तेलंगणा राज्यातील विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना २ ऑक्टोबर १९७४ रोजी सांसदीय अधिनियम (क्र. ३९) १९७४ नुसार केंद्रीय विद्यापीठ म्हणून झाली. विद्यापीठाचा २०१८ मध्ये जागतिक विद्यापीठांमध्ये ६०१ – ६५० नामंकन आहे, तर भारतातील सर्व विद्यापीठांतून अकरावे नामांकन असून राष्ट्रीय नामांकन संस्थेच्या कार्यचौकटीनुसार विद्यापीठाचा भारतात चौथा क्रमांक आहे (२०१९). हैदराबाद शहराजवळ गाचीबावली या परिसरात हे विद्यापीठ वसले आहे. अध्यापनात्मक स्वरूपाच्या या विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन यांवर विशेष भर दिला जातो. ‘सा विद्या या विमुक्तये’ हे विद्यापीठाचे ब्रीद असून प्रा. अप्पा राव पोडीले हे विद्यापीठाचे कुलगुरू, तर पी. सरदार सिंग हे कुलसचिव आहेत (२०१९).

अध्ययनार्थ्यांना शिक्षण व संशोधन या सुविधा प्रदान करून ज्ञान प्रसारित करणे व शैक्षणिक प्रगती करणे हे विद्यापीठाचे मुख्य ध्येय आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये मानव्यविद्या व विज्ञान या शाखांतील समकालीन अभ्यासासाठी विद्यापीठामार्फत विशेष तरतूद करण्यात येते. त्याचबरोबर आंतरशास्त्रीय अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी अध्ययनार्थी प्रोत्साहित व्हावे, याकरिता विद्यापीठाद्वारे उपाययोजना करण्यात येते.

हैदराबाद विद्यापीठ-प्रशासकीय भवन

विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, कला व संदेशवहन, जीवविज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, अर्थशास्त्र, गणित व सांख्यिकी, संगणक आणि माहितीविज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि रसायनशास्त्र या १० विद्याशाखा आणि त्यांना संलग्नित सुमारे ४६ विभाग आहेत. तसेच विद्यापीठात ४ संशोधन संस्था व १९ विशेष शैक्षणिक केंद्रे आहेत. विद्यापीठाचा कायदा इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च अधिकारी असतात. एम. ए.; एम. एस्सी.; बी. टेक.; एम. सी. ए.; एम. फिल.; पीएच. डी. इत्यादी अभ्यासक्रमांच्या अध्यापनाची–मार्गदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध आहे.

विद्यापीठातील इंदिरा गांधी स्मृती ग्रंथालय हे भारतातील पहिले विद्यापीठ ग्रंथालय आहे. विद्यार्थी, संशोधक इत्यादींना महत्त्वपूर्ण माहिती पुरविणारे हे ग्रंथालय विद्यापीठातील केंद्रीय सुविधा पुरविणाऱ्या शाखांपैकी एक आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता विढविण्यासाठी योगदान देऊन ग्रंथालयास सर्वांत प्रभावी शिक्षण संसाधन केंद्र बनविणे, हा ग्रंथालयाचा मुख्य उद्देश आहे. हे ग्रंथालय ३,५६,००० पुस्तकांनी सुसज्ज असून ६०० देशीविदेशी नियतकालिके, १८,००० आंतरजालीय नियतकालिके आणि १० आंतरजालीय माहितीपत्रके येथे उपलब्ध आहेत (२०१९). त्याचप्रमाणे या ग्रंथालयाचे संगणीकरण झाले असून महाजालकावर ७,२६७ इ-ग्रंथ आणि १३० संगणकीय ग्रंथ उपलब्ध आहेत. ग्रंथालयाने आधुनिक उपकरणांच्या साह्याने शैक्षणिक वातावरणात निर्माण केले असून ग्रंथालय क्षेत्र हे लॅपटॉप झोन विथ वाय-फाय फॅसिलिटीज, ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग सर्चिंग एरिया, इंटरनेट ब्राउझिंग एरिया फॉर ॲक्सेसिंग इ-रिसोर्सेस, स्पेशलाइज्ड वर्कस्टेशन आणि दृष्टिहीन-आव्हानात्मक विद्यार्थांसाठी विशेस सॉफ्टवेअर या सुविधांनी सुसज्ज आहे. भारतीय कला व संस्कृती, सामाजिक चळवळी यांच्यासमवेतच डॉ. भीमराव आंबेडकर, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू यांच्या विचारांचे अध्ययन आणि संशोधन करणारी केंद्रेही विद्यापीठात स्थापन करण्यात आली आहेत. विद्यापीठाचा संशोधनावर भर असल्याने विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांशी विद्यापीठ संलग्न आहे.

हैदराबाद विद्यापीठ, वसतीगृहे

विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बाहेरील विद्यार्थांसाठी २१ (१३ मुलांचे व ७ मुलींचे) वसतीगृहे आहेत. त्यामध्ये २२.५% जागा अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींच्या विद्यार्थांसाठी, तर ३% जागा दिव्यांग विद्यार्थांसाठी राखीव आहे. आजमितीस सुमारे ४०० प्राध्यापक येथे कार्यरत असून सुमारे ५,००० विद्यार्थी अध्ययन करीत आहेत (२०१९).

 

 

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा