पारशी धर्मामधील एक महत्त्वाची संकल्पना. अष म्हणजे दैवी वैश्विक नियम. प्राचीन पर्शियन भाषेत तिचा उल्लेख अर्त असा केला जातो. सत्य किंवा नैतिकता असा या संकल्पनेचा अर्थ होय. त्यामुळे सत्याचे पालन करणार्‍याला अवेस्त्यात ‘अषवान’ किंवा ‘अर्तवान’ असे संबोधले गेले आहे. अष या कल्पनेच्या अगदी विरोधी ‘द्रुग’ ही संकल्पनाही अवेस्त्यात दिसून येते. त्यामुळे चुकीच्या मार्गाने जाणारे किंवा नैतिक धर्माचे पालन न करणारे येथे ‘द्रुग्वान’ म्हटले जाते.

पारशी धर्मात सहा अमॅष स्पॅंत मानले गेले आहेत. अमॅष स्पॅंत म्हणजे अमर किंवा पावक गुण. वोहुमन: (चांगला विचार), अषवहिष्त (पूर्ण नीतिमत्ता), क्षथ्र वइर्य (ईप्सित राज्य), स्पॅंत अमैंति (पवित्र ऐक्य), हौर्वतात (आरोग्यरक्षण) आणि अमेरेतात (अमरत्व). अष हे त्यांपैकी एक. हे गुण म्हणजेच अहुर मज्दचे खरे अस्तित्व होय.

‘हुमत, हूख्त, ह्वर्ष्ट’ म्हणजेच ‘सद्विचार, चांगली वाणी आणि सत्कर्म’ असे या संकल्पनेचे वर्णन केले जाते. सत्य, प्रामाणिकपणा, शौच, उद्यम, कर्तव्य, धार्मिकता, सहिष्णुता तसेच परोपकार या मानवी जीवनातील सगळ्या सद्गुणांचा अंतर्भाव अष या संकल्पनेत होतो. अवेस्त्यामध्ये अषाच्या धर्म्य मार्गाचे वर्णन ब‍र्‍याच ठिकाणी दिसून येते. या अषाच्या मार्गावर अहुर मज्द राहतो (यश्त ३३.५) किंवा ‘हे वोहु मनह, हा अषाचा गमनीय मार्ग अनुसरण्याची शिकवण तू आम्हास दे!’ (यश्त ३४.१२) अशी प्रार्थना आढळते. अष ही संकल्पना पारशी धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची असल्याने बऱ्याचदा अषाचे एकत्व अहुर मज्दाशी कल्पिले जाते.

अहुर मज्दाने निर्माण केलेले हे जग अष या तत्त्वाने नियमित आहे. हे तत्त्व दिवसाचा प्रकाश, आकाश आणि सूर्य यांद्वारे प्रतिबिंबित होत असते. अवेस्त्यामध्ये अग्नी हा अष या संकल्पनेचे पावित्र्य राखणारा महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. अहुर मज्द हा या अष तत्त्वाचा पालक तसेच नियंता आहे. अष हे नंतरच्या काळात झरथुष्ट्र तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान राहिलेले आहे. झरथुष्ट्रानेही अहुर मज्द अषाचा पालक आणि कल्याणदेष्टा असे  संबोधले आहे. किंबहुना, अषाद्वारेच झरथुष्ट्र अहुर मज्दाला जाणतो. नंतरच्या काळात अषाला ‘वहिश्त’ म्हणजे श्रेष्ठ हे विशेषण बहाल केलेले दिसून येते.

संदर्भ :

                                                                                                                                                                    समीक्षक – शकुंतला गावडे

प्रतिक्रिया व्यक्त करा