काकाकुवा

काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे. या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे. मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बर्‍याच बेटांवर हा पक्षी आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियात याच्या अकरा जाती आहेत. त्यांपैकी पिवळसर तुरा असलेले पांढर्‍या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. गुलाबी रंगाचा काकाकुवा पक्षी फार सुंदर दिसतो.

सर्व काकाकुवांच्या डोक्यावर मोठा तुरा असून तो उभारता तसेच पसरता येतो. पायावर पकडीसारखी पुढे दोन व मागे दोन बोटे असतात. चोच पोपटाच्या चोचीसारखी मोठी, बाकदार व तीक्ष्ण टोकदार असते. कठिण कवचाची फळे खाण्यासाठी या चोचीचा त्याला उपयोग होतो. जीभ जाड असते. शेपटीची पिसे आखूड असतात. ते थव्यांनी राहत असून एकसारखे गोंगाट करतात. वनस्पतींची मुळे, कांदे, फळे, बिया व कीटक हे यांचे मुख्य अन्न होय. काही भागांत हे शेतीला उपद्रव करणारे पक्षी म्हणून ओळखले जातात.

काकाकुवा पक्षी बुद्धिमान आणि दूरदर्शी असतात. यांचा थवा भक्ष्य टिपीत असताना धोक्याची सूचना देण्याकरिता काही पक्षी जवळपासच्या झाडांवर बसून पहारा ठेवतात. अन्नासाठी घनदाट जंगलातून फिरताना चुकामूक होऊ नये म्हणून हे पक्षी आपल्या थव्यातील इतर पक्ष्यांशी सतत संवाद करीत असतात. हा पक्षी दुसर्‍या प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करतो. प्रयत्‍न करून शिकविले तर हा माणसाप्रमाणे दोन-चार वाक्ये बोलू शकतो. काकाकुवा निरनिराळ्या कसरती करू शकतात; म्हणून बरेच लोक त्यांना पाळतात. सर्कशीत काकाकुवा हे एक आकर्षण असते. हा सु. ८० वर्षे जगतो असे म्हणतात.