सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यांमुळे त्यांचे गट पाडले आहेत. सजीवांमधील फरक ओळखून समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. आर्. एच्. व्हिटाकर याने सजीवांची पेशीरचना, शरीररचना आणि पोषणपद्धती या मुद्यांवर आधारित सजीवांचे पाच सृष्टींत वर्गीकरण केले आहे. याला पंचसृष्टी वर्गीकरण म्हणतात. मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, फंजाय सृष्टी, वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी अशी त्यांची नावे आहेत (पहा : सजीवसृष्टी).
प्राणिसृष्टीत सर्व प्राण्यांचा समावेश करण्यात आला आहे. दृश्यकेंद्रकी पेशी, बहुपेशीय शरीररचना, पेशीपटल आणि अंतर्ग्रहण पोषणपद्धती ही त्यांची प्रमुख लक्षणे आहेत. प्राण्यांची शरीररचना, शरीर सममित असणे, पृष्ठरज्जू असणे अथवा नसणे, देहगुहा असणे अथवा नसणे, प्रचलनाचे अवयव या मुद्यांनुसार त्यांचे गट पाडले जातात. या वर्गीकरणात सृष्टी, संघ, उपसंघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती, जाती अशा गटांची श्रेणी आहे. हे वर्गीकरण प्राण्यांच्या साम्यभेद लक्षणांवरून केले जाते. सृष्टीकडून जातीकडे गटाची व्याप्ती कमीकमी होत जाते.
प्राणिसृष्टीत आतापर्यंत सु. १५ लाख प्राण्यांचे वर्गीकरण केले गेले आहे. विविध लक्षणांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण प्रमुख संघांत केले आहे. हे मुख्य संघ पुढीलप्रमाणे आहेत.
आदिजीव : (प्रोटोझोआ). या संघातील प्राणी एकपेशीय आणि आकाराने सूक्ष्म असतात. या संघात सु. ५०,००० जातीं आहेत. उदा., अमीबा, पॅरामिशियम इत्यादी. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून आदिजीव हा प्राणिसृष्टीतील पहिला संघ मानला जातो. मात्र, काही वेळा आदिजीव हा प्रोटिस्टा सृष्टीतील एक संघ गणला जातो.
छिद्री : (पोरिफेरा). या संघात सर्व स्पंजांचा समावेश केला आहे. या प्राण्यांच्या शरीरावर अनेक छिद्रे असून या संघात सु. २०,००० जाती आहेत. उदा., सायकॉन, स्पाँजिला.
आंतरदेहगुही : (सीलेंटेरेटा). या संघात प्राण्यांची बहुशुंडक आणि छत्रिक अशी दोन रूपे आढळतात. शरीराच्या पोकळीला आंतरदेहगुहा म्हणतात. या संघात सु. ११,००० जाती आहेत. उदा., जलव्याल (हायड्रा), समुद्रपुष्प, प्रवाळ इत्यादी.
चपटकृमी : (प्लॅटिहेल्मिंथिस). या प्राण्यांचे शरीर चपटे असते. या संघात सु. १५,००० जाती आहेत. उदा., प्लॅनेरिया, यकृत पर्णकृमी, पट्टकृमी इत्यादी.
गोलकृमी : (नेमॅटोडा). या संघातील प्राणी लांब नळीच्या आकाराचे किंवा दोऱ्यासारखे असतात. या संघात सु. २८,००० जाती आहेत. उदा., जंत, अंकुशकृमी, नारूचा कृमी इत्यादी.
वलयांकित: (ॲनेलिडा). या संघातील प्राण्यांचे शरीर अनेक वलयांनी अथवा खंडांनी बनलेले असते. या संघात सु. ९,००० जाती आहेत. उदा., नेरीस, गांडूळ, जळू इत्यादी.
संधिपाद : (आर्थ्रोपोडा). प्राणिसृष्टीतील हा सर्वात मोठा संघ आहे. या संघातील प्राण्यांना पायांच्या अनेक जोड्या असून प्रत्येक पाय अनेक सांध्यांनी युक्त असतो. या संघात सु. ९,००,००० जातींचा समावेश आहे. उदा., पेरिपॅटस, खेकडा, गोम, डास, विंचू इत्यादी.
मृदुकाय : (मॉलस्का). यांचे शरीर मऊ, लिबलिबित व खंडविरहित असते. या संघात सु. १,००,००० जाती आहेत. उदा., कायटॉन, पायला, माखली, गोगलगाय इत्यादी.
कंटकचर्मी : (एकायनोडर्माटा). यांचे शरीरावरील आवरण कॅल्शियम कार्बोनेटाचे असून त्यावर कंटिका असतात. या संघात सु. १३,००० जाती आहेत. उदा., समुद्रतारा, समुद्र करंडा, समुद्र काकडी इत्यादी.
अर्धमेरुक : (हेमिकॉर्डेटा). या संघातील प्राण्यांत काही लक्षणे रज्जुमान संघातील प्राण्यांसारखी असतात. पृष्ठरज्जू, चेतारज्जू आणि ग्रसनी कल्लाविदरे ही रज्जुमान संघाची मुख्य लक्षणे थोड्या किंवा अर्ध्या प्रमाणात आढळतात, म्हणून त्यांना अर्धमेरुक म्हणतात. या संघात सु. १४० जाती आहेत. उदा., बॅलॅनोग्लॉसस, सॅक्कोग्लॉसस इत्यादी.
आदिजीव ते अर्धमेरुक संघांतील प्राण्यांना पृष्ठवंश (पाठीचा कणा) नसतो. म्हणून त्यांना अपृष्ठवंशी म्हणतात.
रज्जूमान : (कॉर्डेटा). पृष्ठरज्जू, चेतारज्जू आणि ग्रसनी कल्लाविदरे ही रज्जुमान संघाची तीन प्रमुख लक्षणे आहेत. याशिवाय तीन आद्यस्तर, द्विपार्श्वसममिती, समखंडता, पूर्ण पचनमार्ग व शरीराच्या अधर बाजूस हृदय असणे अशी काही इतर लक्षणे आढळतात. रज्जुमान संघाचे पुढील तीन उपसंघामध्ये विभाजन केले आहे.
पुच्छरज्जुमान : (यूरोकॉर्डेटा). या उपसंघातील प्राण्यांत पृष्ठरज्जू डिंभावस्थेत फक्त पुच्छाच्या म्हणजे शेपटीच्याच भागात असतो. या उपसंघात सु. ३,००० जाती आहेत. उदा., समुद्र पिचकारी (हर्डमानिया), साल्पा इत्यादी.
शीर्षरज्जुमान : (सेफॅलोकॉर्डेटा). या उपसंघातील प्राण्यांत पृष्ठरज्जू शरीराच्या शीर्षापासून शेपटीपर्यंत असतो. या उपसंघात फक्त तीन जाती आहेत. उदा., अँफिऑक्सस.
पृष्ठवंशी : (व्हर्टिब्रेटा). या प्राण्यांत पृष्ठरज्जूचे रूपांतर पृष्ठवंशात म्हणजे पाठीच्या कण्यात झालेले आहे. पृष्ठवंश मणक्यांनी बनलेला असतो. या उपसंघाचे जंभहीन आणि जंभयुक्त असे दोन विभाग आहेत.
जंभहीन : (ॲग्नॅथा). या प्राण्यांना जंभ किंवा जबडे नसतात. या विभागात गोलमुखी हा एकच वर्ग आहे. गोलमुखी प्राण्यांचे मुख गोल असते. या वर्गात सु. १०० जाती आहेत. उदा., पेट्रोमायझॉन (लँप्री), मिक्झिन (हॅगफिश). पूर्वीच्या वर्गीकरण पद्धतीनुसार जंभहीन विभागातील प्राण्यांना मासे म्हणत व त्यांचा समावेश मत्स्य वर्गात करीत असत. जंभहीन, कास्थिमत्स्य आणि अस्थिमत्स्य या प्राण्यांचे पूर्वज एकाहून अधिक आहेत.
जंभयुक्त: (ग्नॅथोस्टोमॅटा). या प्राण्यांचे मुख वरच्या आणि खालच्या जबड्यांनी वेढलेले असते. या विभागाचे पुढीलप्रमाणे सहा वर्ग आहेत.
(१) कास्थिमत्स्य : (कॉंड्रिक्थिज). या वर्गातील माशांच्या शरीरातील अंत:कंकाल कास्थिमय असते. या वर्गात सु. ९०० जाती आहेत. उदा., मुशी, पाकट इत्यादी.
(२) अस्थिमत्स्य : (ऑस्टेक्थिज). या वर्गातील माशांचे अंत:कंकाल अस्थिमय असते. या वर्गात सु. ३०,००० जाती आहेत. उदा., रोहू, कटला, बांगडा इत्यादी.
(३) उभयचर : (ॲम्फिबिया). हे प्राणी जमिनीवर आणि पाण्यात असे दोन्ही ठिकाणी राहू शकतात. या वर्गात सु. ६,००० जाती आहेत. उदा., बेडूक, सॅलॅमँडर इत्यादी.
(४) सरीसृप्र : (रेप्टिलिया). हे सरपटणारे प्राणी प्रामुख्याने भूचर असून त्यातील काही प्राणी पाण्यात राहतात. या वर्गात सु. ८,००० जाती आहेत. उदा. सरडा, कासव इत्यादी.
(५) पक्षी : (एव्हज). या प्राण्यांना चोच असते आणि शरीर पिसांनी झाकलेले असते. या वर्गात सु. ९,९०० जाती आहेत. उदा., चिमणी, कबूतर इत्यादी.
(६) स्तनी: (मॅमॅलिया). या वर्गातील प्राण्यांना स्तन असतात. या वर्गात सु. ५,४०० जाती आहेत. उदा., गाय, मनुष्य, उंदीर, वटवाघूळ इत्यादी.
अनेक प्राणी या दहा संघांच्या वर्गीकरण पद्धतीत मोडत नाहीत. म्हणून अशा प्राण्यांचे आठ गौण संघ बनविले आहेत. रोटिफेरा, एक्टोप्रॉक्टा, सायपंक्युलिडा, नेमर्टिनिया, नेमॅटोमॉर्फा, ॲकॅंथोसेफाला, ब्रॅकिओपोडा आणि कीटोग्नॅथा असे हे गौण संघ आहेत.