पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच स्थूल महाभूते ज्या सूक्ष्म तत्त्वांपासून उत्पन्न होतात, त्यांना तन्मात्र असे म्हणतात. गंधतन्मात्र, रसतन्मात्र, रूपतन्मात्र, स्पर्शतन्मात्र आणि शब्दतन्मात्र अशी पाच तन्मात्रांची नावे आहेत. सांख्य-योग दर्शनांमध्ये मानलेल्या सत्कार्यवादाच्या सिद्धांतानुसार महाभूते ही उत्पत्तीच्या आधीही त्यांच्या कारणांमध्ये म्हणजेच तन्मात्रांमध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असतात व नंतर ती प्रकट होतात. तन्मात्र हे महाभूतांचे पूर्वरूप आहे. महाभूतांचे ज्ञान हे इंद्रियांच्याद्वारे होऊ शकते. परंतु, तन्मात्र सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे ज्ञान इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही. तर ते सामान्यपणे अनुमानाद्वारे आणि योग्यांना समाधीमध्ये प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे होऊ शकते.

स्थूल महाभूतापासून बनलेल्या पदार्थांमध्ये द्रव्य आणि गुण असे दोन वेगवेगळे धर्म असतात. उदाहरणार्थ, लाकडामध्ये पृथ्वी हे द्रव्य आहे व त्याचबरोबर त्यामध्ये शब्द (ध्वनी), स्पर्श, रूप, रस आणि गंध हे गुणसुद्धा आहेत. लाकूड आणि दगड या दोघांमधील मूलभूत द्रव्य हे पृथ्वीच असले तरीही त्या दोन वस्तूंमध्ये भेद आहे. कारण त्या दोघांचे गुण समान नाहीत. दोघांच्या ध्वनी, स्पर्श, रूप इत्यादी गुणांमध्ये फरक आहे. स्थूलभूतापासून बनलेल्या पदार्थामधील द्रव्याचे आणि त्यामधील प्रत्येक गुणाचेही ज्ञान इंद्रियांद्वारे प्राप्त होते. शब्दाचे ज्ञान कानाद्वारे, स्पर्शाचे त्वचेद्वारे, रूपाचे डोळ्यांद्वारे, रसाचे जिभेद्वारे आणि गंधाचे ज्ञान नाकाद्वारे प्राप्त होते. द्रव्य आणि गुण हे एकाच वस्तूमध्ये असूनही ते एक नाहीत, तर ते वेगवेगळे आहेत आणि त्यांचे ज्ञानही वेगवेगळे होऊ शकते. सर्वच द्रव्यांमध्ये सर्व गुण राहत नाहीत. कोणत्या द्रव्यात कोणते गुण अभिव्यक्त होतात, ते पुढीलप्रमाणे –

  • आकाश    –          शब्द
  • वायू         –          शब्द, स्पर्श
  • अग्नी       –          शब्द, स्पर्श, रूप
  • जल         –          शब्द, स्पर्श, रूप, रस
  • पृथ्वी        –          शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध

स्थूलभूतांमध्ये द्रव्य आणि गुण यांचे वेगवेगळे ज्ञान होऊ शकते कारण त्यांमध्ये ते अभिव्यक्त रूपामध्ये असतात. परंतु, महाभूतांची उत्पत्ती होण्याआधी तन्मात्ररूप सूक्ष्म अवस्थेमध्ये द्रव्य आणि गुण हे वेगवेगळे नसतात; तर ते एकरूपच असतात, म्हणून त्यांना ‘तन्मात्र’ म्हटले जाते. तन्मात्र या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘केवळ तेच’ असा होय. महाभूत आणि तन्मात्र यांचा संबंध एका उदाहरणाद्वारे समजून घेता येईल.

एका बीजापासून वृक्ष प्रकट झाल्यानंतर त्या वृक्षामध्ये विविध अवयव अभिव्यक्त होतात. पाने, फुले, फळे, फांद्या, खोड इत्यादी अवयवांचे पृथक् पृथक् ज्ञान आपल्याला होऊ शकते. परंतु, वृक्ष प्रकट होण्याआधी त्याचे कारण जे बीज आहे, त्यामध्ये पाने, फुले, फळे, फांद्या इत्यादी अवयव दिसून येत नाहीत. बीजामध्ये हे अवयव अस्तित्वातच नाहीत, असे म्हणता येऊ शकत नाही; कारण जर त्यांचा संपूर्ण अभावच असेल तर नंतर ते कोठून उत्पन्न झाले असा प्रश्न निर्माण होतो. बीजाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वस्तूला पाने, फुले, फळे, फांद्या यासाठी कारण मानता येत नाही. याचाच अर्थ असा की हे सर्व घटक बीजामध्येही अस्तित्वात असतात; परंतु ते सूक्ष्म रूपात असतात व त्यांचे ज्ञान इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही.बीज समोर असताना पाने, फुले, फळे, फांद्या इत्यादी कोठे आहेत असा प्रश्न विचारल्यास त्या बीजातच आहेत असे म्हणावे लागते. भविष्यात अभिव्यक्त होणारे सर्व अवयव बीजरूप कारणात अस्तित्वात असल्यामुळे ते सर्व अवयव ‘तन्मात्र’ (केवळ तेच = बीजरूप) आहेत असे म्हणू शकतो.

ज्याप्रमाणे वृक्ष उत्पन्न होण्यापूर्वी बीजरूपात सर्व अवयव एकरूप असतात, त्याचप्रमाणे महाभूते अभिव्यक्त होण्यापूर्वी तन्मात्रांमध्ये द्रव्य आणि शब्द, स्पर्श इत्यादी एकरूप असतात; म्हणून त्यांना ‘तन्मात्र’ असे म्हणतात. महाभूतांमधील द्रव्य आणि गुणांचे पृथक् रूपाने ज्ञान होत असल्यामुळे त्यांना विशेष असेही म्हणतात; तर तन्मात्रांमध्ये त्यांचे पृथक् ज्ञान होत नसल्याने त्यांना अविशेष असे म्हणतात.

तन्मात्रांची नावे जरी शब्दतन्मात्र, स्पर्शतन्मात्र इत्यादी असली तरीही महाभूतांमध्ये असणाऱ्या तसेच इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या शब्द, स्पर्श इत्यादी गुणांपेक्षा ते वेगळे आहेत. ज्या द्रव्यामध्ये जो गुण विशेषरूपाने आढळतो, त्या गुणाच्या नावावरून त्याचे तन्मात्र ओळखले जाते. उदाहरणार्थ, आकाशात शब्द हा गुण आहे. त्यामुळे आकाशाचे कारण सूक्ष्मभूत शब्दतन्मात्र होय. वायूमध्ये शब्द हा गुण आहेच, त्याबरोबर स्पर्श हा गुण विशेषत्वाने आढळतो. त्यामुळे वायूचे कारण सूक्ष्मभूत स्पर्शतन्मात्र होय.

योगाच्या काही व्याख्याकारांनी परमाणूंना तन्मात्र मानले आहे. सांख्य-योग दर्शनांनुसार तन्मात्र हे जीवांच्या सूक्ष्म शरीराचाही अंश आहेत. सांख्य, योग आणि वेदान्त या तीन दर्शनांनीच तन्मात्रांचे अस्तित्व स्वीकारले आहे. सांख्य-योग दर्शनांच्या सृष्टिप्रक्रियेनुसार पाचही तन्मात्र हे तमोगुण प्रधान असणाऱ्या अहंकारापासून उत्पन्न होतात. वेदान्तानुसार मायाशक्तीच्या उपाधीने युक्त ब्रह्मापासून प्रथम सूक्ष्म आकाश (शब्दतन्मात्र), त्यापासून सूक्ष्म वायू (स्पर्शतन्मात्र), त्यापासून सूक्ष्म अग्नी (रूपतन्मात्र), त्यापासून सूक्ष्म जल (रसतन्मात्र) आणि त्यापासून सूक्ष्म पृथ्वी (गंधतन्मात्र) क्रमाने उत्पन्न होतात. याप्रमाणे सांख्य-योग आणि वेदान्त दर्शनांमध्ये तन्मात्र संकल्पनेविषयी थोडी मतभिन्नता आढळून येते.

पहा :  सत्कार्यवाद, सम्प्रज्ञात समाधि.

            समीक्षक : कला आचार्य