ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी (पुरी) येथील एक संस्कृत विद्यापीठ. ओडिशा विधानसभेच्या १९८१ मधील एकतीसाव्या अधिनियमानुसार ७ जुलै १९८१ रोजी राज्यात पूर्वी असणारी संस्कृत महाविद्यालये आणि विद्यालये त्यांच्या उत्पन्नासह एक अध्यापन व संलग्न विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संस्कृत भाषेचा विकास हा या विश्वविद्यालयाच्या स्थापनेचा उद्देश आहे. ओडिशाच्या विद्यापीठ कायदा १९८९ व १९९० नुसार आणि राज्य शासन व विद्यापीठ अनुदान मंडळ यांच्या व्यवस्थापनाखाली या विश्वविद्यालयाचे कामकाज चालते. राज्याचे राज्यपाल हे याचे कुलपती असतात. ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री व संस्कृत विद्वान जानकी वल्लभ पटनाईक यांच्याकडे या विश्वविद्यालय स्थापनेचे श्रेय जाते. पुरीच्या सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरावरून या विश्वविद्यालयाला हे नाव देण्यात आले आहे.

विश्वविद्यालयाच्या स्थापनेमुळे संस्कृतमधील शिक्षणात नेत्रदिपक प्रगती झाली आहे. त्यामुळे संस्कृत भाषेचा व त्यासंबंधीत क्षेत्रांचा विकास होऊन ओडिशामधील प्राचीन परंपरा पुनरुज्जीवित करण्यास मदत झाली आहे. कौशल्य आधारित शिक्षण देऊन तरुण पिढी सशक्त बनविणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. ओडिशाच्या हस्तलिखित दस्तावेजामध्ये लपलेल्या वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा उलगडा करणे. तसेच जगन्नाथ पंथ व तत्त्वज्ञान यांवर संशोधन करून त्रिकूटाच्या धार्मिक कर्मकांड परंपरेबद्दल सविस्तर ज्ञान देऊन तरुण पिढीस प्रशिक्षित व सशक्त करणे हे विश्वविद्यालयाचे उद्देश आहे. विश्वविद्यालय हे स्थापनेपासूनच संस्कृत साहित्याचा वारसा आणि संशोधनात्मक अभ्यास यांस प्रोत्साहन देत आहे. या विश्वविद्यालयामार्फत १९८६ पासून धर्म विश्वकोशाचे संकलन, पाम पानांवरील हस्तलिखितांचा संग्रह व प्रकाशन आणि भगवान जगन्नाथ यांच्यावरील अभ्यास या तीन संस्कृतमधील संशोधन प्रकल्पास सुरुवात झाली आहे. त्याच प्रमाणे ‘सेंटर ऑफ ॲडव्हान्स रिसर्च इन संस्कृत’ (CARS) या संशोधन केंद्रातर्फे जगन्नाथ ज्योती नावाचे संस्कृतमधील १३ खंड आणि कालांतराने ३३ पुस्तके प्रकाशित करण्यात आले आहेत.

बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरील जगन्नाथपुरी येथील श्रीविहार या १०० एकर परिसरात या विश्वविद्यालयाचा विस्तार झालेला आहे. संपूर्ण ओडिशा राज्य हे याचे कार्यक्षेत्र आहे. विश्वविद्यालयाचे स्वत:चे १३७ विद्यालये, आठ पदव्युत्तर शिक्षण अध्यापन विभाग आणि १४२ संस्कृत व्याकरण, सर्वदर्शन, वेदांत (अद्वैत), वेद जोतिर्विज्ञान या येथील विद्याशाखा व विभाग आहेत. पदवी स्तरावर इंग्रजी, संस्कृत व्याकरण, संस्कृत साहित्य, सर्वदर्शन, वेद, कर्मकांड, धर्मशास्त्र, आयुर्वेद, योग, सामान्य साहित्य, सामान्य व्याकरण, सामान्य दर्शन, वेदान्त (अद्वैत), न्याय इत्यादी अभ्यासक्रम येथे राबविले जातात. पदव्युत्तर स्तरावरील वेगवेगळे अभ्यासक्रमही राबविले जातात. प्रथमा, मध्यमा, उपशास्त्री, शास्त्री, आचार्य, विशिष्टाचार्य यांसाठीचे शिक्षण येथे दिले जाते. उपशास्त्री या पदवीसाठीचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. या वर्गातील प्रवेशासाठी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. शास्त्री (बी. ए.) हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. त्याच्या प्रवेशासाठी उपशास्त्री पदवी किंवा संस्कृत विषयासह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण, अशी पात्रता असावी लागते. आचार्य (एम. ए.) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून शास्त्री पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास या पदवीसाठी प्रवेश घेता येतो. विशिष्टाचार्य (एम. फिल.) व विद्यावरिधी (पीएच. डी.) या पदवींसाठीचे संशोधन येथे करता येते. शिवाय बी. ए. पास असलेल्यांसाठी इंग्रजीतील पदविका आणि संस्कृतशिवाय बी. ए. पास असलेल्यांसाठी संस्कृत पदविका हे अभ्यासक्रम येथे राबविले जातात. शिक्षा शास्त्री (बी. एड.) अभ्यासक्रमही येथे राबविला जातो. तसेच येथे शारीरिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण यांचाही समावेश आहे.

१९९१ मध्ये विश्वविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना झाली. मध्यवर्ती ग्रंथालयाशिवाय प्रत्येक विभागाची स्वतंत्र ग्रंथालये आहेत. मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे ३५,००० पुस्तके, सुमारे ५०० संशोधनात्मक लेख आणि सुमारे २०० हस्तलिखिते आहेत. विश्वविद्यालय परिसरात मुला-मुलींसाठी वसतिगृहे आहेत.

२००० पासून या विश्वविद्यालयाचे प्रथमा व मध्यमा विद्यालयांच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी ओडिशाच्या माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सोपविली आहे. अलीकडे या विश्वविद्यालयाने काही महाविद्यालयांना कायम स्वरूपी संलग्नता दिली असून त्यांमधून उपशास्त्री आणि शास्त्री पदवीविषयक अभ्यासक्रम राबविले जातात.

समीक्षक  : संतोष ग्या. गेडाम