प्लेटो : (इ.स.पू.सु. ४२८‒ इ.स.पू.सु. ३४८). प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता. प्लेटोचा जन्म अथेन्स किंवा ईजायना ह्या नगरात झाला. प्लेटोचे घराणे हे अथेन्समधील एक प्रतिष्ठित व खानदानी घराणे होते. प्लेटोचा पिता ॲरिस्टॉन हा अथेन्सचा शेवटचा राजा कॉड्रस ह्याचे आपण वंशज आहोत असे मानीत असे. प्लेटोची आई पेरिक्टीऑनी हिचे घराणे सोलनशी संबंधित होते. अथेन्समधील ज्या संपन्न आणि खानदानी कुटुंबांनी पेरिक्लीझच्या राजवटीत अभिमानाने सहभाग घेतला होता त्यांच्यात प्लेटोचे कुटुंब हे एक होते. पेरिक्लीझनंतर जी लोकशाही राजवट प्रस्थापित झाली तिच्याशी ह्या कुटुंबातील अनेकांनी विरोधी भूमिका धारण केली होती. प्लेटोने लोकशाही राजवटीला नंतर जो सैद्धांतिक विरोध केला त्याचे मूळ त्याच्या कुटुंबाच्या ह्या इतिहासात होते असे अनेकजण मानतात.

प्लेटोच्या लहानपणीच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही; पण लहानपणी त्याच्या बुद्धिचापल्याची आणि विनयशील वृत्तीची वाखाणणी होत असे. इतर ग्रीक मुलांप्रमाणे त्याने कसरतीचे शिक्षण तर घेतले होतेच; पण युद्धांच्या सार्वजनिक स्पर्धेत भाग घेण्याइतके पटुत्वही त्याने कमविले होते. चित्रकला व काव्य ह्यांचा त्याला नाद होता. त्याने एक शोकांतिका रचली होती; पण ती नंतर जाळून टाकली; अशा दंतकथा सांगितल्या जातात. अथेन्सच्या कायद्याप्रमाणे त्याने सैन्यात ठरीव मुदतीची सेवा केली असणार आणि त्याचा सामाजिक दर्जा पाहता ती त्याने घोडदलात केली असणार अशी शक्यता वाटते. पेलोपनीशियन युद्धाच्या (इ.स.पू. ४३१‒४०४) शेवटच्या पाच वर्षांत युद्धात भाग घेण्याएवढे प्लेटोचे वय होते.

सॉक्रेटीसभोवती गोळा झालेल्या तरुणांत, क्रिटिअस आणि कार्मिडीझ हे प्लेटोचे मामा प्रमुख होते आणि त्यांच्यामुळे प्लेटो पूर्ववयातच सॉक्रेटीस (इ.स.पू. ४७०‒३९९) याच्या सान्निध्यात आला असणार. प्लेटोचा त्याच्या तरुण वयात, ज्या दुसऱ्या तत्त्वज्ञाशी संबंध आला तो म्हणजे क्रॅटिलस. हा हेराक्लायटसचा अनुयायी होता.

सॉक्रेटीसवर झालेला खटला आणि त्याला दिलेले देहान्त शासन ह्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती ध्यानात घेता प्लेटोने काही काळ अथेन्समध्ये न राहता प्रवासाला जावे, असा निर्णय स्वाभाविकपणे घेतला. ह्या वेळी प्लेटोचे वय अठ्ठावीस वर्षांचे होते. प्रथम तो मेगारा येथे यूक्लायडीझ (इ.स.पू.सु. ४५०‒३७४) ह्या सॉक्रेटीसच्या शिष्याबरोबर राहिला. त्यानंतर थीओडोरस ह्या गणितज्ञाला भेटण्यासाठी तो सायरीनी येथे गेला. नंतर त्याने इटली व मागाहून ईजिप्त ह्या देशांत प्रवास केला, अशी कथा सांगितली जाते. इटलीमध्ये पायथॅगोरसपंथी तत्त्ववेत्त्यांना भेटण्याचा त्याचा मुख्य इरादा असावा, असे वाटते. इटलीहून प्लेटो सिसिलीला गेला. सिसिलीवर तेव्हा पहिला डायोनिशिअस हा सर्वसत्ताधीश म्हणून राज्य करीत होता. त्याचा मेहूणा डिऑन ह्याच्याशी प्लेटोची मैत्री जडली.

ह्या प्रवासाहून अथेन्सला परतल्यानंतर इ.स.पू. ३८७ च्या सुमारास प्लेटोने आपली अकादमी स्थापन केली. ज्ञानाची उपासना व अध्यापन यांना वहिलेली ही यूरोपमधील पहिली संस्था‒म्हणजेच विद्यापीठ‒होय.  प्लेटो आयुष्याच्या अंतापर्यंत अकादमीचा अध्यक्ष राहिला.

इ.स.पू. ३६७ ह्या वर्षी पहिल्या डायोनिशिअसचा मृत्यू झाल्यानंतर डिऑनने, सत्ताधाऱ्याला उचित असे शिक्षण दुसऱ्या डायोनिशिअसला देण्यासाठी म्हणून प्लेटोला सिराक्यूसला बोलविले; पण डायोनिशिअसचा डिऑनशी बेबनाव होऊन त्याने त्याला हद्दपार केले. प्लेटो अथेन्सला परतला. पण इ.स.पू. ३६१‒३६० ह्या वर्षी डायोनिशिअस आणि डिऑन यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्यासाठी म्हणून प्लेटोने सिराक्यूसला परत भेट दिली; पण त्याला त्यात अपयश आले. इ.स.पू. ३५७ मध्ये डिऑनने उठाव करून सत्ता ताब्यात घेतली; पण इ.स.पू. ३५४ मध्ये त्याचा खून झाला. आपल्या कल्पनेनुसार प्रशिक्षण देऊन आदर्श राज्यकर्ता घडविण्याचा प्लेटोचा प्रयोग फसला. ह्यानंतर प्लेटोने राजकीय उलाढाल्यांत भाग घेतला नाही. अथेन्स येथे प्लेटोचा मृत्यू झाला.

पुढे निर्दिष्ट केलेले डायलॉग्ज म्हणजेच ‘संवाद’ आणि परंपरेने प्लेटोची म्हणून आलेली १३ पत्रे असे प्लेटोचे लिखाण आहे. या पत्रांतील बहुतेक पत्रे बनावट आहेत, असे संशोधकांचे मत आहे. ह्याला अपवाद म्हणजे तिसरे, सातवे, आठवे आणि तेरावे ही पत्रे होत. ही पत्रे खरोखर प्लेटोने लिहिली आहेत की नाहीत, ह्याविषयीही वाद आहे. ह्यांतील सातवे पत्र सर्वांत महत्त्वाचे आहे. ते जर अस्सल असेल, तर त्यात प्लेटोच्या आत्मचरित्राचा एक भाग आपल्याला प्राप्त होतो, असे म्हणता येते.

तत्त्वज्ञान : प्लेटोने लिहिलेल्या ‘संवादां’च्या (Dialogues) द्वारा त्याच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून घेणे सोयीचे आहे. हे संवाद ज्या क्रमाने त्याने लिहिले असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते, त्याला अनुसरून त्यांतील सिद्धांतांचा आणि युक्तिवादांचा येथे परिचय करून देण्यात आला आहे.

प्लेटोने प्रारंभीच्या काळी लिहिलेले संवाद एका विशिष्ट धाटणीचे आहेत. ह्या संवादांत साधारणपणे ‘सद्‌गुण म्हणजे काय’ किंवा ‘धैर्य, समधातता (Sophrosyne) ह्यासारख्या एखाद्या विशिष्ट सद्‌गुणाचे नेमके स्वरूप काय आहे?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला असतो. वैशिष्ट्यपूर्ण वादशैलीचा अवलंब करून प्रश्नांची उत्तरे देण्यात येतात. कधीकधी ‘सद्‌गुण शिकविता येतो’, ‘गैरकृत्य स्वतः करण्याऐवजी इतरांनी केलेले गैरकृत्य भोगणे अधिक चांगले असते’, असे सामान्य विधानही परीक्षणासाठी घेण्यात येते.

लायसिस, लेकीझ, युथिफ्रो, कार्मिडीझ, हिपिअस मेजर, हिपिअस मायनर, आयन, प्रोटॅगोरस, युथिडीमस आणि मेनो हे पहिल्या कालखंडातील संवाद होत. ह्या संवादांचे नेतृत्व सॉक्रेटीसकडे आहे. प्रमुख भूमिका त्याची असते. ह्या संवादांची अनेक उद्दिष्टे दिसून येतात. सॉक्रेटीसच्या वैचारिक आणि नैतिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणे, हे त्यांचे एक उद्दिष्ट आहे. सामान्य संकल्पनांच्या सुसंगत आणि प्रमाण व्याख्या शोधून काढण्यासाठी किंवा सामान्य विधानांचे परीक्षण करण्यासाठी सॉक्रेटीस जी प्रश्नोत्तररूपी, संवादात्मक पद्धत वापरीत असे, तिची उदाहरणे वाचकांपुढे ठेवणे हेही त्यांचे उद्दिष्ट होते. शिवाय, चांगले जीवन जगण्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे ह्याचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक असते; पण असे खरेखुरे ज्ञान आपल्यापाशी नसते, आपल्याला जे ज्ञान म्हणून वाटत असते ते अर्धकच्चे, ठिसूळ असते, ते परीक्षणापुढे टिकत नाही, हे जाणून घेऊन खरेखुरे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रारंभापासून आणि गंभीरपणे प्रयत्न केला पाहिजे. आत्म्याची ‘निगा’ राखणे हे माणसाचे पहिले कर्तव्य असते आणि चांगले काय आणि वाईट काय ह्याचे खरेखुरे ज्ञान प्राप्त करून घेणे, हा आत्म्याची निगा राखण्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो ही जी सॉक्रेटीसची धारणा आणि श्रद्धा होती, ती ह्या संवादांतून प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.

हिपिअस मेजरमध्ये ‘‘सुंदर’ म्हणजे काय?’ ह्या प्रश्नाची चर्चा आहे, तर हिपिअस मायनरमध्ये ‘कुणीही जाणूनबुजून गैरकृत्य करीत नाही’ ह्या विधानाचे चिकित्सक परीक्षण करण्यात आले आहे. आयनमध्ये कवी आपली निर्मिती ‘शास्त्रा’प्रमाणे करीत नाहीत, अविवेकी स्फूर्तीतून करतात म्हणून त्यांचा अधिक्षेप केला आहे. ‘‘समधातता’ म्हणजे काय?’ हा कार्मिडीझचा प्रश्न आहे, तर लेकीझमध्ये ‘‘धैर्य’ म्हणजे काय?’ ह्याचा शोध घेतला आहे. लायसिस हा मैत्रीविषयीचा संवाद आहे. युथिडीमसमध्ये शब्दच्छल करून लोकांना तर्कदुष्ट युक्तिवादाच्या साहाय्याने कुंठित करणाऱ्या तत्त्ववेत्त्यांचे विडंबन केले आहे. पण त्याचबरोबर संपत्तीच्या मालकीमध्ये सुख नसते, तर वस्तूंचा आणि आपल्या शारीरिक व मानसिक शक्तींचा योग्य प्रकारे वापर करण्यामध्ये सुख असते, ही सॉक्रेटीसची शिकवणही त्यात मांडली आहे.

ह्या प्रारंभीच्या काळानंतर प्लेटोने लिहिलेले पण पहिल्या कालखंडात मोडणारे संवाद अधिक लांब आणि गुंतागुंतीचे आहेत आणि त्यांचे विषय मुख्यतः राजकीय, सामाजिक व नैतिक आहेत. उदा., गॉर्जिअसमेनोप्रोटॅगोरस व युथिफ्रो. वक्तृत्वकलेचे स्वरूप आणि मूल्य हा गॉर्जिअसचा विषय आहे; पण क्षणिक सुख आणि हित ह्यांच्यामध्ये भेद करणे योग्य आहे आणि वासनापूर्तीला योग्य ती मर्यादा घालण्यानेच समाजाचे आणि व्यक्तीचे हित किंवा खरेखुरे सुख साधले जाते, हे सिद्धांत त्यात प्रभावीपणे मांडले आहेत. ‘सद्‌गुण म्हणजे काय?’ आणि ‘सद्‌गुण शिकविता येतो काय?’ ह्या प्रश्नांची चर्चा मेनोमध्ये करण्यात आली आहे. परंतु ‘ज्ञान म्हणजे स्मरण’ हा प्लेटोच्या तत्त्वमीमांसेशी संबंधित असलेला ज्ञानमीमांसात्मक सिद्धांत त्यात स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. ह्यासाठीही मेनोचे महत्त्व आहे. प्रोटॅगोरस ह्या संवादात ‘सद्‌गुण एक आहे की अनेक आहेत?’ ह्या प्रश्नावर चर्चा केंद्रित झाली आहे. वरवर पाहता धैर्य, संयम, न्याय हे भिन्न सद्‌गुण आहेत असे वाटत असले, तरी वस्तुतः एकच सद्‌गुण असतो, तो म्हणजे शहाणपण किंवा ज्ञान. व्यवहारात भिन्न मानण्यात येणारे सद्‌गुण ह्या एकाच सद्‌गुणाची रूपे असतात, आपल्या कृत्यांचे आपल्या सुखदुःखाच्या दृष्टीने, खरोखर कोणते परिणाम घडून येतील ह्याचे सम्यक् आकलन हे ह्या ज्ञानाचे किंवा शहाणपणाचे स्वरूप असते, असे ह्या संवादाचे सार आहे.

युथिफ्रो, अपॉलॉजी आणि क्रीटो हे संवाद एकत्र घेता येतील. अपॉलॉजीमध्ये सॉक्रेटीसवर भरण्यात आलेल्या खटल्यात त्याने जे आत्मसमर्थनपर भाषण केले आणि स्वतःच्या जीवितकार्याच्या स्वरूपाचे आणि साध्याचे आपल्या सहनागरिकांसाठी जे स्पष्टीकरण केले, ते सादर करण्यात आले आहे. क्रीटोमध्ये सॉक्रेटीसच्या अंतकाळच्या धीरोदात्त वर्तनाचे वर्णन आहे. युथिफ्रोमध्ये धार्मिक श्रद्धेचे स्वरूप हा चर्चेचा विषय आहे. धार्मिक श्रद्धेचा आविष्कार ईश्वराची सेवा करण्यात होतो हे जरी खरे असले, तरी ईश्वराची सेवा आपल्या जीवनाला उदात्त वळण दिल्याने होत असते, असे ह्या संवादाचे तात्पर्य आहे.

फीडो, सिंपोझियमफीड्रस आणि रिपब्लिक ह्या संवादांचे एक समान वैशिष्ट्य आहे. प्लेटोचे मानवी जीवनाविषयीचे जे आध्यात्मिक आणि नैतिक दर्शन आहे, त्याला आधारभूत असलेली जी सत्-सामान्यांची किंवा सद्‌-रूपांची उपपत्ती आहे (Theory of Ideas किंवा Forms) तिची मांडणी आणि विकास ह्या संवादांत करण्यात आला आहे. उदा., फीडो ह्या संवादाचे उद्दिष्ट आत्म्याच्या दिव्यत्वाचे आणि त्याच्यापासून निष्पन्न होणाऱ्या अमरत्वाचे समर्थन करणे हे आहे. हे समर्थन आत्म्याची सत्-सामान्यांशी सांगड घालून करण्यात आले आहे.

सत्-सामान्यांची उपपत्ती थोडक्यात अशी मांडता येईल : ‘सुंदर’, ‘त्रिकोण’, ‘घोडा’ इ. सामान्य पदांचा उपयोग, विशिष्ट वस्तूंना उद्देशून त्यांचे विधेयन करण्यासाठी करण्यात येतो. ‘हे सुंदर आहे’, ‘हा घोडा आहे’, अशा वाक्यांमध्ये असे विधेयन होते. विशिष्ट वस्तू इंद्रियगोचर असतात; पण ‘सुंदर’, ‘घोडा’ यांसारख्या सामान्य पदांनी जे व्यक्त होते–म्हणजे सौंदर्य, घोडेपणा–ती विशिष्ट वस्तू नसते, तर ते एक सत्-सामान्य, सद्-रूप असते. ते इंद्रियग्राह्य नसते, ते विवेकग्राह्य असते. असे सत्-सामान्य जेव्हा एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये अवतरते, प्रविष्ट होते, तेव्हा त्या वस्तूला ते स्वरूप प्राप्त होते. उदा., सौंदर्य हे सत्-सामान्य जेव्हा एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये प्रविष्ट होते किंवा उपस्थित असते, तेव्हा ती वस्तू सुंदर असते; सुंदर वस्तू असे तिचे स्वरूप असते. जेव्हा हे सत्-सामान्य त्या वस्तूला सोडून जाते, तेव्हा ती वस्तू सुंदर रहात नाही, सुंदर वस्तू हे तिचे स्वरूप नष्ट होते. विशिष्ट इंद्रियगोचर वस्तू परिवर्तनशील असतात. सत्-सामान्ये त्यांच्यात जसजशी प्रवेश करतात किंवा त्यांचा त्याग करतात, तसतशी त्यांची स्वरूपे बदलत जातात; पण सत्-सामान्ये स्थिर, अपरिवर्तनीय आणि चिरंतन असतात. सुंदर वस्तू, सौंदर्य हे सत्-सामान्य तिच्यातून निघून गेल्यामुळे असुंदर बनते; पण सौंदर्य हे सत्-सामान्य आहे ते साक्षात सौंदर्यच असते, ते चिरंतनपणे सौंदर्य असते.

विशिष्ट, इंद्रियगोचर, परिवर्तनशील वस्तू शरीराशी निगडित असतात त्याप्रमाणे सामान्य, विवेकग्राह्य, स्थिर, चिरंतन सत्-सामान्ये आत्म्याशी निगडित असतात. विशिष्ट,परिवर्तनशील वस्तू आणि सामान्य, नित्य सत्-सामान्ये यांच्यामधील द्वैताचे शरीर आणि आत्मा ह्यांच्यामधील द्वैत हे प्रतिबिंब होय. विवेकशक्तीने युक्त असलेला आत्मा ह्या अपिरवर्तनीय, नित्य व म्हणून दिव्य स्वरूपाच्या असलेल्या सत्-सामान्यांचे बौद्धिक दर्शन घेत असतो. म्हणजे आत्म्याचे स्वरूप सत्-सामान्यांसारखे असते, म्हणजे दिव्य असते व म्हणून आत्मा अमर असतो. ‘ज्ञान म्हणजे स्मरण’ हा जो सॉक्रेटीसचा सिद्धांत मेनोमध्ये मांडलेला आहे त्याचाही उलगडा सत्-सामान्यांची उपपत्ती आणि आत्म्याच्या  अमरत्वाचा सिद्धांत यांच्या साहाय्याने करता येतो. ‘ज्ञान म्हणजे स्मरण’ ह्या सिद्धांताचा आशय असा स्पष्ट करता येईल : भूमितीमध्ये आपण स्वतःच अनुमान करून पूर्वी आपल्याला अवगत नसलेले ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. बाह्य वस्तूंच्या निरीक्षणाने हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले नसते किंवा दुसऱ्या कुणाकडे असलेले ज्ञान त्याने आपल्याला दिल्यामुळे ते आपल्याला प्राप्त झालेले नसते. तेव्हा हे ज्ञान आपल्यामध्येच असते, ते तिरोभूत असते, ते बाहेर येते, आविर्भूत होते. आता दोन प्रश्न उपस्थित होतात. पहिला, हे ज्ञान आपल्यामध्ये प्रथम प्रविष्ट होते कसे? दुसरा, आपल्यामध्ये सुप्त असलेल्या ज्ञानाचे ‘स्मरण’ होते कसे? आता आत्मा शरीराहून भिन्न आहे आणि तो अविनाशी असल्यामुळे तो अनेकदा जन्म घेतो. शुद्ध अवस्थेत असलेल्या आत्म्याला सत्-सामान्यांचे साक्षात दर्शन होत असते. हे ज्ञान घेऊन तो जन्माला येतो; पण शरीरात असताना हे ज्ञान त्याच्यात सुप्त असते. आता इंद्रियगोचर वस्तूंचे स्वरूप त्यांच्यात उपस्थित असलेल्या सत्-सामान्यांचे बनलेले असते. ही सत्-सामान्ये आत्म्याने आपल्या पूर्वीच्या अवस्थेत ‘पाहिलेली’ असतात. त्यांच्यासारख्या असलेल्या इंद्रियगोचर वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा आपल्याला होते, तेव्हा ह्या सत्-सामान्यांचे ‘स्मरण’ आपल्याला होते. इंद्रियानुभवापासून खरेखुरे ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही, विवेकशक्तीने सत्-सामान्ये आणि त्यांच्यामधील संबंध यांचे केलेले ग्रहण हे खऱ्याखुऱ्या ज्ञानाचे स्वरूप असते आणि इंद्रियांपासून मिळणारे ज्ञान हे खऱ्याखुऱ्या विवेकजन्य ज्ञानाचे स्मारक असते, असा प्लेटोचा सिद्धांत आहे.

सिंपोझियम आणि फीड्रस  या संवादांत प्लेटोच्या तत्त्वज्ञानातील गूढवादी किंवा रहस्यवादी प्रवृत्तीचा आविष्कार आढळतो. प्रेम हा या संवादांचा मध्यवर्ती विषय आहे. सिंपोझियमचे सार थोडक्यात असे देता येईल : सौंदर्याचे ग्रहण करणे, सौंदर्याशी तादात्म्य साधणे हे प्रेमाचे साध्य असते. प्रेमाचे प्राथमिक रूप म्हणजे सुंदर शरीरावरील प्रेम. ह्या प्रेमाचे उद्दिष्ट त्या शरीराद्वारा अपत्यनिर्मिती करून स्वतःचे सातत्य साधणे, हे असते. प्रेमाचा ह्याच्याहून श्रेष्ठ प्रकार म्हणजे समानशील आत्म्यासमवेत सुंदर जीवनपद्धतीची, चांगल्या जीवनपद्धतीची निर्मिती करणे. चांगल्या संस्था आणि चांगले नियम यांची रचना करून ही निर्मिती करता येते. याहूनही श्रेष्ठ प्रेम हे इतरांशी केलेल्या संवादांद्वारा नवीन ज्ञान–सत्-सामान्यांचे ज्ञान–प्राप्त करून घेण्यात असते. हे विवेकग्राह्य ज्ञान प्राप्त करून घेत जाताना साधकाला एकाएकी जे साक्षात सौंदर्यच आहे त्या सत्-सामान्याचे प्रत्यक्ष दर्शन घडते. आतापर्यंत ज्या ज्या सौंदर्याचे दर्शन त्याला घडले होते त्याचा उगम, त्याचे अंतिम कारण असणारे असे साक्षात सौंदर्य हे सत्-सामान्य असते. ह्या सर्वश्रेष्ठ सत्-सामान्याच्या साक्षात दर्शनात प्रेमाचे संपूर्ण साफल्य होते.

फीड्रसमध्ये ह्याच सिद्धांताचा अनुवाद करण्यात आला आहे. आत्म्याच्या अशारीर अवस्थेत त्याला सत्-सामान्यांचे साक्षात दर्शन घडत असते; इंद्रियगोचर वस्तूच्या अनुभवाने माणसाला साक्षात सौंदर्य या सत्-सामान्याचे स्मरण होते आणि त्याचे साक्षात दर्शन परत घ्यावे अशी जी ओढ त्याला लागते, आत्म्याला आपल्या मूळ वसतिस्थानाकडे परतावे अशी जी प्रेरणा मिळते तो म्हणजे प्रेमाचा अनुभव.

रिपब्लिक (राज्य) ह्या संवादात प्लेटोच्या समग्र तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब पडले आहे. नीती, सामाजिक व राजकीय व्यवस्था, आत्म्याचे स्वरूप, ज्ञानाचे प्रकार आणि पायऱ्या, अस्तित्वाचे स्वरूप आणि रूपे, माणसाचे अंतिम कल्याण ह्या तत्त्वज्ञानातील सर्व मूलभूत समस्यांवरील प्लेटोचे विचार एका सुसंगत अशा तत्त्वज्ञानात्म दर्शनात गोवण्याची कामगिरी ह्या संवादाने पार पाडली आहे. ‘सामाजिक जीवनात आणि व्यक्तीच्या जीवनात न्यायाचे सम्यक् स्वरूप काय असते?’ हा ह्या संवादातील मध्यवर्ती प्रश्न होय आणि न्यायाला अनुसरून आचरण करण्यानेच व्यक्ती आणि समाज सुखी होतो, किंवा न्यायाने वागण्यात खरे सुख असते, हे दाखवून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ह्या संदर्भात एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे. ‘न्याय’ किंवा इंग्रजी ‘जस्टिस’ हा शब्द ज्या ग्रीक शब्दासाठी वापरण्यात येतो त्याचा अर्थ जवळजवळ नीती किंवा सदाचरण असा आहे. न्यायी माणूस म्हणजे नीतिमान किंवा सदाचरणी माणूस.

प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात न्यायाचे जे स्वरूप असते ते समजून घेण्यासाठी समाजव्यवस्थेतील आणि समाजजीवनातील न्यायाचे स्वरूप समजून घेणे आवश्यक असते. व्यक्तिजीवनात न्यायाचे असणारे स्वरूप व कार्य आणि समाजजीवनात न्यायाचे असणारे स्वरूप व कार्य ही परस्परावलंबी असतात. आता समाज तीन भिन्न वर्गांचा मिळून बनलेला असतो. ह्या प्रत्येक वर्गाचे समाजाच्या संबंधात, इतर वर्गांच्या संबंधात विशिष्ट असे कार्य असते. जेव्हा प्रत्येक वर्ग समाजाच्या संबंधातील आपले विशिष्ट कार्य व्यवस्थितपणे पार पाडीत असतो आणि त्यामुळे समाजात सुव्यवस्था आणि सुसंवाद नांदत असतो, तेव्हा तो समाज न्यायी असतो. त्या समाजात न्याय असतो व म्हणून तो अनिवार्यपणे सुखी, समाधानी आणि निरोगी असतो. समाजाचे घटक असलेले हे तीन वर्ग म्हणजे पालकांचा वर्ग, साहाय्यकांचा वर्ग आणि सर्वसामान्य लोकांचा, शेतकरी, कारागीर इत्यादींचा वर्ग. समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने धोरणविषयक निर्णय घेणे, नियम घालून देणे हे पालकांचे कार्य असते; ह्या निर्णयांची व नियमांची अंमलबजावणी करणे हे साहाय्यकांचे कार्य असते आणि त्यांचे पालन करणे हे सर्वसामान्य लोकांचे कार्य असते. प्रत्येक वर्ग आपले विशिष्ट आणि उचित कार्य करीत असला की, समाजजीवन सुसंवादी होते. समाजाच्या प्रत्येक घटकाने आपापले उचित कार्य केल्याने जी सुव्यवस्था निर्माण होते, ती म्हणजेच न्याय आणि असा न्यायी समाज अनिवार्यपणे सुखी असतो. थोडक्यात, ‘एखाद्याला जे मिळणे योग्य असते ते त्याला पोहोचविणे’ यात न्याय असतो, ह्या तत्त्वाऐवजी ‘एखाद्याने जे करणे योग्य असते ते त्याच्याकडून होणे’ म्हणजे न्याय, अशी न्यायाच्या मूलभूत तत्त्वाची प्लेटो व्याख्या करतो.

समाजातील ह्या वर्गांना अनुरूप असे माणसाच्या आत्म्याचे भाग असतात, असे प्लेटो मानतो. पालकवर्गाशी जुळणारा असा आत्म्याचा भाग म्हणजे त्याचा विवेकी भाग, साहाय्यकांशी जुळणारा भाग म्हणजे आत्म्याचा ओजस्वी भाग आणि सामान्य लोकांशी जुळणारा भाग म्हणजे विशिष्ट इच्छांचा बनलेला वासनामय भाग. सारासार विचार करून चांगले आणि वाईट यांचा विवेक करणे आणि काय करावे याचा निर्णय करणे, हे विवेकी भागाचे कार्य असते. ह्या निर्णयाची अंमलबजावणी करणे व ती करताना विशिष्ट इच्छांचे नियंत्रण करणे, हे ओजस्वी भागाचे कार्य असते. हे निर्णय स्वीकारणे आणि त्यांच्या मर्यादेत स्वतःचे समाधान करणे, हे वासनामय भागाचे कार्य असते. स्वतःचे विशिष्ट आणि उचित कार्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याची क्षमता आत्म्याच्या भागाच्या ठिकाणी जेव्हा असते, तेव्हा तो भाग उत्कृष्ट असतो. अशी प्रत्येक भागाच्या ठिकाणी असलेली त्याची विशिष्ट उत्कृष्टता म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेला विशिष्ट सद्‌गुण होय. विवेकी भाग उत्कृष्टपणे कार्य करीत असला की, आत्म्याच्या ठिकाणी शहाणपणा हा सद्‌गुण असतो; ओजस्वी भाग उत्कृष्ट असला की, धैर्य हा सद्‌गुण असतो आणि वासनामय भाग उत्कृष्ट असला की, संयम हा सद्‌गुण असतो. प्रत्येक भाग उत्कृष्टपणे कार्य करीत असला की, सबंध आत्म्याची स्थिती उत्कृष्ट असते आणि ही उत्कृष्ट स्थिती म्हणजे न्याय हा सद्‌गुण. ह्या विवेचनावरून न्याय हा मध्यवर्ती सद्‌गुण असून इतर सद्‌गुण त्याची वेगवेगळी अंगे आहेत, हे स्पष्ट होते. न्याय, शहाणपण, धैर्य आणि संयम हे चार प्रमुख सद्‌गुण होत, असे पारंपरिक ग्रीक मत होते. ह्या पारंपरिक सद्‌गुणांची प्लेटोने अशी सैद्धांतिक व्यवस्था लावून दिली.

पालकांचा वर्ग आणि साहाय्यकांचा वर्ग मिळून शासकवर्ग होतो. शासकवर्गातील व्यक्तींचे प्रशिक्षण करण्यासाठी प्लेटोने नैतिक व बौद्धिक शिक्षणाच्या एका सुव्यवस्थित कार्यक्रमाची रचना केली आहे. यूरोपमध्ये विकसित होऊन जगभर फैलावलेल्या उदार (Liberal) शिक्षणक्रमाचा प्रारंभ प्लेटोच्या शिक्षणविषयक तत्त्वज्ञानात आणि कार्यक्रमात आढळेल. शारीरिक व्यायामाने शरीर निरोगी व सुदृढ करणे, संगीत, साहित्य इ. कलांच्या द्वारे भावनांना व इच्छांना वळण देऊन संयम व धैर्य हे गुण विद्यार्थांच्या प्रवृत्तीत रुजविणे आणि शास्त्रांच्या अभ्यासाद्वारे विवेकशक्ती विकसित करणे, हे ह्या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रमुख घटक होत.

प्लेटोच्या मताप्रमाणे शास्त्र किंवा विज्ञान यांचा विषय म्हणजे नित्य, अपरिवर्तनीय आणि सामान्य अशी सत्-सामान्ये होत. विशिष्ट इंद्रियगोचर वस्तू परिवर्तन पावत असल्यामुळे त्यांच्याविषयी स्थिर असे सत्य असू शकत नाही. ज्यांच्याविषयीचे सत्य स्थिर, अपरिवर्तनीय असे असते, अशा वस्तूच ज्ञानाचा विषय असू शकतात. परिवर्तनशील इंद्रियगोचर वस्तूंचे आपल्याला ज्ञान नसते; आपण त्यांच्याविषयी केवळ मते बनवितो किंवा समजुती बाळगतो.

भूमितीसारखे शास्त्र किंवा विज्ञान घेतले, तर ते विशिष्ट, इंद्रियगोचर आकृतिविषयी नसते. ते सामान्य, अपरिवर्तनीय अशा आकृतींविषयी, आकृतीच्या सत्-सामान्यांविषयी असते. उदा., सामान्य, नित्य आणि परिपूर्ण असे जे त्रिकोणाचे सत्-सामान्य असते, त्याचा भूमितीच्या अभ्यासविषयात समावेश होतो. त्रिकोणाच्या विशिष्ट इंद्रियगोचर आकृती त्रिकोणाच्या ह्या परिपूर्ण सत्-सामान्यात सहभागी झाल्याने त्रिकोण बनतात; पण ते अपूर्ण त्रिकोण असतात. भूमितीत त्रिकोणाच्या सत्-सामान्याची व्याख्या तसेच इतर आकृतींच्या सत्-सामान्यांच्या व्याख्या करण्यात येतात आणि ह्या व्याख्यांपासून ह्या आकृतींचे जे धर्म अनिवार्यपणे निष्पन्न होतात ते सिद्ध करण्यात येतात. तेव्हा विज्ञानाची पद्धती निगामी (Deductive) असते. विशिष्ट इंद्रियगोचर वस्तू सामान्य सत्-सामान्यात ज्याप्रमाणे सहभागी होतात, त्याप्रमाणे सामान्ये किंवा सत्-सामान्ये अधिक व्यापक सामान्य, उच्चतर अशा सत्-सामान्यांमध्ये सहभागी होतात. उदा., त्रिकोण, वर्तुळ ही सत्-सामान्ये आकृती ह्या सामान्येतर सत्-सामान्यात सहभागी होतात; घोड्याचे सत्-सामान्य, बैलाचे सत्-सामान्य प्राण्याच्या सत्-सामान्यात सहभागी होते. सत्-सामान्यांची अशी एखाद्या उतरंडीसारखी, एकात्म व्यवस्था असते.

भूमितीसारखे विशिष्ट शास्त्र घेतले, तर कित्येक संकल्पना आणि त्यांच्यावर आधारलेली तत्त्वे मूलभूत आणि प्रमाण म्हणून गृहीत धरून त्यांच्यापासून इतर संकल्पना व विधाने प्राप्त करून घेऊन ते स्वतःची रचना करते. ह्या संकल्पनांचे विश्लेषण करून अधिक प्राथमिक संकल्पनांपासून त्या निष्पन्न करणे आवश्यक असते. भूमितीचा ज्या दिशेने विकास होतो त्याच्या उलट्या दिशेने होणारा हा विवेकाचा प्रवास असतो. अशी रीतीने अधिकाधिक आद्य, अधिकाधिक सामान्य व परिपूर्ण अशा सत्-सामान्यांचे ज्ञान विवेकाला होत जाते. अखेरीस विवेकशक्तीला आद्यतम स्वयंसिद्ध अशा एका सत्-सामान्यांचे साक्षात दर्शन होते. हे श्रेष्ठतम सत्-सामान्य म्हणजे ‘आयडिया ऑफ गुड’. ज्याला ईश्वर तत्त्व किंवा शिवतत्त्व म्हणता येईल. ‘शिव’ हे सत्-सामान्य. सर्व सत्-सामान्ये साक्षात किंवा परंपरेने शिव ह्या सत्-सामान्यात सहभागी होतात. म्हणजे प्लेटोच्या मताप्रमाणे सत् हे शिवस्वरूप आहे. दृश्य विश्वात सूर्याचे जे स्थान आहे तेच, प्लेटोच्या मताप्रमाणे, सत्-सामान्यांच्या विश्वात शिव ह्या सत्-सामान्याचे आहे. म्हणजे सूर्यापासून सर्व वस्तूंचे पोषण होते आणि त्यापासून मिळणाऱ्या प्रकाशात सर्व वस्तू दृश्य होतात. त्याचप्रमाणे सर्व सत्-सामान्यांना त्यांचे सत् आणि त्यांची ज्ञेयता शिव ह्या सत्-सामान्यापासून लाभते.

ज्याने शिवाच्या सत्-सामान्यापर्यंत आरोहण केले आहे, ज्याला त्याचे साक्षात बौद्धिक दर्शन झाले आहे आणि त्याच्यापासून सर्व सत्-सामान्ये कशी निष्पन्न होतात ह्याचे ज्ञान ज्याला झाले आहे तो तत्त्ववेत्ता होय. मध्यम दर्जाच्या सामान्यांपासून शिव ह्या सत्-सामान्यापर्यंतचा जो बौद्धिक प्रवास असतो त्याला प्लेटो ‘डायलेक्टिक’ म्हणतो. हे डायलेक्टिक ज्याने आत्मसात केले आहे, तो तत्त्ववेत्ता असतो आणि तो पालक व्हायला पात्र असतो. डायलेक्टिक ज्यांना साधत नाही, परंतु इतर शारीरिक, मानसिक व बौद्धिक शिक्षणाचा कार्यक्रम ज्यांनी पार पाडलेला असतो, ते साहाय्यक वर्गात मोडतात. शिव ह्याचे यथार्थ ज्ञान झालेले तत्त्ववेत्ते कोणत्याही प्रसंगी किंवा परिस्थितीत काय करणे हिताचे ठरेल, ह्याविषयी योग्य निर्णय घेऊ शकतात व म्हणून सत्ताधारी म्हणून समाजाचे नियमन करायला ते अधिकारी असतात.

शासकवर्गाने, म्हणजे पालक आणि साहाय्यक यांनी, केवळ समाजाच्या हितासाठी समाजाचे नियमन केले पाहिजे. ह्यासाठी ह्या वर्गातील व्यक्तींना समाजाच्या हिताहून स्वतंत्र असे त्यांचे स्वतःचे खाजगी हित किंवा स्वार्थ असता कामा नये. म्हणून प्लेटोच्या ह्या आदर्श राज्यात शासकवर्गातील व्यक्तींना खाजगी मालमत्ता बाळगता येत नाही किंवा विवाह करून पत्नी व अपत्ये ह्यांचे बनलेले कुटुंब स्थापन करता येत नाही. प्लेटो शासकवर्गात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देतो. शासकवर्गात सामील करून घेण्यासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची होणारी निवड केवळ त्यांच्या शारीरिक व मानसिक गुणांवरून होते. सर्वसामान्य लोकात जन्माला आलेल्या एखाद्या मुलाच्या अंगी आवश्यक ते गुण असले, तर त्याला आवश्यक ते शिक्षण देऊन त्याच्या पात्रतेनुसार त्याला पालकवर्गात किंवा साहाय्यकवर्गात स्थान मिळेल. मुलीच्या बाबतीतही असेच करण्यात येईल. तेव्हा शासकवर्गातील स्थान आनुवंशिक नसते; ते गुणांमुळे व्यक्तीला मिळते आणि गुणांच्या अभावामुळे व्यक्ती ते गमावते. पण सुप्रजाननशास्त्राच्या नियमाप्रमाणे सुदृढ आणि बुद्धिमान अशा ह्या शासकवर्गातील स्त्रीपुरुषांना झालेली संतती बहुतेककरून श्रेष्ठ गुणांची असणार आणि म्हणून शासकवर्ग प्रामुख्याने त्यांचाच बनलेला असणार, अशी प्लेटोची कल्पना होती. शासकवर्गातील व्यक्तींना लग्न करून कुटुंब स्थापन करता येत नाही. पण भावी कालात शासकवर्गात प्रविष्ट होऊ शकेल अशी तेजस्वी संतती जन्माला घालण्यासाठी ह्या वर्गातील स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे, अशी प्लेटोची भूमिका आहे.

गुहारूपक

ह्याच संवादात प्लेटोचे प्रसिद्ध गुहेचे रूपक आले आहे. समजा काही माणसांना एका गुहेत बंदिस्त करून ठेवले आहे आणि त्यांची तोंडे गुहेच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला, एका भिंतीकडे शृंखलेने जखडून ठेवली आहेत. गुहेच्या बाहेर डोकीवर पुतळे घेऊन काही लोक फिरत आहेत आणि त्यांच्या पलीकडून प्रकाश येत आहे. ह्या परिस्थीतीत गुहेतील माणसांना फक्त त्या पुतळ्यांच्या भिंतीवर पडलेल्या सावल्या दिसतील आणि ह्या सावल्या म्हणजेच खऱ्या वस्तू, असे ते मानतील. प्राकृत, सर्वसाधारण माणसे अशी गुहेतील माणसांसारखी असतात आणि सत्-सामान्यांच्या सावल्यासारख्या असलेल्या इंद्रियगोचर वस्तू ह्याच खऱ्या वस्तू आहेत, असे ती मानतात. पण तत्त्ववेत्ता हा गुहेतून सुटका करून घेतलेल्या माणसासारखा असतो. सुटून बाहेर आल्यावर काही काळ त्याला काहीच दिसेनासे होते; पण नंतर सूर्यप्रकाशात त्याला खऱ्याखुऱ्या वस्तूंचे दर्शन होते आणि गुहेत आपण सावल्या पाहत होतो, हे उमगते. त्याप्रमाणे तत्त्ववेत्त्याला सत्-सामान्ये ह्याच खऱ्या वस्तू होत आणि इंद्रियगोचर वस्तू ह्या सावल्या होत, हे ज्ञान होते.

आदर्श राज्यात असे ज्ञानी तत्त्ववेत्ते सत्ताधारी असतात. प्लेटोने तपशीलवारपणे वर्णन केलेला आदर्श समाज किंवा आदर्श राज्य हे कुठेतरी आणि कधीतरी प्रत्यक्ष अस्तित्वात असू शकेल असे राज्य नव्हे. सत्-सामान्याप्रमाणे ते केवळ आदर्शरूप आहे; प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली राज्ये ह्या आदर्शाच्या तुलनेने कमीजास्त प्रमाणात अपूर्ण आणि अवनत असणार. समजा आदर्श राज्याला कधीतरी प्रत्यक्ष अस्तित्व लाभले तरी काळाच्या अनंत ओघात कधी ना कधीतरी त्याच्या अवनतीला अटळपणे प्रारंभ होणार. आदर्श राज्याची अवनती होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन ती चालू राहिली की, राज्य अवनत, सदोष आणि विकृत अशी रुपे धारण करते. प्लेटोने राज्याची अशी चार विकृत स्वरूपे मानली आहेत. समाजाची घडण आणि मानवी व्यक्तिमत्त्वाची घडण यांच्यामध्ये मूलभूत साम्य असते ह्या आपल्या सिद्धांताला अनुसरून ह्या चार विकृत राज्यप्रकारांशी किंवा समाजव्यवस्थांशी जुळणारे असे विकृत व्यक्तिमत्त्वाचे चार प्रकारही त्याने कल्पिलेले आहेत. ग्रीक समाजात आणि प्लेटोला ज्ञात असलेल्या ‘पौर्वात्य’ समाजांत ज्या वेगवेगळ्या राज्यपद्धती प्रचलित होत्या त्यांचे वर्गीकरण आणि मूल्यमापन प्लेटो कसे करीत होता ह्याची माहिती त्याच्या ह्या विवेचनापासून मिळते. ह्या भिन्न राज्यपद्धती कोणत्या परिस्थितीत उद्‌भवतात आणि त्यांचे समाजजीवनावर आणि व्यक्तिजीवनावर कोणते परिणाम होतात, ह्यासंबंधीचे त्याचे विचारही ह्या विवेचनात आले आहेत.

आदर्श राज्यात ज्ञानी पालक निर्णय घेतात, प्रशिक्षित साहाय्यक त्यांची अंमलबजावणी करतात आणि लोक ह्या रीतीने लाभलेल्या आदेशांचे पालन करतात. ह्याच्यापासून उद्‌भवणारा पहिला विकृत राज्यप्रकार‒प्लेटोच्या मते सर्वांत कमी विकृत असा राज्यप्रकार‒म्हणजे ‘सन्मानशाही’ (Timocracy; म्हणजे सन्मान). ह्या राज्यपद्धतीत विवेकी, ज्ञानी तत्त्ववेत्त्यांकडे सत्ता नसते तर ज्ञानापेक्षा सन्मानाची आकांक्षा बाळगणाऱ्या साहाय्यकांच्या हाती सत्ता असते. विवेकाऐवजी ओजस्वी भागाचे ज्याच्यावर प्रभुत्व आहे अशा व्यक्तींचा वर्ग सत्ताधीश असतो. ह्यामुळे अशा समाजात बौद्धिक प्रगल्भतेऐवजी सैनिकी गुणांना अधिक महत्त्व असते. प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे स्पार्टाची राज्यपद्धती ह्या प्रकारची होती. पण अशा समाजात सत्ताधारी वर्गातील व्यक्तीची खाजगी मालमत्ता असते. जरी त्यांना सन्मानाची ओढ असल्यामुळे ते आपली मालमत्ता वाढविणे हे प्रमुख साध्य मानीत नाहीत तरी त्यांचे मन विवेकशील, प्रगल्भ नसल्यामुळे संपत्ती आणि भोगविलास ह्यांविषयीचे त्यांचे आकर्षण कायम आणि प्रभावी असते, ते संयम पाळू शकत नाहीत आणि ह्याच्यात ह्या राज्यपद्धतीच्या नाशाची बीजे असतात.

सन्मानशाहीपासून उद्‌भवणारी, अधिक अवनत व विकृत अशी राज्यपद्धती म्हणजे ‘धनिकशाही’ (Oligarchy–काही थोडक्यांचे शासन). ह्या राज्यांत धनिकवर्गाच्या हातात सत्ता असते, श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये वितुष्ट असल्यामुळे समाजाची एकता अधिकच भंगते आणि दारिद्र्य व संपत्तीची हाव यांमधून निर्माण होणारी गुन्हेगारी माजते.

गरीब लोक एकत्र येऊन, संधी साधून धनिकशाही उलथून पाडतात. धनिकवर्गाच्या ठिकाणी केंद्रित झालेल्या सत्तेत आता सर्व नागरिक सहभागी होतात. सर्व नागरिक आता स्वतंत्र असतात आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपापले जीवन आखू शकतात. व्यक्तींची, आचारविचाराची, जीवनपद्धतीची मुक्त विविधता हे लोकशाहीचे वैशिष्ट्य असते. ह्याचाच भाग असा की, समाजाचे व्यक्तीवर कमीत कमी नियंत्रण असते. ही समाजव्यवस्था अव्यवस्थित आणि म्हणून अस्थिर असते. प्रत्येकजण आपापल्या इच्छेप्रमाणे जगत असल्यामुळे संपत्तीची हाव असणारी माणसे आपली मालमत्ता वाढवीत असतात. इतरांची लोभी दृष्टी ह्या संपत्तीकडे गेली की, त्यांच्यापासून आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी ते पक्ष स्थापन करतात. मग धनिकांच्या पक्षापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी म्हणून एक लोकनेता पुढे येतो आणि तो लोकांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या वतीने म्हणून सर्व सत्ता हाती घेतो. अशा रीतीने लोकशाहीतून एकाधिकारशाही उदयाला येते. म्हणजे लोकनेता हुकूमशहा बनतो, त्याच्या सत्तेवर कसलेही नियंत्रण नसते आणि तो अधिकाधिक स्वच्छंदी आणि जुलमी बनतो. प्लेटोच्या मताप्रमाणे हुकूमशाही ही सर्वांत अधिक विकृत आणि अवनत अशी राज्यपद्धती होय.

ह्या चार विकृत राज्यपद्धतींशी जुळणारे असे मानवी व्यक्तिमत्त्वाचे चार विकृत प्रकार प्लेटोने कल्पिलेले आहेत. ज्याची विवेकशक्ती विकसित झालेली नाही आणि ज्याच्या भावनाविचारांवर ओजस्वी भागाचे प्रभुत्व आहे असा माणूस सन्मानशाहीशी जुळतो. संपत्ती आणि भोगविलास ह्यांची आसक्ती हा ज्याचा स्थायीभाव आहे असा माणूस धनिकशाहीशी अनुरूप असतो. ‘लोकशाही’ स्वभावाचा माणूस आपल्या प्रत्येक प्रवृत्तीला आणि प्रेरणेला सारखाच वाव देत असतो. कोणत्याही एका तत्त्वाचे प्रभुत्व ह्या प्रवृत्तींवर नसते आणि म्हणून लोकशाही माणसाचा आत्मा ‘अव्यवस्थित’ असतो. पण जेव्हा ह्या प्रवृत्तींमधील एखादी प्रवृत्ती पूर्णपणे वरचढ ठरते आणि माणूस तिच्या पूर्णपणे आहारी जातो, तेव्हा त्याचा स्वभाव ‘हुकूमशाही’शी जुळणारा असतो.

प्लेटोने लोकशाहीवर टीका केली आहे, ही गोष्ट अनेकांना खटकते. पण धनिकशाहीपेक्षा किंवा काही थोडक्यांच्या हाती सत्ता केंद्रित करणाऱ्या राज्यपद्धतीपेक्षा लोकशाही अधिक श्रेष्ठ आहे, असे प्लेटोने स्पष्टपणे म्हटले आहे. प्लेटोच्या दृष्टीपुढे असलेली लोकशाही ही आधुनिक प्रातिनिधिक लोकशाही नव्हे. ती ‘साक्षात्’ लोकशाही होती. म्हणजे नागरिक प्रत्यक्ष राज्यकारभारात भाग घेत असत. आता प्लेटोचे मुख्य तत्त्व असे होते की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने, जे कार्य करण्याची पात्रता तिच्या ठिकाणी असेल तिला अनुसरून कार्य करण्यात तिचे आणि समाजाचे हित असते आणि म्हणून राज्यकारभार करण्याची पात्रता ज्यांच्या अंगी असेल त्यांनीच राज्यकारभार चालवावा. मात्र त्यांच्या हाती अनियंत्रित सत्ता राहू नये यासाठी लोकमताचा प्रभाव आणि त्यातून निर्माण होणारी नियंत्रणे त्यांच्या सत्तेवर असावीत.

पार्मेनिडीझ आणि थीएटेटस हे दोन संवाद म्हणजे प्लेटोने आतापर्यंत विकसित केलेली सत्-सामान्यांची उपपत्ती आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने रचलेले तत्त्वज्ञान, ह्या दोहोंना जोडणारा दुवा आहे, असे म्हणता येईल. पार्मेनिडीझमध्ये सत्-सामान्यांच्या उपपत्तीचे चिकित्सक परीक्षण करण्यात आले आहे आणि थीएटेटसमध्ये ‘ज्ञान म्हणजे कार्य’ ह्या मूलभूत प्रश्नाची चर्चा करण्यात आली आहे. ह्या दोन्ही संवादांत अखेरीस काही निर्णय होत नाही; पण तत्त्वज्ञानात संकल्पनांचे जे चिकित्सक परीक्षण करायचे असते ते कसे करावे, ह्याची हे दोन्ही संवाद उत्कृष्ट उदाहरणे आहेत. तरुण सॉक्रेटीस आणि पार्मेनिडीझ यांच्यामधील पार्मेनिडीझ  हा संवाद आहे. ‘एक आणि अनेक यांच्यामधील संबंध काय आहे?’ हा जो कूट प्रश्न आहे त्याचा समाधानकारक उलगडा सत्-सामान्यांच्या उपपत्तीच्या साहाय्याने होऊ शकतो, अशी भूमिका सॉक्रेटीस मांडतो. एलिॲटिक पंथाचा संस्थापक असलेल्या पार्मेनिडीझचा सिद्धांत असा होता की, केवळ एक सत्य असते आणि अनेकांचे अस्तित्व केवळ आभासात्मक असते. ह्या पार्श्वभूमीवर सॉक्रेटीस असा विचार मांडतो की, सत्-सामान्य हे एक असते (उदा., सौंदर्य); पण त्या एका सत्-सामान्यात सहभागी होणाऱ्या व म्हणून एकाच स्वरूपाच्या असलेल्या अनेक वस्तू (उदा., सर्व सुंदर वस्तू) असतात, असे मानले की हा प्रश्न सुटतो. पण विशिष्ट वस्तू आणि सत्-सामान्य यांच्या दरम्यान ‘सहभाग’ हा जो संबंध कल्पिण्यात आला आहे त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण करता येत नाही; एकतर त्याच्यातून अनवस्थाप्रसंग निर्माण होतो आणि दुसरे म्हणजे सत्-सामान्यांचे जग आणि विशिष्ट वस्तूंचे जग ही भिन्न, एकमेकांपासून पूर्णपणे अलग अशी जगे असल्यामुळे आणि माणूस विशिष्ट वस्तूंच्या जगात असल्यामुळे, त्याला सत्-सामान्यांचे ज्ञान होणे अशक्य आहे, असा निष्कर्ष ह्या उपपत्तीपासून निष्पन्न होतो, असे पार्मेनिडीझ दाखवून देतो. हा ह्या संवादाच्या पूर्वार्धाचा विषय होय. उत्तरार्धात सॉक्रेटीसला संकल्पनांचे चिकित्सक परीक्षण करण्याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्यामुळे ह्या अडचणी उद्‌भवतात असे म्हणून पार्मेनिडीझ, अशा परीक्षणाचा नमुना त्याच्यापुढे ठेवण्यासाठी ‘एकच आहे’ ह्या स्वतःच्या सिद्धांताचे परीक्षण करतो. ह्या सिद्धांतापासून अनेक व्याघाती द्वंद्वे (Antinomies) निष्पन्न होतात, असे तो दाखवून देतो.

ह्या संवादाचे नेमके तात्पर्य काय आहे, हा कूट प्रश्न आहे. एक पटण्याजोगे मत असे आहे की, सहभाग ह्या संबंधाविषयी ज्या तार्किक अडचणी एलिॲटिक पंथी दाखवून देत असत, त्याच स्वरूपाच्या अडचणी त्यांच्या स्वतःच्या सिद्धांताविषयीही उद्‌भवतात असे सिद्ध करणे, हा ह्या संवादाचा उद्देश आहे.

‘ज्ञान’ ह्याची नेमकी व्याख्या कशी करता येईल, हा प्रश्न थीएटेटस ह्या संवादाचा प्रमुख विषय आहे. परीक्षणासाठी प्रथम घेतलेली व्याख्या म्हणजे प्रोटॅगोरसने केलेली ‘ज्ञान म्हणजे वेदन’ (Sensation) ही व्याख्या. ह्या व्याख्येचे स्पष्टीकरण असे : स्वतःचे निश्चित स्वरूप असलेल्या आणि टिकून राहणाऱ्या अशा वस्तू नसतात, फक्त गती अस्तित्वात असतात. एका विशिष्ट प्रकारची गती (म्हणजे ज्ञानेंद्रिय) आणि दुसऱ्या विशिष्ट प्रकारची गती (म्हणजे बाह्य वस्तू) ह्या जेव्हा एकमेंकींना भिडतात तेव्हा एक दुहेरी, द्विदल असे अस्तित्व उत्पन्न होते; वेदनाची, जाणिवेची क्रिया ही त्याची एक बाजू आणि ही क्रिया ज्याचे वेदन करते तो वेद्य गुण ही त्याची दुसरी बाजू. एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू असल्यामुळे त्यांची एकमेकींपासून फारकत करता येत नाही. तेव्हा ज्ञानाचा विषय असलेले सर्वांना समान असे बाह्य जग नसते. प्रत्येकाला कोणत्याही क्षणी जे जाणवत असते, ते त्या जाणिवेइतकेच आणि तिचा विषय म्हणून अस्तित्वात असते आणि म्हणून हे वेदन सत्य असते. व्यक्तीच्या क्षणिक जाणिवेपलीकडचा असा सत्याचा वस्तुनिष्ठ मानदंड नसतो.

ह्या भूमिकेवर सॉक्रेटीसने केलेली टीका अशी की, ज्ञानाची व्याप्ती क्षणिक वेदनांपासून अधिक विस्तृत असते. कारण भविष्यात मला कोणती वेदने प्राप्त होतील ह्याविषयी मी निर्णय करतो, जे घडले आहे ते चांगले आहे की नाही, ह्याविषयी मी निर्णय करतो आणि हे दोन प्रकारचे निर्णय सर्व माणसे सारख्याच चांगल्या प्रकारे करतात असे आपण मानत नाही. म्हणजे ज्याला जे वाटते ते त्या क्षणी सत्य असते आणि सत्याच्या बाबतीत कुणाचीही जाणीव इतर कुणाच्याही जाणिवेपेक्षा अधिक श्रेष्ठ नसते, असे आपण मानत नाही. शिवाय इंद्रियाला जाणीव होत नाही. आत्म्याला इंद्रियाद्वारा जाणीव होते हे समजून घेतले की, आत्म्याला काही गोष्टींची इंद्रियाव्यतिरिक्त जाणीव होते, हेही आपल्याला कळून येते. उदा., संख्या, साम्य, अस्तित्व इत्यादी. ह्या ज्ञानातील आकारिक घटकांचा उपयोग इंद्रियांकडून लाभलेल्या आशयाविषयी निर्णय घेण्यासाठी आपण करतो. तेव्हा ज्ञान म्हणजे केवळ वेदन नव्हे, तर वेदनांविषयी आत्म्याने केलेले निर्णय.

मग ज्ञान म्हणजे सत्य निर्णय अशी व्याख्या करता येईल का? पण सत्य निर्णय म्हणजे काय हे माहीत असण्यासाठी असत्य निर्णय किंवा भ्रांती म्हणजे काय, हेही माहीत असले पाहिजे. आणि असत्य निर्णय म्हणजे काय, ह्याचा उलगडा कुणाला ह्या संवादात करता आला नाही (हा प्रश्न पुढे सॉफिस्ट ह्या संवादात चर्चेसाठी आला आहे). पुढे करण्यात आलेली तिसरी व्याख्या अशी की, ज्ञान म्हणेज ‘विवेचना’समवेत असलेला सत्य निर्णय. ह्याचा अर्थ असा की, व्यक्तीला ज्ञान आहे ह्या म्हणण्याचा अर्थ त्याचा निर्णय सत्य आहे आणि ह्या सत्यत्वाचा जो आधार असेल, त्याची माहिती त्याला आहे. ही व्याख्या वर्तुळात्मक आहे हे उघड आहे. कारण ज्ञान म्हणजे ‘सत्य निर्णय अधिक त्याच्या आधाराचे ज्ञान’ असा तिचा अर्थ होतो. ज्या पदाची व्याख्या करायची आहे तेच परत व्याख्येमध्ये येते.

तेव्हा थीएटेटसमध्ये ज्ञानाची व्याख्या करण्यात अपयश आले आहे. ह्या संवादात सत्-सामान्याचा निर्देश नाही. तेव्हा सत्-सामान्यांचे साहाय्य घेतल्याशिवाय ज्ञानाची व्याख्या करता येणे अशक्य आहे, हे अप्रत्यक्ष रीत्या दाखवून देणे हे ह्या संवादाचे प्रयोजन आहे, असा अनेक भाष्यकारांचा तर्क आहे.

सॉफिस्ट आणि स्टेट्समन (राजकारणी) हे एकमेकांशी जोडण्यात आलेले असे दोन संवाद आहेत. ह्या संवादांचा दर्शनी उद्देश वस्तूंचे वर्गीकरण आणि त्याच्याशी संबंधित असलेली वस्तुप्रकाराची व्याख्या ह्यांचे, प्रमाण विचाराच्या दृष्टीने असलेले महत्त्व दाखवून देणे आहे. सॉफिस्टचा आणखी एक अधिक खोल असा उद्देश आहे. तो म्हणजे नकारी विधेयन–अमुक अमुक नाही असे सांगणारे विधान – कसे शक्य असते, हे दाखवून देणे. ह्या प्रश्नाचा संबंध आभास किंवा भ्रांती यांचे स्वरूप काय असते, ह्या प्रश्नाशी पोहोचतो. एलिॲटिक तत्त्ववेत्त्यांनी असा युक्तिवाद केला होता : भ्रांती म्हणजे ‘जे नाही ते आहे असे मानणे’ पण जे नाही ते नसल्यामुळे ते आहे असे मानता येणे अशक्य आहे. तेव्हा भ्रांती, आभास ह्याचा विषय असलेले काही असत नाही आणि जे आहे त्याचे स्वरूप निश्चित केल्यानंतर त्याच्याहून भिन्न आभासात्मक काही असत नाही. ह्या युक्तिवादाच्या आधारे इंद्रियगोचर वस्तूंचे अस्तित्व त्यांनी समूळ नाकारले होते. सॉफिस्टमधील चर्चेनंतर निष्पन्न झालेले मत असे की, ‘अ ब नाही’ ह्या स्वरूपाच्या नकारी विधेयनात ‘अ नाही’ असे सांगितलेले नसते, तर ‘अ ब हून भिन्न आहे’ म्हणजे ‘अ आणि ब यांच्यात भेद आहे’, असे सांगितलेले असते. भेद हा पदार्थ सत्-सामान्यांच्या सबंध जगाला व्यापणारा आहे. कारण कोणतेही सत्-सामान्य घेतले, तर ते आणि अन्य कोणतेही सामान्य यांच्यामध्ये भेद असतो. भेदाप्रमाणे अस्तित्व, तादात्म्य, गती (परिवर्तन) आणि स्थिती हेही असे सर्वव्यापी पदार्थ आहेत. उदा., कोणत्याही सत्-सामान्याचे स्वतःशी तादात्म्य असते. सत्-सामान्यांच्या विश्वाला ह्या आकारिक पदार्थांनी व्यापल्यामुळे त्यांची एक व्यवस्था बनते आणि ह्या व्यवस्थेचे घटक असलेल्या सत्-सामान्यांमधील परस्परसंबंध अलगदपणे उलगडून दाखविणे, हे ‘डायलेक्टिक’ ह्या ज्ञानशाखेचे काम असते.

स्टेट्समन ह्या संवादाचा विषय राजसत्ता कुणाकडे असावी, हा आहे. मानवी समाजाचे मार्गदर्शन आणि नियमन जर देवाकडे सोपवता आले असते, तर ती सर्वोत्कृष्ट परिस्थिती ठरली असती; पण ते शक्य नाही. ह्या परिस्थितीला सर्वांत जवळचा पर्याय म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष अशा नियमाचे किंवा कायद्याचे अधिराज्य असणे. अशा कायद्याचे पालन करणारा राजा जर असेल, तर राजसत्ता ही सर्वांत चांगली राजकीय व्यवस्था होय. पण असा कायदा जर सार्वभौम आहे असे जर राजा मानत नसेल, तर तो झोटिंगशहा ठरतो; आणि एका व्यक्तीच्या झोटिंगशाहीपेक्षा लोकशाही अधिक ग्राह्य ठरते.

फिलेबस  हा नीतिशास्त्रावरील संवाद आहे. मानवी कल्याणाचे स्वरूप काय आहे, हा त्याचा मुख्य विषय आहे. मानवी कल्याण सुखात, अनुकूल वेदनेच्या अनुभवात सामावलेले असते का, की ते बुद्धीमध्ये, बुद्धीच्या व्यापारामध्ये, उदा., ज्ञानार्जनात सामावलेले असते? प्लेटोचा निष्कर्ष असा आहे की, मानवी कल्याणात ह्या दोन्ही घटकांना स्थान असणे आवश्यक आहे; पण बुद्धी हा अधिक श्रेष्ठ असा घटक आहे. कारण प्लेटोच्या मताप्रमाणे कल्याण किंवा कोणतीही इष्ट किंवा चांगली वस्तू घेतली, तर तिचे स्वरूप मिश्र असते. अनंत, असीम (निराकार) अशा कशाला तरी सीमित करून (निश्चित आकार देऊन) तिचे स्वरूप सिद्ध झालेले असते. असीम अशा द्रव्याला सीमित करण्याचे काम बुद्धी करते. आता सुखवेदना घेतली तर तिच्या उत्कटतेला किंवा कालावधीला स्वतःची अशी मर्यादा नसते. तेव्हा सुखवेदना चांगली, इष्ट, कल्याणप्रद ठरण्यासाठी तिला सीमित करणे आवश्यक असते आणि केवळ बुद्धीच हे काम करू शकते. म्हणून मानवी कल्याणात हे दोन्ही घटक असले, तरी त्यांच्यात बुद्धीचे स्थान वरचढ आहे.

टायमिअस  आणि त्याच्याशी जोडलेला, त्याच्या नंतरचा आणि अर्धवट राहिलेला संवाद क्रिटिअस. ह्या संवादांचा विषय विश्वस्थितिशास्त्र (Cosmology) हा आहे. ईश्वर, विश्वाची उत्पत्ती आणि रचना, जीवांची रचना इ. गोष्टींविषयीचे प्लेटोने काढलेले निष्कर्ष किंवा केलेले तर्क त्यात मांडण्यात आले आहेत. नित्य, परिपूर्ण आणि अपरिवर्तनीय अशी सत्-सामान्ये आणि अपूर्ण व परिवर्तनशील अशा इंद्रियगोचर वस्तू हा भेद अर्थात येथेही प्रस्तुत आहे. फक्त नित्य पदार्थांचेच खरेखुरे ज्ञान आपल्याला होऊ शकते; इंद्रियगोचर वस्तूंविषयीच फक्त मत बनविता येते. ग्रीक तत्त्वज्ञानात आणि विज्ञानात त्या वेळेपर्यंत जी वेगवेगळी मते मांडण्यात आली होती ‒ उदा., पायथॅगोरस आणि  एंपेडोक्लीझ यांनी ‒ त्यांचा आधार घेऊन प्लेटोने आपले तर्क आणि निष्कर्ष बनविले आहेत.

इंद्रियगोचर व परिवर्तनशील असे हे जे विश्व आहे त्याच्या अस्तित्वाला कालामध्ये प्रारंभ होते; ते नित्य नाही. ते ईश्वराने रचलेले आहे. ह्या रचनेसाठी ईश्वर परिपूर्ण सत्-सामान्ये आदर्श म्हणून स्वीकारतो आणि त्यांच्या प्रतिकृती म्हणून इंद्रियगोचर वस्तू बनवितो. ईश्वर बुद्धी आणि सदिच्छा ह्या गुणांनी युक्त असा आहे; म्हणून तो परिपूर्ण सत्-सामान्यांना आदर्श नमुने म्हणून स्वीकारतो आणि सुव्यवस्थित असे विश्व बनवितो. आदर्श सत्-सामान्यांच्या प्रतिकृती बनविण्यासाठी द्रव्य आवश्यक आहे. हे द्रव्य म्हणजे अवकाश-सत्-सामान्य. हे आकारिक आणि बुद्धिग्राह्य असते. विशिष्ट वस्तू ही द्रव्याला (अवकाशाला), सत्-सामान्यांनी आकारित केल्याने घडलेली असते आणि द्रव्याला आकार देण्याचे हे कार्य ईश्वराने, बुद्धियुक्त अशा ईश्वराने केलेले असते. तेव्हा विश्वाचे स्वरूप समजण्यासाठी ईश्वर, सत्-सामान्ये आणि अवकाशरूप द्रव्य ही तीन तत्त्वे समजून घेतली पाहिजेत. बुद्धिग्राह्य अशा सत्-सामान्याव्यतिरिक्त द्रव्य असा घटक विशिष्ट वस्तूच्या घडणीत असतो ह्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की, बुद्धीला ज्याचे पूर्णपणे आकलन करता येत नाही, असे एक तत्त्व विशिष्ट वस्तूंच्या घडणीत सामावलेले असते. ह्या तत्त्वाला प्लेटो ‘अनिवार्यता’ म्हणतो. विश्वरचनेमध्ये ईश्वराचे जे कल्याणकारी प्रयोजन असते त्याला अनुकूल असे हे तत्त्व आहे आणि म्हणून ह्या प्रयोजनाचे ते साधन बनते. प्लेटोच्या ह्या संवादात अगोदरचे ग्रीक तत्त्ववेत्ते, गणिती आणि वैज्ञानिक ह्यांनी विकसित केलेल्या अनेक विचारांची सूत्रे आढळतात. विज्ञानातील नंतरच्या विचारधारांवर त्याचा मोठाच प्रभाव पडला आहे.

लॉ (कायदे) हा प्लेटोचा सर्वांत दीर्घ ग्रंथ आहे. नगरराज्याच्या जीवनाच्या सर्व अंगांचे नियमन कोणत्या पद्धतीने करावे हा त्याचा विषय आहे. पण रिपब्लिक ह्या संवादाप्रमाणे आदर्श नगरराज्याचे चित्रण करणे हे त्याचे उद्दिष्ट नाही. त्याचे उद्दिष्ट अतिशय व्यावहारिक आहे. प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या ग्रीक नगरराज्यांनी, जी स्वीकारता येईल आणि पाळता येईल अशी राज्यघटना बनविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

नगरराज्य हे शेतीवर आधारलेले असावे, व्यापारावर आधारलेले असू नये हे प्लेटोच्या विचारातील एक मूलभूत सूत्र आहे. व्यक्तीने मिळविलेली एका विशिष्ट मर्यादेवरील संपत्ती सरकारात जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यघटना संमिश्र स्वरूपाची राहील. एका व्यक्तीची राजसत्ता आणि लोकमताचा तिच्यावरील अंकुश ह्यांच्यात समतोल निर्माण करू पाहणारी ती घटना आहे. लोकमताचा प्रभाव शासनावर राहील, पण चारित्र्य आणि गुणवत्ता अंगी असलेल्या व्यक्तींचे हे मत असेल, ही गोष्ट ह्या राज्यघटनेला साधायची आहे. रिपब्लिक ह्या संवादात रक्षकवर्गाच्या सामाजिक पत्नी असतील आणि सामायिक मुले असतील अशी जी व्यवस्था प्लेटोने घालून दिली होती, तिच्याऐवजी एकच पती आणि एकच पत्नी मान्य करणारी विवाहसंस्था तो आता मान्य करतो. अर्थात, विवाहबाह्य संबंधांना आणि इतर प्रकारच्या लैंगिक दुर्वर्तनाला पूर्ण मज्जाव आहे. नागरिकांच्या नीतीचे नियमन करणे हे ज्याप्रमाणे शासनाचे एक कर्तव्य आहे, त्याप्रमाणे त्यांना शिक्षण देणे हेही त्याचे सर्वांत महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्लेटो शिक्षणाच्या बाबतीत मुली व मुलगे यांच्यामध्ये भेद करीत नाही. पाश्चात्त्य समाजात विकसित झालेली शिक्षणपद्धती, न्यायपद्धती, राज्यपद्धती यांवर ह्या संवादातील विचारांचा फार मोठा पगडा आहे.

ईश्वराच्या अस्तित्वावरील आणि चांगुलपणावरील श्रद्धा नीतीला पायाभूत आहे, असे प्लेटो मानतो. ह्या संदर्भात तीन असत्य मते प्रचलित आहेत, असे त्याचे म्हणणे आहे. ही तीन मते म्हणजे अनीश्वरवाद, नैतिक नियमांना अनुसरून विश्वाचे नियमन होत नाही हे मत आणि हवी देऊन किंवा नवस फेडून ईश्वराला संतुष्ट करता येते आणि आपल्या कृत्याविषयीचा ईश्वराचा निवाडा बदलता येतो हे मत. तार्किक युक्तिवादाने ह्या असत्य मताचे खंडन करता येते आणि ईश्वराचे अस्तित्व, त्याचा चांगुलपणा, विश्वाचे तो करीत असलेले नैतिक नियमन ह्या गोष्टी सिद्ध करता येतात, असे प्लेटोचे म्हणणे होते आणि हे युक्तिवाद त्याने ह्या संवादात मांडलेले आहेत. वरील असत्य मते स्वीकारणे हा प्लेटोच्या नगरराज्यात एक मोठा गुन्हा ठरत होता.

प्लेटोचा प्रभाव : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेवर प्लेटोचा पडलेला प्रभाव अनन्यसाधारण असा आहे. प्लेटोनंतरच्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे सामान्यपणे वर्णन करायचे, तर ‘प्लेटोच्या सिद्धांतांना जोडलेल्या तळटीपा’ असे ते करता येईल, अशा अर्थाचे ए. एन. व्हाइटहेड यांचे वचन आहे. तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचे खंडन-मंडन करणाऱ्या युक्तिवादांचे वाहक असलेल्या (पाश्चात्त्य परंपरेतील) गद्याचा प्लेटो निर्माता होता.

प्लेटोच्या तत्त्वज्ञानात प्रतिबिंबित झालेले त्याचे व्यक्तिमत्त्व अनेकांगी होते. प्लेटो कवी होता; त्याबरोबरच गणितात मूर्त झालेली शुद्ध विचार करण्याची शक्ती‒विवेकशक्ती‒हे अंतिम सत्य ग्रहण करण्याचे अमोघ साधन आहे, असा त्याचा ठाम विश्वास होता. त्याची वृत्ती पराकाष्ठेची धार्मिक होती, त्याच्या धार्मिक श्रद्धेला अंतिम अस्तित्वाच्या एका तत्त्वमीमांसक दर्शनाचे अधिष्ठान होते आणि ह्या दर्शनावर आधारलेल्या नीतीचे पालन केल्यानेच व्यक्तीला आणि समाजाला स्वतःचे हित साधता येते, अशी प्लेटोची दृढ धारणा होती. ह्यामुळे, गणित, विज्ञाने, तत्त्वमीमांसा, धर्म, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र इ. शास्त्रांतील समस्यांची प्लेटोने अतिशय जिव्हाळ्याने आणि कसोशीने चिकित्सा केली आहे. आपल्या तत्त्वज्ञानात प्लेटोने जे सिद्धांत आणि जी मते मांडली आहेत, ती ग्रीक नैतिक आणि सामाजिक जीवनात आणि ज्ञानाच्या क्षेत्रात ह्या समस्यांची त्याच्या काळी जी विशिष्ट स्वरूपे होती त्यांच्या संदर्भात मांडली आहेत.

प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा गाभा ह्या तत्त्वज्ञानात अंतर्भूत असलेल्या काही घटकांचा मिळून बनलेला आहे, असा दृष्टिकोन दृढ झाला आहे. ह्या गाभ्याला ‘प्लेटो मत’ (Platonism) म्हणण्याचा प्रघात पडला आहे. हे घटक थोडक्यात असे मांडता येतील : खरेखुरे सत् अनुभवातीत आहे. अनुभवाचे विश्व दुय्यम दर्जाचे, असे ह्या सत्‌चे प्रतिबिंब आहे. सत्‌चे ग्रहण विवेकाद्वारा आणि विवेकावर आधारलेल्या साक्षात अनुभवाद्वारा, प्रातिभ ज्ञानाद्वारा होते; सत्‌च्या किंवा वास्तवतेच्या इयत्ता, पायऱ्या  असतात; माणसाचा आत्मा देहाहून भिन्न असतो, तो (किंवा त्याचा एक घटक) अनुभवातीत सत्‌शी संलग्न असतो, (आत्मा किंवा त्याचा हा घटक) अमर असतो, अनुभवातीत सत्‌चे ज्ञान किंवा प्रातिभ दर्शन साधण्यात माणसाचे सर्वश्रेष्ठ श्रेय असते आणि हे श्रेय साधणे हे नैतिक साधनेचे उद्दिष्ट असते; खरी नीती ही सत्‌च्या ज्ञानावर आधारलेली असते; खरी नीती केवळ नैतिक कृत्ये करण्यात सामावलेली असते, ती माणसाचे खरेखुरे श्रेय साधण्यात सामावलेली असते. हे सिद्धांत सामान्यपणे स्वीकारणाऱ्या तात्त्विक दर्शनाचे किंवा जीवनदृष्टीचे वर्णन प्लेटोवादी (Platonic) असे करण्यात येते. अनुभववाद, जडवाद, सुखवाद ही प्लेटो मताला किंवा प्लेटोवादाला विरोधी असलेली मते होत.

प्लेटोचा प्रमुख शिष्य ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४‒३२२) तसेच प्लेटोने प्रस्थापित केलेल्या अकादमीतील त्याच्या अनुयायांवर प्लेटोच्या विशिष्ट सिद्धांतांचा प्रभाव अर्थात पडला आहे. नव-प्लेटो मताचा संस्थापक प्लोटायनस (२०५‒२७०) याच्या तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती सिद्धांत प्लेटोच्या तत्त्वज्ञानात आढळत नसले, तरी त्याचे दर्शन वर स्पष्ट केलेल्या अर्थाप्रमाणे ‘प्लेटोवादी’ आहे व म्हणूनच ते ‘नव-प्लेटो मत’ म्हणून ओळखण्यात येते.

फायलो जूडीअस (इ.स.पू.सु. २०‒इ.स.सु. ४०) हा ज्यू धर्मशास्त्रवेत्ता आणि तत्त्ववेत्ता, ॲलेक्झांड्रियाचा क्लेमेंट (सु. १५०‒सु.२११), ऑरिजेन (सु. १८५‒सु. २५४), सेंट ऑगस्टीन (३५४‒४३०) हा ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ता, प्रॉक्लस (४१०‒४८५) हा नव-प्लेटो मतवादी तत्त्ववेत्ता आणि जोहॅनीझ स्कोटस एरिजेना (सु. ८१०‒सु. ८७७) हा ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ता हे प्लेटोच्या तत्त्वज्ञानाने  प्रभावित झालेले प्रमुख विचारवंत होत. इस्लामी तत्त्वज्ञानातही अल्–किंदी (सु. ७९६‒सु. ८७३), अल्-राझी (मृ.सु. ९३०), इब्न सीना (९८०‒१०३७) ह्या पहिल्या श्रेणीच्या विचारवंतांवर प्लेटोचा प्रभाव आढळतो. तेराव्या शतकात ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचे पश्चिम यूरोपमध्ये पुनरुज्जीवन होण्यापूर्वी मध्ययुगातील तत्त्वज्ञानावर प्लेटोच्या सिद्धांतांचाच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पगडा होता. प्रबोधन काळात फ्लॉरेन्स येथील अकादमी हे प्लेटो मताचे मोठे केंद्र झाले. जॉन कॉलेट (१४६६‒१५१९), सर टॉमस मोर (१४७८‒१५३५) इ. ऑक्सफर्ड सुधारकांनी प्रचलित ख्रिस्ती धर्माचे आध्यात्मिकरण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याचे अधिष्ठान प्लेटोचे तत्त्वज्ञान होते. हा प्लेटोवादी परंपरेला आलेला शेवटचा बहर होय.

आधुनिक काळात गणिती आणि अनुभवाधिष्ठित विज्ञानाचा उदय झाल्यानंतर तत्त्वज्ञानाने वेगळे वळण घेतले. पण योहानेस केप्लर (१५७१‒१६२९) आणि गॅलिली गॅलिलीओ (१५६४‒१६४२) यांनी नैसर्गिक प्रक्रियांचे विश्लेषण आणि वर्णन करण्यासाठी गणिताचा जो वापर केला, त्याची बीजे प्लेटोच्या विचारात आढळतात. आधुनिक काळात वैज्ञानिक ज्ञान वगळले तर धर्म आणि काव्य ह्या प्रांतांत प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आढळतो. सतराव्या शतकातील ‘केंब्रिज प्लेटॉनिस्ट’ ह्या नावाने ओळखले जाणारे विचारवंत धार्मिक जीवनाच्या आंतरिकतेवर आणि शुद्ध आध्यात्मिकतेवर जो भर देत, त्याचा उगम प्लेटोच्या तत्त्वज्ञानात होता आणि इंग्लिश धार्मिक परंपरेतील हा एक महत्त्वाचा प्रवाह आजतागायत अखंडित आहे. तसेच एडमंड स्पेन्सर, वर्ड्‌स्वर्थ आणि शेली यांच्या काव्यावर प्लेटोचा स्पष्टपणे जाणवणारा प्रभाव आहे. आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये फ्रीड्रिख एर्न्स्ट श्लायरमाखर (१७६८‒१८३४), जी. डब्ल्यू एफ. हेगेल (१७७०‒१८३१), ब्रिटिश चिद्‌वादी तत्त्ववेत्ते आणि ए.एन. व्हाइटहेड (१८६१‒१९४७) हे प्लेटोने प्रभावित झालेल्या तत्त्ववेत्त्यांतील प्रमुख होत.

संदर्भ :

  • Bluck, R. S. Plato’s Life and Thought, London, 1949.
  • Field, G. C. The Philosophy of  Plato, Oxford, 1949.
  • Jowett, Benjamin; Trans. The dialogues of Plato, 4 Vols; Oxford, 1953.
  • Ross, W. D. Plato’s Theory of Ideas, Oxford, 1953.
  • Taylor, A. E. Plato : The Man and His Work, London, 1926.