पार्श्वभूमी : १९७१च्या भारत-पाक युद्धात पश्चिमी सीमेवर बसंतर नदीची लढाई सर्वांत महत्त्वाची आणि निर्णायक होती, जिच्यात पाकिस्तानच्या सैन्याचा दारुण पराभव झाला. १९७१च्या युद्धात भारतीय सैन्यदलांना दोन आघाड्यांवर लढणे अनिवार्य होते. पूर्व सीमेवर बांगला देशला मुक्त करणे मुख्य ध्येय असले, तरी पश्चिमी आघाडीवर युद्ध होणार याबद्दल शंका नव्हती व त्याप्रमाणे योजना बनविण्यात आल्या होत्या. बसंतर नदीची लढाई पंजाब आणि जम्मू व काश्मीर राज्यांच्या सीमेवर झाली; जिथे भारताच्या ५४ पायदळ विभागाने १६ कवचित (Armored) ब्रिगेडच्या साहाय्याने पाकिस्तानच्या शकरगढ गावाच्या दिशेने आक्रमण केले. हल्ल्याची दिशा आणि लक्ष्य समजताच पाकिस्तानच्या ८ कवचित ब्रिगेडने त्यांच्यावर बसंतर नदीच्या परिसरात प्रतिकारक हल्ला केला व भारतीय रणगाडे, पायदळ, तोफखाना आणि सैनिकी अभियंता (Engineers) यांच्या तुकड्यांनी एकत्र सहकार्याने आणि कौशल्याने हल्ल्याचा पराभव केला यशस्वी रीत्या परतविला.

भौगोलिक स्थिती आणि उद्दिष्टे आणि भारतीय योजना : पश्चिमी सीमेवर विशेषकरून मैदानी क्षेत्रात नैसर्गिक अडथळे नसल्यामुळे दोन्ही लष्करांनी संरक्षणासाठी डिच-कम-बंध निर्माण केले होते. ५४ पायदळ विभागासमोर ‘सुपवाल डिच’ होता. याला पाकिस्तान ‘सुक्रोर बंध’ म्हणायचे. या विभागाचे मुख्य मेजर जनरल डब्ल्यू. ए. जी. पिंटो यांना सुपवाल डिचवर हल्ला करून पुढे झफरवाल गावापर्यंत आक्रमण करून ते जिंकण्याचे उद्दिष्ट (Task) दिले होते. डिचवर समोरासमोर हल्ला करणे घातक ठरले असते. म्हणून जनरल पिंटोंनी योजना केली की, सुपवाल डिचच्या पूर्वेकडून वळसा घालत मागून बसंतर नदी ओलांडून डिचवर अनपेक्षित दिशेने हल्ला करायचा. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या चारही ब्रिगेडना (४७, ७४ आणि ९१ Infantry व १६ Armored Brigade) आक्रमणाचे लक्ष्य दिले. ३ डिसेंबरला संध्याकाळी पाकिस्तानने हल्ला केला व जनरल पिंटोंनी ५४ पायदळ विभागाला आगेकूच करण्याचे आदेश दिले.

सैन्य बलाबल आणि लढाईचा वृत्तांत : दिवसा हालचाली केल्याने शत्रूला पूर्वसूचना मिळेल म्हणून ५४ पायदळ विभागाने ४ डिसेंबरच्या रात्री हल्ल्याचे मोर्चे स्थापन केले व ५ डिसेंबरच्या रात्री सीमा पार करून आक्रमण केले. हे आक्रमणाचे क्षेत्र ‘देग’ आणि ‘करीर’ या नद्यांमधील भागांत होते. पाक लष्कराने बचावासाठी एक हजार मीटर रुंदीचे सुरुंगाचे पट्टे स्थापित केले होते. हे पार करत पुढे जात असताना विभागाला करीर नदीच्या पूर्व काठावर असलेल्या ‘देहलरा’ आणि ‘चक्रा’ गावांवर कबजा करण्याचे काम करणे भाग होते. ही दोन्ही गावे १०-११ डिसेंबरच्या रात्री अत्यंत शौर्याने ७४ ब्रिगेडने सर केली. आता परत ५४ पायदळ विभाग दक्षिणेकडे कूच करण्यास सज्ज झाली होती.

१६ कवचित ब्रिगेडच्या १७ पूना हॉर्स आणि १८ राजपुताना रायफल्स या तुकड्यांनी १३ डिसेंबरच्या रात्री बसंतर नदी ओलांडायचा प्रयत्न केला; पण दलदलीमुळे ते यशस्वी झाले नाही. आता ४७ पायदळ ब्रिगेडला हे काम हल्ला करून सर करायचे आदेश दिले गेले. १५ डिसेंबरला रात्री ४७ ब्रिगेडच्या ३ ग्रेनेडियर्स व १६ मद्रास या पलटणींनी बसंतर नदीपलीकडे हल्ला केला व त्याच वेळी ९ अभियंता पथकाने शौर्याने सुरुंगातून वाट काढली. रात्रीची लढाई अत्यंत जिकिरीची झाली. व पहाटे अभियंत्यांनी बनविलेल्या वाटेवरून १७ पूना हॉर्स आणि १८ राजपुताना रायफल्स यांचे रणगाडे व चिलखती गाड्या नदी पार करत अपेक्षित पाक प्रतिहल्ल्याच्या तयारीत सज्ज राहिले.

तिकडे पाक लष्कराला पूर्ण माहिती समजली नाही. लढाईत नेहमीच असे होते. अर्धवट माहिती आणि योजनेने पाकिस्तानच्या ८ कवचित ब्रिगेडच्या ३१ कॅवलरी पथकाने सकाळ उजाडताच उत्तरेच्या बाजूने हल्ला केला. समोरासमोरच्या लढाईत पूना हॉर्सने वरिष्ठ दर्जाच्या प्रशिक्षणाचा आणि अत्युच्च शौर्याचा वापर करून आपल्या ‘सेंच्युरियन’ रणगाड्यांनी पाकिस्तानच्या ‘पॅटन’ रणगाड्यांचा यथायोग्य समाचार घेतला. आता लक्ष दक्षिणेकडे केंद्रित झाले. पाक ब्रिगेड कमांडरने त्यांच्या नामांकित ‘१३ लान्सर्स’ पथकाला रणांगणात उतरविले व दोन शूर आणि प्रख्यात तुकड्या यांच्यात घनघोर धुमश्चक्री झाली. एक वेळ अशी आली होती की, पाक रणगाड्यांची सरशी होईल असे वाटले होते; पण याच वेळी सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांनी अविस्मरणीय शौर्य दाखवित व आपले प्राण गमावून हल्ला परतविला. अखेर पाकला अपयश मान्य करावे लागले. खेतरपाल यांना मरणोत्तर परमवीर चक्र या शौर्यपदकाने भूषविण्यात आले.

१६ डिसेंबरची संध्याकाळ होईपर्यंत पाकिस्तानच्या ८ कवचित ब्रिगेडची दोन पथके उद्ध्वस्त झाली होती. आता रात्री येणाऱ्या पायदळाच्या प्रतिहल्ल्याची आपले जवान प्रतीक्षा करत होते; कारण त्या काळात रणगाडे रात्रीच्या अंधारात लढू शकत नव्हते. पाक ब्रिगेडची एक पायदळाची तुकडी (34 Frontier Force) व एक रणगाड्यांची तुकडी अजून रणांगणावर उतरायची होती. पण इतक्या दारुण पराभवानंतर पाक ब्रिगेड कमांडर गलितगात्र झाले होते. अखेर रात्री, विशेष तयारी आणि योजना यांच्या अभावी ३४ फ्रंटियर फोर्सने हल्ला केला व भारताच्या ३ ग्रेनेडियर्स पलटणीने त्याचा पराभव केला. याच रात्री जखमी झाल्यानंतरसुध्दा दाखविलेल्या अप्रतिम शौर्यासाठी मेजर होशियार सिंह यांना परमवीर चक्र देण्यात आले. १९७१च्या युध्दात एकंदर फक्त चार परमवीर चक्र दिली गेली होती. त्यांतील दोन बसंतर नदीच्या लढाईत प्राप्त झाल्यामुळे या चकमकीचे महत्त्व लक्षात येते. दुसऱ्या दिवशी, १७ डिसेंबरला सकाळी पाकिस्तानच्या उरलेल्या रणगाड्याच्या पथकाने हल्ला चढविला; पण त्यात ताकत नव्हती आणि तो हल्ला अयशस्वी ठरला.

आतापर्यंत पूर्व सीमेवर बांगला देश मुक्त झाला होता. निर्णायक युध्द त्या आघाडीवर असल्यामुळे व पराजय झाल्यामुळे पाकिस्तानने शरणागती पतकरली. १७ डिसेंबर रोजी आदेश आले की, रात्री ८ वाजता शस्त्रसंधी लागू होईल. उरलेल्या वेळात दोन्ही सैन्यांच्या तोफखान्यांनी भडिमार चालू ठेवला. अखेर ठरलेल्या वेळी रणांगणावर शांतता पसरली. ३ ते १७ डिसेंबर या काळात ५४ पायदळ विभाग आणि १६ कवचित ब्रिगेड यांनी भारतीय सैन्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहीला. एकूण या लढाईत, दोन परमवीर चक्र, एक परमविशिष्ट सेवा पदक (Major General Pinto), नऊ महावीर चक्र, २७ वीर चक्र, तीन अतिविशिष्ट सेवा पदक, नऊ विशिष्ट सेवा पदक, ५२ सेना पदक आणि ९३ मेन्शन इन डिस्पॅचेस, अशी शौर्य पदके बहाल करण्यात आली.

संदर्भ :

  •  Palsokar, R. R. History of the Black Arrow Briged, 2004.
  •  Pinto, W. A. G. Bash on Regardless, Dehra Dun, 2011.
  •  Singh, Hanut, Fakhr-e-Hind : The Story of Puna Horse, Dehra Dun, 1993.

समीक्षक – शशिकांत पित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा