जीवाणू किंवा अन्य सूक्ष्मजीवांव्दारे जैविक पदार्थांच्या घडून येणाऱ्या रासायनिक अपघटनाला जैविक अवनती म्हणतात. यात जीवाणू, किण्व किंवा कवके यांव्दारे जैविक (सेंद्रिय) पदार्थांवर जैवरासायनिक क्रिया होतात आणि त्या पदार्थांचे रासायनिक अपघटन घडून येते. जैविक अवनती आणि मिश्रखत तयार होणे (कंपोस्ट) या दोन्ही क्रिया भिन्न आहेत. जैविक अवनती क्रियेत जैविक पदार्थांचा वापर सूक्ष्मजीवांमार्फत होतो आणि त्यापासून तयार झालेले घटक पुन्हा निसर्गाला मिळतात. या पदार्थांचे अपघटन ऑक्सिजनाच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत होऊ शकते. सूक्ष्मजीवांमार्फत पृष्ठीय ताण कमी करणारी जी रसायने (बायोसर्फक्टंट) स्रवली जातात त्या रसायनांमुळे जैविक अवनती घडून येत असते. पारिस्थितिकी, अपशिष्ट व्यवस्थापन, जैवऔषधे यांसंदर्भात जैविक अवनती ही संज्ञा वापरली जाते. जी उत्पादने अपघटनक्षम असतात, ती निसर्गाला पुन्हा मिळत असल्याने आणि त्यामुळे निसर्गाची हानी होत नसल्यामुळे त्यांना अलीकडे परिमैत्रीपूर्ण उत्पादने अशी संज्ञा वापरली जाते.
तेलतवंग जैविक अवनती

प्राणिजन्य, वनस्पतिजन्य आणि इतर सजीवांपासून निर्माण होणारे जैविक पदार्थ हे जैव – अपघटनक्षम असतात. तसेच काही कृत्रिम पदार्थ, जे प्राणिजन्य किंवा वनस्पतिजन्य यांसारखे असतात, त्यांचेही जैविक अपघटन घडून येऊ शकते. निसर्गात आढळणाऱ्या काही सूक्ष्मजीवांमध्ये खनिज तेल, पॉलिक्लोरिनेटेड बायफिनिल (पीसीबी), पॉलिअरोमॅटिक हायड्रोकार्बन, कीटकनाशके आणि काही धातू इत्यादींचे विघटन करता येण्यासारखी विकरे असतात. निसर्गात वेगवेगळ्या पदार्थांचे अपघटन वेगवेगळ्या त्वरेने होत असते. हे काम प्रभावीपणे होण्यासाठी सूक्ष्मजीवांना प्रकाश, पाणी आणि ऑक्सिजनाची गरज असते. उबदार हवामानात सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते. त्यामुळे तापमान हादेखील एक महत्त्वाचा घटक असतो. ऑक्सिजन वायूच्या उपस्थितीत होणाऱ्या जैविक अपघटन क्रियेचा वेग निर्माण होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड वायूच्या प्रमाणानुसार ठरतो, तर विनॉक्सी स्थितीत अपघटन क्रियेचा वेग मिथेन वायूच्या प्रमाणानुसार ठरतो. सागरी पर्यावरणात जीवाणूंव्दारे पूर्ण विघटन होण्यास सफरचंद एक महिने, कागदी रूमाल २-४ आठवडे, कापड ५ महिने, दुधाचा प्लास्टिकवेष्टित पुठ्ठ्याचा डबा ५ वर्षे, प्लास्टिक पिशव्या १०-२० वर्षे, प्लास्टिक बाटली १०० वर्षे असा वेगवेगळा कालावधी लागतो.

समुद्राच्या पृष्ठभागावर जहाजफुटीमुळे पसरणाऱ्या तेलाचे तवंग स्युडोमोनॉस प्रजातीचे जीवाणू अपघटित करतात. हा शोध आनंद मोहन चक्रवर्ती या भारतीय वैज्ञानिकाने लावला आहे. यासाठी त्यांनी स्युडोमोनॉस पुटीडा ही जाती विकसित केली आहे. प्लास्टिक वर्षानुवर्षे पर्यावरणात साचून राहते. त्यामुळे आता जैवविघटनक्षम प्लास्टिक निर्माण केले जात आहे. असे प्लास्टिक सेल्युलोज व केसीन यांपासून बनविले जाते. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातील निकामी मुद्रित मंडलांचे फलक (प्रिंटेड सर्किट बोर्ड) जाळले तर हवेत विषारी वायू मिसळतात. सध्या या पीसीबींचे जैविक अपघटन करता येईल का, यासंबंधी संशोधन चालू आहे.