गर्भवती स्त्रीच्या एकाच प्रसूतीत एकापाठोपाठ दोन बालके जन्माला येतात, तेव्हा त्यांना जुळे म्हणतात. सामान्यपणे एका गर्भावधीच्या अखेरीस प्रसूती होऊन एक बालक जन्माला येते. परंतु त्याऐवजी दोन बालके जन्माला आल्यास त्यातील एका मुलाचा किंवा मुलीचा उल्लेख जुळे (ट्विन) करतात आणि त्या बालकांच्या जोडीचा उल्लेख जुळी किंवा जुळ्या अथवा ट्वि असा अनेकवचनी शब्दाने केला जातो.

जुळ्या बालकांचे दोन प्रमुख प्रकार असतात; एकयुग्मनज (मोनोझायगॉटिक) आणि व्दियुग्मनज (डायझायगॉटिक). एकयुग्मनज जुळ्यांचा उगम एक अंडपेशी आणि एक शुक्रपेशी यांच्यापासून तयार होणाऱ्या एकाच युग्मकापासून होतो. अशा युग्मकाच्या पहिल्या पेशीविभाजनानंतर तयार झालेल्या दोन पेशी काही कारणाने एकमेकांपासून अलग झाल्या की त्यातील प्रत्येक पेशी एका स्वतंत्र युग्मकाप्रमाणे वागते आणि स्वतंत्रपणे एक पूर्ण भ्रूण तयार करते. या दोन्ही भ्रूणांतील गुणसूत्रे आणि त्यावरील जनुके एकाच पेशीपासून तयार झालेली असल्यामुळे दोन्ही मुलांचे लिंग सारखेच असते. तसेच त्यांच्यात कमालीचे साधर्म्यअसते. त्यांना एक अंडज जुळे (आयडेंटिकल ट्विन्स) म्हणतात.

व्दियुग्मनज जुळ्यांचा जन्म हा एकावेळी विमोचित झालेल्या दोन वेगवेगळ्या अंडपेशींचे फलन दोन वेगवेगळ्या शुक्रपेशींद्वारे घडून आल्यामुळे होतो. या दोन्ही युग्मकांना त्यांच्या मातापित्यांपासून मिळणारी गुणसूत्रे, त्यांच्या ठायी असणारी जनुके आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या बालकांचे गुणधर्म सारखे असतीलच, असे नाही. तसेच ती दोन्ही बालके एकाच लिंगाची असतील, असेही नाही. अशा बालकांना व्दिबीज जुळे (फ्रॅटर्नल ट्विन्स) म्हणतात. या दोन प्रकारांच्या जुळ्या बालकांतील आणखीन काही भेद पुढीलप्रमाणे आहेत :

जुळे

एकयुग्मनज जुळ्यांना भ्रूणपटल (ॲम्निऑटिक मेंब्रेन), भ्रूणवेष्ट (कोरिऑनिक मेंब्रेन) आणि वार (प्लासेंटा) या बाबी सामायिक असतात, तर व्दियुग्मनज जुळ्यांना भ्रूणपटल, भ्रूणवेष्ट आणि वार स्वतंत्र असतात. एकयुग्मनज जुळ्यांचा उगम एकाच युग्मनजापासून होत असल्याने दोन्ही बालकांची गुणसूत्रे तंतोतंत सारखी असतात आणि त्यांची जनुकेदेखील एकसारखीच असतात. द्वियुग्मनज जुळ्यांच्या बाबतीत दोन्ही बालकांची गुणसूत्रे आणि जनुके एकसारखी असतीलच, असे नाही. एकयुग्मनज जुळ्यांमध्ये सर्व जनुकनियंत्रित गुणधर्मांमध्ये सुसंवाद आढळून येतो तसा तो व्दियुग्मनज जुळ्यांमध्ये आढळेल, असे नाही.

जुळी बालके जन्माला येण्याचे जगात सर्वाधिक प्रमाण पश्चिम आफ्रिकेत योरूबा वंशाच्या लोकांमध्ये आढळते. हे प्रमाण प्रतिहजार प्रसूतींमध्ये ४५-५० जुळ्या बालकांच्या जोड्या (म्हणजे ९०-१०० बालके) एवढे असते. जुळ्यांचे सर्वात कमी प्रमाण दक्षिण-पूर्व आशियाच्या भागात आढळते. हे प्रमाण प्रतिहजार १२-१८ बालके एवढेच आहे. काही कुटुंबियांच्या आहारात असलेल्या ‘याम’ या पदार्थाच्या सेवनातून मिळणाऱ्या नैसर्गिक पादपएस्ट्रोजेन (फायटोएस्ट्रोजेन) या घटकांमुळे स्त्रियांच्या दोन्ही अंडाशयांतून अंडविमोचन होत असल्याचे व एकाच वेळी दोन अंडपेशींचे फलन होत असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. तसेच जुळी बालके जन्माला घालण्याची प्रवृत्ती काही कुटुंबांत आणि त्यांच्या नातेसंबंधात आढळून आल्यामुळे ही प्रवृत्ती आनुवंशिक असावी, असेही मानले जाते.

एकयुग्मनज जुळ्यांचा एक विशेष प्रकार असा आढळतो की, यामध्ये दोन्ही बालकांची शरीरे एकमेकांच्या शरीराला काही प्रमाणात जुळलेली असतात. त्यात फक्त त्वचेपासून ते रक्तवाहिन्या, यकृत अशा शरीरांतर्गत अवयवांचाही समावेश असू शकतो. अशा बालकांना जन्मभर एकत्रच राहावे लागते. अशा जुळ्यांबद्दलची माहिती पहिल्यांदा सयाम (थायलंड) येथून मिळाली. म्हणून त्या बालकांना सयामी जुळी म्हणतात. यातील काही बालकांना शस्त्रक्रियेने एकमेकांपासून वेगळे करण्यात यश आले आहे.

एका प्रसूतीत दोनपेक्षा अधिक (तीन, चार वा पाच) बालके जन्मल्याच्याही नोंदी आहेत. अशी बालके आयडेंटिकल किंवा फ्रटर्नल असू शकतात. उदा., तिळ्यांमधील तीनही बालके भिन्न अंडपेशीपासून जन्मलेली ‘फ्रॅटर्नल’ असू शकतात किंवा दोन ‘आयडेंटिकल’ एकाच अंडपेशीपासून जन्मलेली आणि एक ‘फ्रॅटर्नल’ म्हणजे वेगळ्या अंडपेशीपासून बनलेली असू शकतात.

उंदीर, मांजर, कुत्रा, ससा अशा प्राण्यांमध्ये एका वेतात जास्त पिल्ले जन्माला येतात. या मादयांची गर्भाशये मोठी असणे आणि अंडाशयातून एका वेळी जास्त अंडपेशींचे विमोचन होणे, ही त्यामागील कारणे आहेत. हा जुळ्यांचा प्रकार मानता येतो. आर्मडिलो नावाचा सस्तन प्राणी नेहमी चौळ्यांना जन्म देतो आणि ती एकयुग्मनज असतात.