प्रेम, कामभावना व लैंगिक आकर्षण यांचा अधिष्ठाता असलेला ग्रीक देव. प्राचीन मतानुसार तो स्वयंभू आहे, तर नंतरच्या काळात एरिस व ॲफ्रोडाइटी यांचा पुत्र असे त्याचे चित्रण दिसते. ऑलिंपस पर्वत हे त्याचे निवासस्थान. होमरच्या इलियड महाकाव्यामध्ये एरॉसचा उल्लेख नाही. मात्र हीसिअडच्या रचनांमध्ये वैश्विक देव या स्वरूपात त्याचे वर्णन येते.
डोळे झाकलेला, धनुष्यबाणधारी पुरुष अशा रूपात तो दिसतो. विविध प्रकारच्या बाणांनी भरलेला भाता त्याच्याजवळ असतो. त्याने नेम साधलेला माणूस प्रथमदृष्टिपथात येणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. कधीकधी तो सोनेरी पंखांसहित, पक्ष्याप्रमाणे उडणारा या रूपात दिसतो. गुलाबपुष्प, धनुष्यबाण, ससा, कोंबडा तसेच त्याने पाळलेले वाघ, सिंह या गोष्टी त्याला प्रिय आहेत.
रोमनांत तो क्युपिड म्हणून प्रसिद्ध आहे. गुटगुटीत, गोबऱ्या गालांचे लहान बालक या आधुनिक काळातील प्रसिद्ध रूपात तो येथे दिसतो. पूर्वसूचना न देता तो हेरलेल्या व्यक्तीच्या हृदयाचा वेध घेतो. एरॉसचे चित्रण शिल्पकृतींमध्ये ‘धनुर्धारी तरूण’ तर मोझेइक कलाकृतींमध्ये ‘पंख असलेले सुदृढ बालक’ असे केलेले आढळते. त्याचा धाकटा भाऊ ॲन्टेरॉस हा अप्रतिसादित प्रेमाचा सूड घेणारा आहे.
मर्त्यलोकातील राजकन्या साईक हिच्याबरोबर त्याच्या असलेल्या नात्याविषयी एक कथा प्रसिद्ध आहे. साईकच्या सौंदर्याचा मत्सर वाटून ॲफ्रोडाइटीने एरॉसला सांगितले की, त्याने तिला सर्वांत कुरुप पुरुषाच्या प्रेमात पडण्यास भाग पाडावे. परंतु तोच तिच्या प्रेमात पडला आणि स्वतःच्या स्वर्गीय निवासस्थानी तिला घेऊन गेला. नंतर साईकच्या मत्सरी बहिणींच्या कारस्थानामुळे गैरसमज निर्माण होऊन एरॉसने तिचा त्याग केला. कालांतराने ॲफ्रोडाइटीच्या मदतीने त्या दोघांचे मिलन झाले. साईकला अमरत्व मिळाले व तिला एरॉसपासून हेडोन ही कन्या झाली.
संदर्भ :
- Udaylal, L. A Simple Dictionary of Gods and Other Mythological Characters, New Delhi, 1999.
- www. greek-gods.info/ancient
- https://www.greekmythology.com
- www.theoi.com /Ouranios/Eros
समीक्षक – शकुंतला गावडे