श्रीधर व्‍यास : (इ. स.१४ व्‍या शतकाचा उत्‍तरार्ध). गुजरातमधील ईडरच्या राव रणमलच्‍या आश्रयास असलेले ब्राह्मण कवी. ते संस्‍कृतचे चांगले जाणकार होते. रणमल-छंद या त्यांच्या कृतीच्‍या आरंभी आलेल्‍या आर्येत तैमूरलंगाच्‍या आक्रमणाचा (१३९८) निर्देश आल्‍याने कवी या काळात हयात असल्‍याचा अंदाज करता येतो. ईडरचा राव रणमल आणि पाटणचा सुभा, मीर मलिक मुफर्रह यांच्‍यात झालेले युद्ध (१३९०) आणि त्‍यात रणमलचा झालेला विजय याचे चित्रण करणारी ७० कडीची रणमल-छंद ही काव्‍यकृती वीररसयुक्‍त असून ती ऐतिहासिक दृष्‍टीनेही महत्‍त्‍वाची रचना आहे. त्‍यातील वीररसपोषक अशी अपभ्रंशाची अवहळ प्रकारची भाषा ही तिची आणखी एक वैशिष्‍ट्यता आहे. मार्कंडेयपुराणातील देवीचरित्र अथवा चंडीआख्‍यानाच्‍या आधारे रचलेले १२० कडीचे ईश्‍वरी-छंद-देवीकवित-भगवती भागवत-सप्‍त सती-सहस्रछंद हे काव्‍य तसेच १२७ कडीचे अपूर्ण असलेले भागवतदशमस्‍कंध-कवित भागवत हे काव्‍य, या कवीच्‍या अन्‍य रचना आहेत.केशवलाल यांनी पंदरमा शतकनां प्राचीन गुर्जर काव्य या ग्रंथात व्यास यांच्या रचनांचे संपादन केले आहे.

संदर्भ :

  • मुन्शी क.मा.,मध्यकाळनो साहित्यप्रवाह (गुजराती साहित्य खंड – ५),बडोदा,१९२९.

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा