अ‍ॅल्सिडीनिडी या पक्षीकुलातील प्रामुख्याने मासे खाणार्‍या हा एक पक्षी आहे. या पक्ष्याच्या जगभर सु. ९० जाती असून त्या बहुतांशी उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत आढळतात. त्यांच्या आकारांत तसेच रंगांत विविधता असते. काही आकाराने चिमणीहून लहान तर काही कबुतराहून मोठे असतात. तसेच रंगाने काही काळे-पांढरे, काही आकर्षक निळे-विटकरी, तर काही तेजस्वी जांभळे आसतात. भारतातील पाच-सहा जातींपैकी एक सामान्य जाती असून ती सगळीकडे आढळते. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅल्सिडो थिस आहे.

खंड्या चिमणीपेक्षा किंचित मोठा असून त्याच्या शरीराची लांबी सु. १८ सेंमी. असते. डोक्याच्या वरचा भाग निळा व त्यावर आडव्या काळ्या रेषा असतात. पाठ तकतकीत निळी व पंख हिरवट निळे असतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर विटकरी, निळा आणि पांढरा रंग असतो. हनुवटी व गळा पांढरा आणि पोटाकडील भाग विटकरी असतो. चोच लांब, जाड, काळी व टोकदार असते. पाय आखूड व लाल रंगाचे असतात. शेपूट आखूड असते. बाह्य स्वरूपावरून नर व मादी वेगळे ओळखता येत नाहीत.

मासे हे खंड्याचे आवडते भक्ष्य आहे. त्यामुळे नदी, ओढे, तळी यांच्या काठी तो हमखास दिसतो. मासे पकडण्याची त्याची पद्धत विलक्षण असते. झाडाच्या एखाद्या फांदीवर किंवा लव्हाळ्याच्या झुडपावर बसून तो भक्ष्य टेहळीत असतो. मधूनमधून आपले डोके हलवीत ‘क्लिक्’, ‘क्लिक्’ किंवा ‘किल्’, ‘किल्’ असा आवाज काढतो. पाण्यात मासा दिसताच तिरकस सूर मारून मासा चोचीत पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो व त्याला गिळतो. माशांखेरीज कीटक, खेकडे व बेडकांची पिले तो खातो. हवेत उडणारे कीटक हा मोठ्या चपळाईने पकडतो.

जलाशयाच्या काठी तसेच पाणथळ भागात हा पक्षी घरटे बांधतो. याचे घरटे नदीकाठच्या डगरीत ०.३-१.२ मी. लांब व आडवे खणलेले बीळ असते. त्यात कीटकांचे पंख व माशांची हाडे अस्ताव्यस्त पडलेली असतात. अंड्यांसाठी बिळाच्या आतील टोकाचा भाग मुद्दाम रुंद केलेला असतो. याची वीण मार्चपासून जूनपर्यंत होते. मादी एका वेळेला ५-७ तकतकीत अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम नर व मादी दोघेही करतात.

साळुंकीपेक्षा मोठी व पारव्यापेक्षा लहान अशी खंड्याची एक जात भारतात आढळते. याचे शास्त्रीय नाव सेरील रुडीस आहे. याचा रंग पांढरा असून त्यावर लहान मोठे काळे ठिपके व पट्टे असतात. याच्या डोक्यावर मागे वळलेला लहान तुरा असतो. याची मासे पकडण्याची रीत प्रेक्षणीय असते. पाण्याच्या पृष्ठभागापासून ८-१० मी. उंचीवर पंख एकसारखे हालवीत तो तरंगत असतो. खाली पाण्यात मासा दिसला की, पंख मिटून एखादा दगड जसा वरून पाण्यात पडावा त्याप्रमाणे तो धाड्कन पाण्यात पडतो व मासा चोचीत धरून बाहेर येतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा