अस्थिमत्स्याचे कल्ले

कल्ले (क्लोम) म्हणजे जलचर प्राण्यांच्या श्वसनक्रियेत पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी आणि रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड विसर्जित करण्यासाठी असलेले इंद्रिय. सागरी वलयांकित प्राणी आणि त्याहून अधिक प्रगत प्राणी यांच्यामध्ये ऑक्सिजनाची गरज अधिक असल्यामुळे त्वचेच्या काही भागांत विशिष्ट बदल होऊन कल्ले तयार झाले. शरीराच्या दोन्ही बाजूंस त्वचेचे रूपांतर धाग्यांसारख्या अनेक कल्लातंतूंत झाले. हे कल्लातंतू केशवाहिन्यांनी भरले. कल्लातंतू आणि केशवाहिन्यांचे आवरण अतिशय पातळ झाले. रक्त आणि पाणी यांच्यातील अडसर पातळ झाल्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची देवाण-घेवाण अधिक सुलभ झाली. कल्ल्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी त्यांतून वाहणारा रक्तप्रवाह जलद व्हावा लागतो. तसेच कल्ल्यांभोवतालचे पाणीही वेगाने बदलत रहावे लागते.

कल्ल्यांचे स्थूलमानाने बाह्यकल्ला आणि आंतरकल्ला असे दोन प्रकार आहेत. बाह्यकल्ला त्वचेवर वाढलेल्या साध्या किंवा शाखित तंतूंच्या पुंजक्यासारखे असून ते पाण्याने वेढलेले असतात. प्राण्यांच्या शरीराच्या हालचालींमुळे किंवा कल्ल्यांच्या हालचालींमुळे कल्ल्यांभोवतालचे पाणी बदलत राहते. आंतरकल्ला अधिक प्रगत स्वरूपाचे असतात. त्यांच्या कल्लातंतूच्या पुंजक्यांवर त्वचेचे एक वेगळेच आवरण असते. तोंडावाटे कल्लाकक्षेत घेतलेले पाणी मागील बाजूने सोडले जाते. असे कल्ले माशांमध्ये आणि उभयचर वर्गातील बेडकांच्या डिंभावस्थेत आढळतात.

बिळात राहणार्‍या सागरी वलयांकित प्राण्यांच्या शिरोभागावर कल्लातंतूंच्या विविध प्रकारच्या संरचना आढळतात. कवचधारी संधिपाद प्राण्यांचे कल्ले त्यांच्या पायांशी संलग्न असतात. किंग क्रॅब या सागरी प्राण्यांच्या कल्ल्यांचे पातळ पडदे पुस्तकांच्या पानांप्रमाणे एकावर एक असतात. चतुर कीटकांचे डिंभक जलचर असतात आणि त्यांच्या कल्ल्यांद्वारे शोषून घेतलेला ऑक्सिजन त्यांच्या श्वासनालांतून शरीरातील अन्य अवयवांकडे नेला जातो.

मृदुकाय प्राण्यांमध्येही विविध प्रकारचे कल्ले असतात. त्यांपैकी द्विपुटी प्राण्यातील कल्ल्यांची रचना जास्त विकसित आणि गुंतागुंतीची असते. त्यांचे कल्ले श्वसनाबरोबरच अन्नकण गोळा करण्याचेही काम करतात. कंटकचर्मी संघातील बहुसंख्य प्राणी सुस्त असल्याने त्यांचे कल्ले तुलनेने अविकसित असतात.

पृष्ठवंशीय प्राण्यांपैकी मासे आणि उभयचरांचे डिंभक यांमध्ये कल्ले आढळतात. हे त्यांच्या घशाजवळ दोन्ही बाजूंस असतात. त्यांच्या संरचनांमध्ये कल्लाकमानी, कल्लाछिद्रे, कल्लाआवरण, कल्लाकक्ष हे भाग आढळतात. कास्थिमत्स्य वर्गात कल्ल्यांच्या पाच जोड्या तर अस्थिमत्स्य वर्गात चार जोड्या असतात. उभयचर वर्गातील डिंभकांचे रूपांतरण होत असताना त्यांचे कल्ले नाहीसे होतात आणि फुप्फुसे कार्यरत होतात.