मादीच्या छातीवर हा पट्टा अरुंद किंवा अर्धवट असतो किंवा कधीकधी नसतो. नराच्या मानेवर गळ्यापाशी गलकोष्ठ असून आवाज घुमवून तो मोठा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाय दणकट आणि लांब असतात.

माळढोक भित्रे आणि कमालीचे सावध असतात. ते वेगाने धावू शकतात आणि दूरवर उड्डाण करू शकतात. टोळ, भुंगेरे व इतर कीटक, गोमा, पाली, सरडे यांबरोबरच धान्ये, भुईमुगाच्या व इतर वनस्पतींच्या शेंगा आणि बोरे यांचा समावेश त्यांच्या आहारात होतो. पाणी उपलब्ध असेल, तेव्हा माळढोक जमिनीवर बसून पाणी पिताना दिसतो.

माळढोकाचे नर एकापेक्षा अधिक माद्यांसोबत राहतात. एका थव्यात तीन-चार माद्या असू शकतात. विणीच्या हंगामात माद्यांसोबत हिंडणाऱ्‍या नरांचा कल विणीच्या हंगामानंतर थवा करून वावरण्याकडे असतो. प्रियाराधनेच्या वेळी नर हा माद्यांसमोर आपल्या रुबाबाचे प्रदर्शन करतो. तो अंगावरची पिसे उभारतो, शेपटीची पिसे वर उचलून पंख्यासारखी पसरतो, पंख लोंबते ठेवून त्यांची एकसारखी थरथर करीत राहतो आणि मुरडत ठुमकत थाटात नाचत राहतो. त्या दरम्यान गलकोष्ठ फुगवून तो खोल व बारीक आर्त स्वर काढत राहतो.

माळढोकाचे घरटे जमिनीवर एखाद्या झुडपाखाली उथळ खळग्यात गवत टाकून तयार केलेले असते. त्यात मादी एकच अंडे घालते. ते हिरवट-तपकिरी रंगाचे असून त्यावर फिकट-तपकिरी डाग असतात. मादी एकटीच अंडे उबविते आणि पिलाचे रक्षण करते. संकट काळात ती पिलाला पंखाखाली घेऊन त्याचे संरक्षण करते. घरट्यात अंडे असताना शत्रू जवळ आला, तर मादी पाय लोंबते ठेवून वेड्यावाकड्या तऱ्हेने उड्डाण करून शत्रूचे लक्ष विचलित करते व त्याला फसवून घरट्यापासून दूर नेते. काही कारणाने अंडे नष्ट झाले, तर मादी पुढील हंगामापर्यंत अंडे घालत नाही.

माळढोकाचे वैशिष्ट्य हे की, तो जमिनीवर वावरत असला, तरी उड्डाणक्षम असा सर्वांत मोठा पक्षी आहे (शहामृग व एमू हे पक्षी उड्डाणक्षम नाहीत). माळढोक पक्ष्यांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना कायद्याने संरक्षण दिलेले आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्ये राखून ठेवली आहेत. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकूरी येथील माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य ही विद्यार्थ्यांसाठी आकर्षण केंद्रे आहेत.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा