ग्रीकांची सौंदर्यदेवता. प्रेम, कामभावना, प्रजननक्षमता यांच्याशीही ती निगडित आहे. रोमन लोकांमध्ये ती ‘व्हिनस’ म्हणून ओळखली जाते. एका मतप्रणालीनुसार तिची दोन रूपे मानली जातात. एक, ॲफ्रोडाइटी युरेनिआ ही आध्यात्मिक प्रेमाची देवता, तर दुसरी ॲफ्रोडाइटी पॅंडेमॉस ही शारीरिक आकर्षणाची देवता.
ॲफ्रोडाइटीच्या दोन जन्मकथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, ती झ्यूस व डायोन यांची कन्या. दुसऱ्या कथेनुसार, क्रोनोसने स्वतःचा पिता युरेनस याचा वध केल्यानंतर त्याची जननेंद्रिये समुद्रात टाकली. त्यांपासून निर्माण झालेल्या फेसापासून ॲफ्रोडाइटीचा जन्म झाला. सायप्रस बेट हे तिचे जन्मस्थान. अनुपम सौंदर्यवती अशा ॲफ्रोडाइटीला ‘ऑलिंपस’ या देवांचे निवासस्थान असलेल्या पर्वतावर प्रवेश देण्यात आला. ती अनेक स्त्रीदेवतांच्या मनात मत्सर व देवांच्या हॄदयात प्रेम निर्माण होण्यास कारणीभूत ठरली. तिच्या अभिलाषेने देवांमध्ये कलह निर्माण होऊ नये या हेतूने झ्यूसने तिचा विवाह कुरूप व सव्यंग अशा हिफेस्टसशी करून दिला. तरीही तिचे अनेक पुरुषांबरोबर विवाहबाह्य संबंध होते. एरिस, हर्मिस, डायोनिसस हे देव तसेच ॲडोनिस, ॲन्चायसिस हे मर्त्यपुरुष हे त्यांपैकी काही. ट्रॉयचा राजपुत्र पॅरिस याने हेरा, अथेना व अॅफ्रोडाइटी या तिघींमधून सर्वांत सुंदर स्त्री म्हणून ॲफ्रोडाइटीची निवड केली. त्याच्या या निर्णयाबद्दल तिने पॅरिसला हेलेन ही सौंदर्यवती देऊ केली. ही घटना नंतर झालेल्या ट्रोजन युद्धाचे मूलकारण ठरली. त्या प्रसंगी ॲफ्रोडाइटी ट्रोजन पक्षाच्या बाजूने होती.
समुद्री शिंपला, आरसा, गुलाब, कबूतर, बदक अशा काही प्रतीकांशी ती निगडित आहे. ॲफ्रोडाइटीची अनेक चित्रे आणि शिल्पप्रतिमा उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळातील कलाकृतींमध्ये तिचे चित्रण तिच्या भुरळ पाडणाऱ्या कंबरपट्ट्यासह केलेले आढळते. मात्र चवथ्या शतकानंतरच्या चित्र व शिल्पांमध्ये ती नग्न किंवा अर्धनग्न सुंदर स्त्री या स्वरूपात दिसून येते.
ग्रीस देशातील मिलोस बेट ‘ॲफ्रोडाइटीचे बेट’ म्हणून ओळखले जाते. ‘ॲफ्रोडाइटी ऑफ मिलोस’ (व्हिनस डि मिलो) ही जगप्रसिद्ध शिल्पप्रतिमा याच बेटावर १८२० साली सापडली होती.
संदर्भ :
- Rengarajan, T. Dictionary of World Gods and Goddesses, Delhi, 2008.
- Smith, William, Ed. A Dictionary of Greek and Roman Biography and Mythology, Vol.1, New York, 2007.
- UdayLal, L. A Simple Dictionary of Gods and Other Mythological Characters, New Delhi, 1999.
- https://greekgodsandgoddesses.net/goddesses/aphrodite
- https://www.greekmythology.com/pictures/Olympians/Aphrodite
समीक्षक – शकुंतला गावडे