ग्रीक दैवतशास्त्रातील सुप्रसिद्ध मातृदेवता. रोमन आणि इटालियन पुराकथेतिहासामध्ये डीमीटर ही ‘सेरेस’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ईजिप्शियन पुराकथेतिहासामध्ये प्रख्यात असलेल्या इसिसनामक भूदेवतेशी या देवतेचा संबंध जोडला जातो. डीमीटर ही देवता क्रोनस आणि रीया यांचे दुसरे अपत्य होय. ही देवता साफल्याचे, सुपीकतेचे, धान्यसंपन्नतेचे प्रतीक होय. इतर ग्रीक निसर्गदेवतांप्रमाणे डीमीटरसुद्धा गीया आणि रीया यांना सोपविलेली कार्ये बजाविताना दिसते. या दोन देवतांची वंशज म्हणून कार्य करणारी डीमीटर तिला अनुकूल वर्तन करणाऱ्यांना पुष्कळ धान्यसंपत्ती देते, तर तिला प्रतिकूल वर्तन करणाऱ्यांना ती दुष्काळाने ग्रस्त करते. तिच्या आकृत्यांमध्ये तिचा संबंध धान्य, फळे, फुले यांच्याशी दाखविला जातो. कृषिदेवता, धान्यदेवता, मातृदेवता अशी तिची संबोधने होत.

झ्यूस, पोसायडन व इतर अनेक देवतांचा डीमीटरचे प्रियकर/पती म्हणून उल्लेख आढळतात. पती झ्यूसकडून तिला पर्सेफोनी ही सुंदर कन्या झाली. बऱ्याचदा ती पर्सेफोनीसोबत दाखविली जाते. पर्सेफोनी ही रोमन लोकांमध्ये ‘प्रोसेर्पिना’ म्हणून प्रसिद्ध आहे. डीमीटर आणि पर्सेफोनी या आई-मुलीचे नाते अत्यंत दृढ असल्याचे ग्रीक पुराकथेतिहासामध्ये प्रख्यात आहे. त्याविषयी एक कथा सांगीतली जाते, ती अशी : झ्यूसने डीमीटरला न सांगता पर्सेफोनीला हेडीस नावाच्या पाताळदेवतेला देऊ केले. झ्यूसने तिला मोहात पाडण्यासाठी आपल्या बागेमध्ये काही फुले लावली होती. एके दिवशी ती वेचत असता हेडीसने पृथ्वीचे पोट फाडून पर्सेफोनीला आपल्या पाताळलोकात पळवून नेले. आपली लाडकी मुलगी हरविल्याने डीमीटरने सगळीकडे शोधाशोध सुरू केली. पर्सेफोनीला हेडीसने पळवून नेले आहे आणि या कटामध्ये झ्यूसचाही सहभाग असल्याचे हीलिऑस या सूर्यदेवतेकडून तिला कळले. यामुळे रागावलेल्या डीमीटरने ऑलिंपसवर न जाता पृथ्वीवरच राहण्याचा निश्चय केला. जिथे यथायोग्य वागणूक मिळत असे, तिथे डीमीटर लोकांना अनेक वर देत असे. जिथे तिचा योग्य आदर होत नसे, तिथे ती त्यांना शाप देत असे. आपल्या मुलीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या, रुसलेल्या डीमीटरमुळे पृथ्वीवर कोठेही धान्य पिकत नव्हते. सगळीकडे दुष्काळ पडला. तसेच डीमीटरने देवतांना यज्ञीय फळापासून वंचित ठेवण्याची ताकीद दिली. तिचा वाढता क्रोध शमविण्यासाठी झ्यूसने हर्मिसच्या मदतीने हेडीसकडून पर्सेफोनीला परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेरीस हेडीसच्या मनाविरुद्ध पर्सेफोनी पुन्हा तिच्या घरी परतली. ती परतत असताना हेडीसने तिला डाळिंबाचे काही दाणे खायला दिले. हे दाणे कोणाही मर्त्याने खाल्ले असता त्याला कायम पाताळामध्ये राहावे लागेल, असा तिथला नियम होता. त्यामुळे पुढे पर्सेफोनी आणि डीमीटरची भेट झाल्यावर हेडीसने पर्सेफोनीवर आपला हक्क पुन्हा सांगितला. डीमीटरच्या रागाने पुन्हा पृथ्वीवर अवकाळ येऊ नये म्हणून झ्यूसने हेडीसकडून एक सूट मागितली. या सूटनुसार पर्सेफोनी वर्षातील एकतृतीयांश कालावधी हेडीससोबत व्यतीत करायचा आणि इतर वेळी डीमीटरसोबत पृथ्वीवर राहायचे. यामुळे ग्रीक लोकांच्या समजुतीनुसार पेरणीपासून ते पिकांचे धान्यात रूपांतर होइपर्यंतचा काळ हा पर्सेफोनीच्या डीमीटरसोबत वास्तव्याचा द्योतक असतो. तर जेव्हा पेरणी होत नाही, तेव्हा ती हेडीससोबत पाताळात राहत असते. डीमीटर व पर्सेफोनी यांची ही कथा परिवर्तनशील ऋतुचक्र व जन्म-मृत्यू यांचे प्रतीक होय.

ॲटिकामधील मेगारा या शहरामध्ये कार नावाच्या फोरोनिअसच्या मुलाने डीमीटरचे एक मंदिरही उभारल्याचे म्हटले जाते. प्लेम्निअसनामक सिसिऑनच्या राजाचा एकही मुलगा जिवंत राहत नव्हता. तेव्हा डीमीटरने मर्त्य स्त्रीच्या रूपामध्ये येऊन त्याच्या ऑर्थोपलीस नावाच्या मुलाला वाढविल्याचे म्हटले जाते.

डीमीटर ही आरोग्य, जन्म व विवाहाचीही देवता मानली जाई. तिचे विविध उत्सव ग्रीसमध्ये साजरे होत. ‘हलोआ’ नावाचा तिचा उत्सव इल्यूसिस येथे डिसेंबरमध्ये होई. त्यात पहिली फळे तिला अर्पण केली जात व स्त्रीपुरोहिताकडून तिला डुकराचा अथवा गाईचा बलीही अर्पण केला जाई. ‘क्लोइआ’ नावाचा उत्सव पिके उगवण्याच्या वेळी तिला संतुष्ट करण्यासाठी साजरा होई. ‘प्रोइरोसिआ’ हा उत्सव सुगीच्या वेळी विपुल धान्य मिळावे म्हणून होई आणि त्यात तिची प्रार्थनागीते म्हटली जात. यांतील सर्वांत महत्त्वाचा विधी म्हणजे तीन वेळा करण्यात येणारी भृमीची नांगरटी. थेस्मोफोरिआनामक केवळ स्त्रियांनी साजरा करायचा उत्सव बियाण्याची उत्पादनक्षमता वाढावी म्हणून डीमीटरच्या प्रीत्यर्थ साजरा केला जात असे.

ग्रीक कलेत ती हेरासारखी दिसत असली, तरी हेराहून ती अधिक पोक्त व सौम्य वाटते. तिचा बांधा रुंद व परिपूर्ण असून ती कधी अश्व वा ड्रॅगन्स जोडलेल्या रथावर आरूढ; तर कधी चालत असलेली; तर कधी सिंहासनाधिष्ठित एकटी वा मुलीसमवेत बसलेली आढळते.

संदर्भ :

  • Barthell, Edward E. Gods and Goddesses of Ancient Greece, Florida, 1971.
  • Cotterell, Arthur, A Dictionary of World Mythology, Oxford, 1990.
  • Pinsent, John, Greek Mythology, Oxford, 1982.

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे