ॲनॅक्झिमीनीझ : (इ.स.पू. सु. ५८८—५२४). प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता. आयोनियन किंवा मायलीशियन विचारपंथातील तिसरा तत्त्वज्ञ. थेलीझ हा पहिला, त्याचा शिष्य ॲनॅक्झिमँडर हा दुसरा आणि त्याचा शिष्य ॲनॅक्झिमीनीझ (ॲनॅक्झिमीनस) हा तिसरा. प्राचीन तीन ग्रीक निसर्ग तत्त्ववेत्त्यांची त्रयी येथे पूर्ण होते. ॲनॅक्झिमीनीझ हा थेलीझचा प्रशिष्य होता. सुरुवातीस ॲनॅक्झिमीनीझ हा ॲनॅक्झिमँडरचा मित्र आणि सहाध्यायी होता. नंतर त्याने ॲनॅक्झिमँडरला गुरू मानले. ॲनॅक्झिमीनीझ हासुद्धा आपल्या दोन्ही गुरुंप्रमाणे मायलीटस प्रांताचा रहिवासी होता. त्याच्या जन्मकाळाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

ॲनॅक्झिमीनीझच्या पित्याचे नाव युरिस्ट्रेटस होते. ॲनॅक्झिमीनीझचा उल्लेख त्याच्यानंतरच्या बहुतेक तत्त्ववेत्त्यांनी आणि इतिहासकारांनी ‘युरिस्ट्रेटसचा पुत्र’ म्हणून केल्याचे आढळते. त्रोटक आयोनिक गद्यात लिहिलेले त्याचे लेखन ॲरिस्टॅाटलच्या काळापर्यंत उपलब्ध होते. त्याने ग्रंथलेखन केले असावे. त्याच्या तत्त्वज्ञानाची माहिती प्लेटो, ॲरिस्टॉटल आणि दुसऱ्या शतकातील दमास्कसचा अपोलोडोरस या सिरियन ग्रीक अभियांत्रिक, शिल्पकार, वास्तुरचनाकाराने त्याच्याविषयी जे लिहिले त्यावरून मिळते. डायोजिनस लेर्सियस या तिसऱ्या शतकातील ग्रीक चरित्रकाराने ॲनॅक्झिमीनीझच्या लेखनशैलीचे वर्णन ‘साधी मितभाषी आयोनियन शैली’ असे केले आहे.

या विश्वाची चालना म्हणजे कोणत्याही दोन विरुद्ध तत्त्वांचा संघर्ष असून एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी ही तत्त्वे झगडत असतात, असे प्रतिपादन ॲनॅक्झिमँडरने केले. ॲनॅक्झिमीनीझने जणू त्या संकल्पनेचा विकास केला. त्याच्या मते ‘अनंत वायू’ हे विश्वाचे मूळ कारण किंवा ‘आदितत्त्व’ आहे. त्यासाठी त्याने Aer हा शब्द वापरला. जे अस्तित्वात येत आहे, जे अस्तित्वात आलेले आहे आणि जे अस्तित्वात येईल, ते सर्वच वायूपासून येते. देव आणि देवता वायूपासून येतात आणि इतर सर्व गोष्टी ह्या ‘त्या’च्या अपत्यापासून म्हणजे देव आणि देवतांपासून येतात. सृष्टी किंवा विश्वे अनंत आहेत. ती सारी वायूपासून निर्माण होत राहतात.

ह्या आदितत्त्व वायूचे स्वरूप असे सांगता येईल : ‘जेव्हा वायू सर्वाधिक समरूप (Homogeneous) असतो, तेव्हा तो अदृश्य असतो. पण उष्ण व शीत तसेच आर्द्र व गतिमान ह्या तत्त्वांकडून तो दृश्य केला जातो. तो चलनवलन करीत असतो. तसे नसते तर परिवर्तनशील गोष्टी परिवर्तन पावू शकल्या नसत्या. हे वायुरूप आद्य तत्त्व स्वरूपाने दैवी, अनंत, अभेद्य आणि चैतन्यमय असे आहे.

या मूलतत्त्वाच्या स्वरूपाच्या आधारे ॲनॅक्झिमीनीझचे विश्वशास्त्राचे स्वरूप असे सांगणे शक्य आहे : वायू दाट झाला की, वारे निर्माण होतात. म्हणजे वारे हे सांद्र वायू असतात. जेव्हा वायू गोळा होतो आणि अधिक दाट बनतो, तो चेपला जातो किंवा चेपला गेला की, त्याच वायूचे ढग बनतात. अशा प्रकारे पाणी जन्माला येते. ते पाणी घन झाले की, गारा होतात आणि त्या अधिक पातळ स्वरूपात सांद्र झाल्या की, हिम बनते. वाऱ्याच्या जोरामुळे ढग विभागले जातात, तेव्हा विद्युत बनते. म्हणजे वायू अधिक विरळ, विघटित झाला की, तो अग्नी बनतो. कारण ढग विभागतात तेव्हा एक तेजाळ, धगधगीत चमक उठते. जास्त सांद्र झाला की, वायू पाणी बनतो आणि त्याहीपेक्षा जास्त सांद्र झाला की, माती (पृथ्वी) होतो, पुढे जितका शक्य आहे, तितका दाट झाला की, तो दगड होतो. सूर्यकिरण सांद्र हवेवर पडले की, इंद्रधनुष्य निराम्न होते. पृथ्वी तापते व थंड होते, तेव्हा ती बदलते म्हणून भूकंप होतात.

ॲनॅक्झिमीनीझच्या मते, पृथ्वी ही एखाद्या गोल मेजासारखी सपाट आहे किंवा ती एक तबकडीच आहे. ती वायूवर आरूढ झालेली आहे. पृथ्वी, सूर्य यांच्यासह सारे काही वायूवर आरूढ झालेले आहेत. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहगोल तसेच जे अग्निमय आहे, ते सर्व काही सपाट आहेत. सूर्य हा एखाद्या पानाप्रमाणे सपाट आहे. पृथ्वीवरून धुके वर जाते, त्याचे विरलीकरण होते आणि त्यापासून अग्नी निर्माण होतो. हा अग्नी उंचावर होता, तेव्हा ग्रहगोल तयार झाले. या ग्रहांच्या प्रदेशात काही पार्थिव पदार्थही असतात, ते त्या ग्रहांच्या कक्षेत फिरतात. सारे ग्रहगोल पृथ्वीखालून फिरत नाहीत, तर पृथ्वीभोवती फिरतात; एखादी लोकरी टोपी डोक्याभोवती फिरावी तशी. सूर्य दिसेनासा होतो त्याचे कारण तो पृथ्वीखाली जातो असे नाही, तर पृथ्वीवरील उंच भाग त्याच्या आड येतात, शिवाय आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहे. म्हणून तो दिसत नाही.

ही ॲनॅक्झिमीनीझची मते आहेत. तेव्हा वस्तू अस्तित्वात येण्याचे कारणघटक म्हणजे उष्ण व शीत ही विरोधी तत्त्वे होत. वेगळ्या भाषेत अस्तित्वाच्या प्राथमिक अवस्थेत वायू आकुंचन आणि प्रसारण या दोन परस्परविरुद्ध तत्त्वांनी युक्त असतो. वायू प्रसरण पावला की, तोच अग्नीत रूपांतरित होतो आणि आकुंचन पावला की, जल आणि पृथ्वी इत्यादी तत्त्वांची निर्मिती होते. प्रलय होतो याचा अर्थ हे आकुंचन-प्रसरण बंद होते. म्हणजे याच आकुंचन-प्रसरण तत्त्वाच्या योगे समग्र विश्व वायुतत्त्वात विलीन होते. ‘आकुंचन-प्रसरण’ हे वैज्ञानिक तत्त्व म्हणून मान्यता पावलेले आहे.

थेलीझच्या विचारांचा प्रभाव ॲनॅक्झिमीनीझच्या तत्त्वज्ञानात दिसून येतो; परंतु या विश्वाच्या उत्पत्तीमागील तत्त्व त्याने ‘जल’ न मानता ‘वायू’ मानले. ॲनॅक्झिमीनीझच्या मते, ‘माणसाचा आत्मा किंवा आत्मे हे शुद्ध वायुस्वरूप आहेत. किंबहुना आत्मा म्हणजेच वायू आणि तो आत्मा ह्या विश्वव्यापी वायुतत्त्वाचा केवळ एक घटक आहे. आपले आत्मे वायुरूप असल्याने ते आपल्याला एकत्र धरून ठेवतात. ‘श्वास व वायू यात सबंध जग सामावलेले आहे’. आत्मा सूक्ष्म आहे, ही आत्म्याची आद्य संकल्पना मांडणारा आणि वायूला समानार्थक शब्द म्हणून तो ‘जीवनाचा श्वास’ या अर्थाने तो Pneuma हा शब्द वापरणारा पहिलाच तत्त्ववेत्ता आहे. तो म्हणतो, “जसा आपला आत्मा…. वायू असल्याने आपल्याला एकत्र धरून ठेवतो, तसे ‘जीवनाचा श्वास’ आणि वायू संपूर्ण विश्वाला वेढून टाकतात आणि रक्षण करतात”. हे त्याचे उपलब्ध असलेले एकमेव विधान आहे. त्याचे हे साम्यानुमान वातावरणातील हवेला दिव्यत्व आणि मानवी श्वासाच्या प्राणवायूला आत्म्याचा आणखी उच्च दर्जा देणारे आहे.

‘जीवनाचे आदितत्त्व म्हणजे वायू’ हे तत्त्वज्ञान ॲनॅक्झिमीनीझने मांडण्याचे सामाजिक कारण असे सांगता येईल की, त्याने इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जीवन जगण्यास महत्त्व दिले. म्हणूनच त्याने जगण्यासाठी श्वासोच्छवास म्हणजे वायू नाकावाटे शरीरात घेऊन बाहेर सोडणे, हे महत्त्वाचे मानले. अर्थात याबाबतची कोणत्याही प्रकारची स्पष्टोक्ती जरी त्याच्या लेखनात आढळत नसली, तरीही विविध आत्म्यांचे एक परमात्मरूप या न्यायाने त्याने एकत्ववादाचाच संदेश दिला आहे, असे भासते.

ॲनॅक्झिमीनीझने आपल्या पूर्वसुरींच्या मतांना अनेक ठिकाणी दुजोरा दिला असला, तरी जगण्याची संकल्पना मध्यवर्ती ठेऊन त्याने आपले तत्त्वज्ञान विशद केले आहे. त्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव हेराक्लायटस, प्लेटो, ॲरिस्टॉटल इत्यादींवर पडला.

विश्वाच्या निर्मितीमागील कारण असू शकणाऱ्या अज्ञात तत्त्वाचा किंवा मूलद्रव्याचा शोध घेण्याचा ध्यास घेणाऱ्यांत त्याच्या दोन्ही गुरुंप्रमाणे ॲनॅक्झिमीनीझचाही मोठा वाटा आहे, यात शंका नाही. त्याच्याकडे लक्ष द्यावे असे फारसे काही नसले, तरी त्याने व त्याच्या दोन्ही गुरूंनी वैज्ञानिक विचारपद्धती रुजवण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले, असे रसेलचे मत आहे. आधुनिक जगात विचार व विज्ञान या क्षेत्रांत अतिशय मूल्यवान ठरलेली ‘विरोध’ ही संकल्पना ॲनॅक्झिमीनीझनेच प्रथम मांडल्याने तो ॲनॅक्झिमँडरपेक्षा मौलिक ठरतो, असेही रसेल म्हणतो. त्याच्या आदितत्त्वाच्या विचारापेक्षा म्हणजे त्याच्या तत्त्वज्ञानापेक्षा त्याने ज्या पद्धतीने वैज्ञानिक विचारपद्धती रुजवली, तीच विद्यमान काळात महत्त्वाची मानली जाते.

संदर्भ :

  • Barnes, Jonathan, The Presocratic Philosophers, vol. 1, Boston, 1983.
  • Fieser, James; Lillegard, Norman, A Historical Introduction to Philosophy, Text and Interactive Guides, Oxford, 2002.
  • Guthrie, W. K. C. A History of Greek Philosophy, vol. 1, Cambridge, 1962.
  • Masih, Y. A Critical History of Western Philosophy, Delhi, 1999.
  • Rickman, H. P. Preface to Philosophy, London, 1964.
  • Russell, Bertrand, A History of Western Philosophy, and It’s Connection with Political and Social Circumstances from the Earliest Times to the Present Day, London, 1961.
  • रेगे, मे. पुं. ‘प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान’, नवभारत, प्राज्ञपाठशाळामंडळ वाई, एप्रिल-मे-जून १९९४.
  • https://www.iep.utm.edu/anaximen/

                                                                                                                                                               समीक्षक : डॉ. शकुंतला गावडे