लिकी, मेव्ह : (२८ जुलै १९४२). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. ‘मेव्ह इप्स्ʼ या नावानेही परिचित. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. नॅार्थ वेल्स विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९६५ ते १९६८ दरम्यान नैरोबी येथील टिगोनी प्रायमेट रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करून विख्यात पुरामानवशास्त्रज्ञ लुई लिकी (१९०३–१९७२, Louis Leakey) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी संपादन केली. केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लिकी यांच्या लेक तुर्काना भागातील कूबी फोरा (Koobi Fora) या पुराजीवशास्त्रीय स्थळाच्या शोधमोहिमेत त्या सहभागी झाल्या (१९६९). पुढे रिचर्ड लिकी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या (१९७०).

मेव्ह लिकी यांनी १९८९ मध्ये केनियाच्या ‘नॅशनल म्यूझीअमʼमध्ये समन्वयक म्हणून काम केले. १९८२ ते २००१ या काळात त्या पुराजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस (Australopithecus anamensis) या नव्या प्रजातीचा शोध त्यांनी १९९४ मध्ये लावला. त्यांनी व त्यांची कन्या लुईस लिकी (Louise Leakey) यांनी १९९९ मध्ये एक नवीन होमिनिन प्रजात शोधली. त्यांनी या प्रजातीला केनियान्थ्रोपस प्लॅटिओप्स (Kenyanthropus platyops) असे नाव दिले.

मेव्ह आणि लुईस लिकी या मायलेकींनी कूबी फोरा संशोधन प्रकल्पात भरीव कार्य केले असून नॅशनल जिऑग्रफिक सोसायटीने प्रतिष्ठीत हब्बर्ड पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले (२०१६). मेव्ह लिकी केनियात स्थायिक असून त्या पुरामानवशास्त्रात संशोधनकार्य करतात.

 

संदर्भ :

  • Lieberman, D. E. ‘Another face in our family treeʼ, Nature, Vol. 410, 2001.
  • Ward, C.; Leakey M. & Walker, A. ‘The new hominid species Australopithecus anamensisʼ, Evolutionary Anthropology, 7: 197-205, 1999.

समीक्षक : शौनक कुलकर्णी