यशोविजय : (जन्म. १७ व्या शतकाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दशक – मृत्यू इ. स. १६८७) गुजरातमधील तापगच्छचे जैन साधू. ज्ञाती वानिक. उत्तर गुजरातमधल्या पाटण जवळच्या कनोडु येथील रहिवासी.पूर्वाश्रमीचे नाव जसवंत. काशीत राहून न्याय-मीमांसा, सांख्य, वैशेषिक इ. चा ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांना विद्वानांकडून न्यायविशारदचे बिरुद मिळाले. आग्र्यातही त्यांना तार्किक शिरोमणीचे पद प्राप्त झाले होते. यशोविजय हे जैन परंपरेतील प्रतिभाशाली विद्वान म्हणून ओळखले जातात. जैन शास्त्रांबरोबरच वैदिक आणि बौद्धशास्त्राचा सखोल अभ्यास केल्यामुळे संप्रदायबद्ध न राहता, ते निर्भयतेने आपले मत प्रकट करीत असत. त्यांनी प्राकृत, हिंदी आणि गुजरातीत गद्य आणि पद्यरचना मोठ्या प्रमाणात केल्या असून, त्यात विषय व स्वरूप वैविध्य आहे. अध्यात्मविचार, ज्ञानमीमांसा, न्याय, तर्कशास्त्र, भक्ती-चरित्र-गान, तत्कालीन धर्मानुयायी आणि मुनिजनांच्या अंधश्रद्धा, दंभ, पाखंड यावर केलेले प्रहार यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी साहित्य सर्जन केले आहे. उत्तरवयात रचलेली जम्बू स्वामी-रस ही साहित्यदृष्टीने त्यांची सर्वात लक्षणीय कृती. दृष्टांत कथांचे उपयोजन, उस्फुर्त कल्पनाशिलता, अलंकरणविरहित पदावली इ. अनेक घटकांनी ही कृती मनोरम झाली आहे. श्रीपाळ राजानो रास ही त्यांची कथात्मक कृती होय. द्रव्यगुण पर्यायनो रास ही तात्विक चर्चा करणारी कृती असून, समुद्र-वहाणसंवाद ही समुद्र व जहाज यांच्या संवादाची, गर्व त्यागाचा बोध करणारी रुपकात्मक कृती आहे. कुमतिमंद गालन, शांतिजीन स्तवन, सीमंध राजिंस्तवानो, मौन एकादशीनुं गलनु, ढुंक मतखंड, दशमताधिकारे वर्धमान जिनेश्वर स्तवन ही कडी व ढाळ या रचनाबंधातील सिद्धांतविवरणासाठी रचलेली दीर्घस्तवने त्यांच्या रचना महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर धर्म, शास्त्र यांची चर्चा, भक्तीचा बोध कारणाऱ्या त्यांच्या अगीयार अंगनी सझाय, प्रतिक्रमण हेतुगर्भीत-सझाय, अढार पापस्थाननि सझाय, योगनी आठ दृष्टीनी सझाय, संयम श्रेणी विचार सझाय या महत्वाच्या रचना आहेत. याशिवाय जंबू स्वामी-गीता, पंचपरमेष्ठी गीता,जसविलास ही अष्टपदी स्तुतीपर रचना, दिक्पट चोरासी बोध-चर्चा ही हिंदीभाषेतील कृती, ब्रजभाषेचा प्रभाव असलेली होरी पदांसारखी गुजराती रचना यावरून त्यांचे अनेक भाषांवरील प्रभुत्व लक्षात येते. संस्कृत तसेच प्राकृत भाषेत यशोविजय यांच्या नावावर जवळजवळ ६० अथवा त्यापेक्षाही अधिक कृती प्राप्त आहेत.
संदर्भ :
- पू.मुनिप्रवर श्रीयशोविजयजी (संपा),श्रीयशोविजय स्मृतिग्रंथ,बडोदा ,१९५७.