एक आसनप्रकार. ‘धनुस्’ म्हणजे धनुष्य. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीररचना ताणलेल्या म्हणजेच प्रत्यंचा (दोरी) ओढलेल्या धनुष्यासारखी दिसते, म्हणून या आसनाला धनुरासन असे म्हणतात. प्रस्तुत आसनाचा निर्देश व कृती हठप्रदीपिकेत (१.२५) आणि घेरण्डसंहितेत (२.१८) आढळते. या आसनाचा अंतर्भाव शरीरसंवर्धनात्मक आसनांमध्ये होतो. हे आसन करताना अधिक सायास करावे लागतात. त्यामुळे प्रारंभी इतर आसनांचा सराव केल्यानंतर मगच हे आसन करणे इष्ट ठरेल.
कृती : जमिनीवर अंथरलेल्या जाड वस्त्रावर पालथे झोपावे. शरीर सरळ ठेवावे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा किंवा घोटा पकडावा. डाव्या हाताने डावा अंगठा किंवा घोटा पकडावा. हात सरळ ठेवावे. किंचित श्वास घेऊन मांड्या, पाय तसेच छाती व मस्तक वरच्या दिशेने उचलावे. क्षमतेप्रमाणे शरीर जेवढे वर नेता येईल तेवढे विशेष जोर न लावता वर न्यावे. पाय बाहेरच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केल्यास हे आसन लवकर जमते. अंतिम स्थितीत १० ते २० सेकंद थांबून आसन सोडावे. पाय, मांड्या व छाती खाली आणावी. प्रारंभी दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवल्यास हे आसन करणे सोपे जाते. पुढे गुडघे एकमेकांजवळ आणता आले तर उत्तमच. थोडा वेळ विश्रांती घेऊन ह्या आसनाची आवश्यकता असल्यास व शक्य असल्यास एकदा पुनरावृत्ती करावी. अंतिम स्थितीत पोहचण्यासाठी हात वाकवू नये ते सरळ ठेवावे. पहिल्याच दिवशी पूर्ण आसन साध्य होईलच असे नाही. काही दिवसांच्या सरावाने मेरुदंडाची लवचिकता वाढेल. मांड्यांच्या स्नायूंची ताणले जाण्याची क्षमता वाढेल. खांदे, कंबर, गुडघे यांच्या सांध्यांना, स्नायूंना सवय झाल्यावर ते बळकट होतील त्यावेळी हे आसन पूर्ण जमेल. आसन झाल्यावर मकरासनात किंवा नुसते पडून राहून विश्रांती घ्यावी.
लाभ : या आसनात नाभीच्या सभोवती पोटावर भार पडतो. श्वसन सुरू असताना नाभीप्रदेशावर दाब पडल्याने त्या ठिकाणी धन व ऋण दाब आलटून पालटून निर्माण होतात. त्यामुळे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते. आतड्यांचे मृदू स्नायू सक्षम झाल्यामुळे त्यांचे कार्य सुरळीत होते. जठराग्नि प्रदीप्त होतो. भूक व पचन व्यवस्थित होतात. मेरुदंड, खांदे, मांड्या सशक्त होतात. कंबरेची, पायांची ताकद वाढते. छाती रुंदावते. स्थूलता कमी होते. या आसनाने आळस दूर होतो. उत्साह व कार्यशक्ती वाढते. दिवसभर ताजेतवाने वाटते.
विधिनिषेध : हे आसन हळूहळू शिकावे लागते. पहिल्याच वेळी अतिउत्साहाने, हट्टाने अंतिम स्थितीत जाण्याचा खूप प्रयत्न केल्यास मांड्या, खांदे, कंबर या ठिकाणी स्नायूंना, स्नायुबंधांना दुखापत होण्याचा संभव असतो. उच्चरक्तदाब, कंबरदुखी, अंतर्गळ (Hernia), हृदयविकार असेल तर हे आसन करू नये. हे आसन क्षमतेनुसार तसेच तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करणे इष्ट ठरेल.
समीक्षक – श्रीराम आगाशे