थेलीझ, मायलीटसचा : (इ.स.पू. सातवे-सहावे शतक). ग्रीक तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणिती व ग्रीसमधील सात विद्वानांपैकी एक. त्याला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक मानला जातो. आशिया मायनरच्या पश्चिमेकडे ग्रीक लोकांच्या वसाहती होत्या. त्यांना ‘आयोनिया’ असे म्हणत. त्यात क्रीटच्या लोकांनी वसविलेले मायलीटस नावाचे शहर होते. याच शहरात थेलीझचा जन्म झाला. त्याच्या जन्मठिकाणावरून त्याच्या तत्त्वज्ञानाला ‘आयोनियन’ किंवा ‘मायलीशियन’ तत्त्वज्ञान असे म्हणतात. त्याच्याविषयी फारशी माहिती मिळत नाही; कारण त्याचे कोणतेही लिखाण उपलब्ध नाही. त्याच्या शिष्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून त्याच्याविषयी माहिती मिळते.

ग्रीक इतिहासकार हीरॉडोटस याने असे नमूद केले आहे की, लीडिया व मिडीस या देशांमधील युद्ध संपण्याचे प्रमुख कारण असलेले इ.स.पू. ५८५ वर्षी २८ मे रोजीचे झालेले सूर्यग्रहण होय. थेलीझने या सूर्यग्रहणाविषयीचे भाकीत अचूक वर्तविले होते. त्यामुळे भौतिकशास्त्रज्ञ म्हणूनही थेलीझची ख्याती होती आणि म्हणूनच लीडियाचा राजा क्रोसस याने त्याची दरबारात नेमणूक केली होती. त्याच्याविषयीच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत.

ग्रीसमध्ये भूमितीय तत्त्वांचा पायादेखील थेलीझनेच रचला. त्यामुळे भूमितीची काही प्रमेये त्याच्या नावावर टाकली जातात. भूमितीच्या तत्त्वांच्या साहाय्याने त्याने झाडाच्या व पिरॅमिडच्या सावलीच्या आधारे त्यांची उंची कशी मोजावी, हे शोधून काढले. त्याचबरोबर दोन ठिकणांवरील निरीक्षणाच्या साहाय्याने समुद्रातील नावेचे अंतर कसे मोजावे, हेदेखील त्यानेच शोधून काढले.

थेलीझच्या मते पृथ्वी ही सपाट तबकडीसारखी असून ती पाण्यावर तरंगते. या त्याच्या मताला त्याचा शिष्य ॲनॅक्सिमँडर याच्याखेरीज इतर शिष्यांनी दुजोरा दिला. थेलीझचा सर्वांत महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे सर्व वस्तूंचे आदि व मूलद्रव्य ‘जल’ असून विश्वातील सर्व वस्तूंची उत्पत्ती, स्थिती आणि लय जलातच होत असतो. त्या काळी ग्रीक समाजावर धार्मिक पुराकथांचा व कल्पनांचा मोठा पगडा होता. थेलीझचे हे विचार त्या काळातील प्रचलित विचारसरणीच्या विरूद्ध असले, तरी अत्यंत शास्त्रशुद्ध होते. नैसर्गिक घटनांचे विवरण नैसर्गिक शक्तींच्या आधारे अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वप्रथम थेलीझनेच केले.

थेलीझला पाणी हे या विश्वाचे आदि व मूलद्रव्य असले पाहिजे, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे; कारण मायलीटस हे शहर समुद्रकिनाऱ्यावर वसलेले होते व पाण्यावरील नित्य स्थित्यंतरे ही त्याच्या दैनंदिन जीवनातील निरीक्षणाचा एक भाग होती. थेलीझचा पट्टशिष्य ॲनॅक्सिमीनीझ याच्या विवेचनावरून असे कळते की, सृष्टी तीन अवस्थांमध्ये विभागली जाते. स्थायू, द्रव आणि वायू. पाण्याला या तीनही अवस्था प्राप्त होऊ शकतात. द्रव ही जरी पाण्याची स्वाभाविक अवस्था असली, तरी उष्णता दिल्यावर त्याची वाफ होते व त्याचे घनीभवन झाल्यावर बर्फ बनतो. त्यामुळे स्थायू आणि वायू या पाण्याच्या परिणत अवस्था आहेत आणि म्हणून थेलीझला पाणी हे मूलद्रव्य वाटले असावे.

ॲरिस्टॉटलच्या मते थेलीझला पाणी हे विश्वद्रव्य वाटणे स्वाभाविक आहे; कारण सर्व वस्तूंचे पोषण त्यामुळे होते. त्यात उष्णता व आर्द्रता असते. त्याच्यामुळे जडवस्तू विरघळतात, फुटतात, मऊ होतात व त्यांचे विघटन होते व सुट्या वस्तूंना घट्टपणा देण्याचे कामही पाणी करते. प्राणिमात्रांच्या जीवनाचा आधार असलेले जलचक्रसुद्धा पाण्यामुळेच घडते.

थेलीझने जगाचे मूलकारण नित्य, शाश्वत, स्थिर, अपरिवर्तनीय, अविकारी द्रव्यात मानणे त्याच्या वैज्ञानिक विचारांचे द्योतक आहे. मूलतत्त्वाविषयीचा हा विचार जेवढा वैज्ञानिक, तेवढाच तत्त्वज्ञानास पूरक असा आहे.

संदर्भ :

  • Burnet, John, Greek Philosophy : Thales to Plato, London, 1961.
  • Dutt, R. Philosophy in Ancient Greece, Banglore, 1990.
  • Masih, Yakub, Critical History of Western Philosophy, Delhi, 1993.
  • केतकर, द. गो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान पुष्प १ ले ग्रीक आद्यतत्त्वज्ञ थेल्स व त्याचे शिष्य, मुंबई, १९३१.
  • शर्मा, चन्द्रधर, पाश्चात्त्यदर्शन, दिल्ली, १९९१.
  • सिंह, बी. एन. पाश्चात्त्यदर्शन, वाराणसी, १९९२.

 समीक्षक : शकुंतला गावडे