महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही अतीदुर्गम जिल्ह्यांचा शैक्षणिक व इतर कार्यक्षेत्रांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून गडचिरोली येथे स्थापन करण्यात आलेले विद्यापीठ. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ (१९९४ चा महा. ३५) च्या कलम ३ च्या पोटकलम (२) अन्वये महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम क्रमांक ६) नुसार २ ऑक्टोबर २०११ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) विद्यापीठाचे विभाजन होऊन या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. डॉ. नामदेव वेंकटराव कल्यानकर हे विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. चंद्रशेखर भुसारी हे उपकुलगुरू, तर डॉ. ईश्वर मोहुर्ले हे कुलसचिव आहेत (२०१९). विद्यापीठाचे कार्यालयीन कामकाज सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते १.३० आणि दुपारी २.०० ते ५.३० (दुसरा व चौथा शनिवार वगळून) सुरू असते. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम्’ (ज्ञानातूनच मोक्ष प्राप्ती होते.) हे विद्यापीठाचे घोषवाक्य आहे.

विद्यापीठ स्थापनेपूर्वी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक महाविद्यालयांना नागपूर येथील विद्यापीठात जाऊन प्रशासकीय कामे करणे मानसिक, शारिरीक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासाचे होते. परिणामत: चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी गडचिरोली हे विद्यापीठाचे प्रथम उपकेंद्र व नंतर कायमचे विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभाजनाच्या वेळी १७७ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाला हस्तांतरीत करण्यात आली होती. त्यानंतर नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने सध्या विद्यापीठाशी २०८ महाविद्यालये संलग्न असून त्यांपैकी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ७९ महाविद्यालये आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १२९ महाविद्यालये यांचा त्यात समावेश आहे (२०१८-१९).

गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील लोकांचे जीवनमान तेथील वनसंपदा व नैसर्गिक साधनांवर आधारित असून ते पारंपारिक व्यवसाय पद्धतींचा अवलंब करून आपली उपजिविका करतात. त्यामुळे येथील उच्च शिक्षणाचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा फार कमी असल्याने या भागातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. या बाबीकडे लक्ष केंद्रित करून स्वयंरोजगारभिमुख नवीन शैक्षणिक उपक्रम राबविणे, येथील नैसर्गिक संसाधनांवर आधारित ज्ञानाची निर्मिती करणे, ते ज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक व इतर अध्ययनकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा व तेथील लोकांचा विकास करणे इत्यादी विद्यापीठाचे मुख्य कार्य आहे. तसेच विविध वयोगटातील पात्र विद्यार्थ्यांच्या गरजा, उद्देश, अपेक्षा आणि योजना लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यास विद्यापीठ कटीबध्द आहे. येथील भाषा, संस्कृती, समाजव्यवस्था यांवर संशोधनपूर्वक अभ्यास करून त्याचे महत्त्व नवीन पिढीला करून देणे; ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना पारंपरिक शिक्षणासह व्यावसायिक आणि जागतिक पातळीचे कौशल्ययुक्त शिक्षण देऊन जागतिक समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी तयार करणे; कमीत कमी खर्चात एक उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे इत्यादी या विद्यापीठाचे उद्देश आहे.

विद्यापीठामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संसाधनिक केंद्रे स्थापन करण्यासाठी राजीव गांधी तंत्र व विज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी पुढाकार घेतला असून या केंद्राला लागणारे तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री निर्माण करणे आणि निरंतर मार्गदर्शन करण्याचे पालकत्व आय. आय. टी., मुंबई यांनी घेतली आहे. यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील आदिवासी व मागासलेल्या विद्यार्थांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यास विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्याच प्रमाणे भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेतील सहभागात एक आदर्श विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाची उभारणी करणे; समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना आदर्श आणि जबाबदार नागरीक बनविणे, शिक्षणात आणि देशाच्या एकूण विकासात विशेष स्थान प्राप्त करून देणे यांसाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

विद्यापीठात कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान, शिक्षणशास्त्र, गृहविज्ञान, अभियांत्रिकी, कायदा, औषधीविज्ञान, सामाजिकशास्त्रे, विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविज्ञा, स्वावलंबन अभ्यासक्रम इत्यादी एकूण १९ विद्याशाखा असून  पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये इतिहास, समाजशास्त्र, इंग्रजी, मराठी, उपयोजित अर्थशास्त्र, एम. कॉम., गणित, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय आहेत. विद्यापीठाद्वारे जुन २०१२ पासून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) या पदवीला प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून इतरही शाखांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतात. विद्यापीठाने सुरुवातीपासुनच सर्व शाखांच्या अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू केल्यामुळे गुणवत्ता यादी अंकानुसार नसून श्रेणी पद्धतीनुसार आहे. फक्त एक वर्षीय अभ्यासक्रमांना वार्षिक परीक्षा पद्धती अमलात आणली आहे. विद्यापीठाचे कामकाज चालविणे आणि विद्यार्थ्यांना संबंधित सेवा पुरविणे यांसाठी विद्यापीठात एकूण १६ प्रशासकीय विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.

विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठात ज्ञान केंद्र सुरू करण्यात आले. याद्वारे चंद्रपूर आणि गडचिरोली आदिवासी बहूल भागातील विद्यार्थी, अध्यापक व संशोधक यांच्या पारंपारिक व अपारंपारिक गरजा पूर्ण करणे, देशातील व राज्यांतील इतर वाचक व अभ्यासक यांच्या शैक्षणिक व माहितीविषयक गरजा उपलब्ध स्रोतांतून पूर्ण करणे इत्यादी कार्य करण्यात येते. तसेच या केंद्राद्वारे ग्रंथ देवाण-घेवाण, आंतरजाल, स्पर्धात्मक तयारीसाठी पुस्तके, मासिके, दैनिक वर्तमानपत्रे, रोजगार समाचार, वाचन कक्ष इत्यादी सेवा पुरविल्या जातात. ग्रंथालयाची भूमिका या विषयावर येथे कार्यशाळाही घेतली जाते. तसेच केंद्रमार्फत वाचकांना ग्रंथ घरी वाचण्यासाठी दिले जातात.

विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जाऊन विद्यार्थ्यांत सामाजिक सेवेची आवड निर्माण केली जाते. त्यामध्ये आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा, संशोधनास चालना मिळावी या दृष्टीने आविष्कार स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे साहसी क्रीडा शिबिरे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर, स्वयंशासन कार्यक्रम, सद्भावना पंधरवाडा, जागतिक अहिंसा दिन, दत्तक घेतलेल्या गावात परिसर स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबिर, पशुचिकीत्सा, लोकांचे आधारकार्ड तयार करणे इत्यादी.

गोंडवाना विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सोय करण्यात आली आहे. वसतीगृह विभाग विद्यार्थांची केवळ निवास व भोजनाची सोय करत नसून त्याद्वारे उच्च विद्याविभूषीत प्राध्यापक वर्गाचे स्पर्धात्मक परिक्षा, नेट-सेट परिक्षेचे नि:शुल्क मार्गदर्शन, सुसज्ज ग्रंथालय व वाचन कक्ष, कमवा व शिका योजना, संगणक व आंतरजालाची मोफत सुविधा, नियमित शिकवणी वर्ग, विद्यार्थी सहायता निधी, विद्यार्थ्यांकरीता संशोधनपर मासिके व पत्रिकांची सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याकरीता संभाषण, सेमिनार व कार्य शाळेचे वेळो वेळी आयोजन अशा विविध सुविधा पुरविल्या जातात.

२ ऑक्टोबर २०१६ रोजी विद्यापीठाच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तेव्हापासून ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’, ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’, ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’, ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, ‘उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार (वर्ग १ व २)’, ‘उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३ व ४)’, आणि ‘उत्कृष्ट विद्यार्थी/विद्यार्थीनी’ पुरस्कार देण्यात येते. याशिवाय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय, कार्यक्रम अधिकारी आणि उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनाही पुरस्कार दिला जातो. तसेच ‘गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना’ दरवर्षी पदवीदान समारंभातून देणगीदारांकडून सुवर्ण पदके तसेच देणगी मुल्य राशी प्रदान करून सन्मानीत केले जाते.

विद्यापीठ एकूण १० एकर क्षेत्रफळात वसले असून सदर जागेत प्रशासकीय इमारत, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, ज्ञान स्रोत केंद्रे, परीक्षा विभाग, मुला-मुलींचे वसतीगृहे इत्यादी आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या जागेव्यतिरिक्त विद्यापीठासाठी इतर खाजगी जमीनींचे भूसंपादन करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

समीक्षक – के. एम. भांडारकर