संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या डिक्टिऑप्टेरा गणाच्या ब्लॅटिडी कुलात सर्वपरिचित उपद्रवी झुरळांचा समावेश होतो. या कीटकांच्या सु. ४,५०० जाती असून सहारा वाळवंटापासून अंटाक्र्टिकापर्यंत ते कोठेही आढळतात. मानवाच्या अधिवासात वावरणाऱ्या झुरळांच्या सु. ३० जाती आहेत. सर्वसामान्यपणे घरात दिसणाऱ्या झुरळाचे शास्त्रीय नाव पेरिप्लॅनेटा अमेरिकाना आहे. ज्या जागी उब, मुबलक अन्न आणि ओलावा असतो अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. स्वयंपाकघर, बेकरी, उपाहारगृहे, साठवणीच्या जागा, कपाटे, पेट्या, संडास, मोऱ्या, गटार आणि त्यावरील झाकणाच्या खालच्या बाजूला झुरळे आढळून येतात. रात्री ते अधिक सक्रिय होतात आणि अंधारात अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात. ते सर्वभक्षी असून अन्नपदार्थ, कागद, कापड, चामडे इ. खाऊन तसेच कुरतडून त्यांची हानी करतात.

झुरळ (पेरिप्लॅनेटा अमेरिकाना)

झुरळ झुरळांचे शरीर चपटे व अंडाकार असते. रंग चकचकीत गडद तपकिरी असून लांबी २८-४४ मिमी. व रुंदी ८-१० मिमी. असते. अन्य कीटकांप्रमाणे त्याच्या शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. डोके खालच्या बाजूस वळलेले असून मुखांगे पदार्थ कुरतडून खाण्यास योग्य अशी असतात. डोक्याच्या वरच्या बाजूला दोन संयुक्त डोळे व दोन स्पृशा असतात. या स्पृशांद्वारे त्यांना स्पर्श, ध्वनी व गंधाचे ज्ञान होते. वक्ष तीन खंडांचे असून त्यावर पायांच्या तीन जोड्या व पंखांच्या दोन जोड्या असतात. पाय लांब असून त्यांवर शुके असतात. उदर दहा खंडांचे असून दहाव्या खंडावर गुदपुच्छप्रवर्धाची जोडी असते. याखेरीज फक्त नरामध्ये गुदशूकांची एक जोडी असते. पचनसंस्था पूर्ण विकसित असते. श्वसन श्वासनलिका व श्वासरंध्रांद्वारे होते. उत्सर्जनाचे कार्य मालपीगी सूक्ष्मनलिका करतात. चेतासंस्थेत चेतागुच्छिका, चेतातंतू व चेतारज्जू असतात.

झुरळाचे आकारमान, रंग व गौण लैंगिक लक्षणे यांवरून नर व मादी ओळखता येतात. प्रजननाचा काल मार्च ते सप्टेंबर असतो. प्रत्येक २५ दिवसांनंतर मादी आडोशाला व सुरक्षित जागी तपकिरी व चवळीच्या दाण्याच्या आकाराची अंडपेटी टाकते. अंडपेटी मादीच्या शरीरातून अर्धवट बाहेर पडलेल्या अवस्थेत १-२ दिवस राहते. हवेतील उष्णतेनुसार सु. ४० दिवसांनंतर अंडपेटी फुटून त्यातून बारीक आकाराची पिले बाहेर पडतात. एका अंडपेटीतून १६ पिले जन्माला येतात. १०-११ वेळा कात टाकल्यावर प्रौढ कीटक तयार होतो. झुरळाचे जीवनचक्र अपूर्ण आणि अर्धरूपांतरण पद्धतीचे असते.

झुरळे पीडक कीटक असून पटकी, कावीळ, पोलिओ, क्षय व विषमज्वर या रोगांचा फैलाव करतात. त्यांची विष्ठा, लाळ, अंडी आणि टाकलेली कात हे अधिहर्षतेचे कारक आहेत. या अधिहर्षतेमुळे दमा उद्भवू शकतो. झुरळे ही पाल, चिचुंदरी व बेडूक यांचे भक्ष्य आहेत. लिन्डेन, पायरेथ्रम, क्लोरडेन, मॅलॅथिऑन व बोरॅक्स (टाकणखार) यांचा उपयोग झुरळ नियंत्रणासाठी करतात. हल्ली फवारणीची नाशके व खडू बाजारात उपलब्ध आहेत. हायड्रोमेनॉन, फायप्रोनील, डायाटमी माती किंवा बोरिक आम्ल ही द्रव्ये झुरळांसाठी विषारी आहेत.

अपृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीररचनेचा प्राथमिक अभ्यास करताना झुरळांचे विच्छेदन केले जाते. कीटकांचे शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र व विषशास्त्र या संशोधनात त्यांचा वापर केला जातो. झुरळांची उत्पत्ती सु. २५ कोटी वर्षांपूर्वी झाली, मात्र त्यांच्या शरीररचनेत फारसा बदल झालेला नाही. म्हणून त्यांना ‘जिवंत जीवाश्म’ म्हणतात.

सर्व कीटकांमध्ये झुरळे काटक समजली जातात. त्यांच्या काही जाती महिनाभरसुद्धा अन्नपाण्याशिवाय सक्रिय राहतात आणि पोस्टाच्या तिकिटाला लावलेल्या खळीसारख्या मर्यादित अन्नपुरवठ्यावर तग धरू शकतात. काही हवेशिवाय ४५ मिनिटे जगू शकतात. कडाक्याच्या थंडीतही ती टिकाव धरतात. एका प्रयोगात अर्धा तास पाण्यात बुडविल्यानंतरही झुरळे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेत किरणोत्साराचा परिणाम झुरळांच्यावर कमी होतो. किरणोत्साराबाबतच्या सहनशक्तीमागील कारण त्यांच्या जीवनचक्रामध्ये आहे. किरणोत्साराचा सर्वांत अधिक परिणाम पेशी विभाजनावर होतो. किरणोत्सार थोड्या अवधीसाठी झाला तर झुरळांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र तो सतत दीर्घकाळ होत राहिला तर झुरळांचा टिकाव लागणार नाही. किरणोत्साराची जी मात्रा मनुष्यासाठी जीवघेणी ठरते तिच्यापेक्षा ६ ते १५ पट मात्रा झुरळे सहन करू शकतात.

घरातील झुरळांच्या संख्येवर नियंत्रण राखण्यासाठी घर कोरडे व स्वच्छ ठेवावे. पाण्याचे नळ नीट बंद करावेत. घरातील वनस्पतींना पुष्कळ पाणी घालू नये. अन्नपदार्थ सीलबंद डब्यात झाकून ठेवावेत. खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवू नयेत. तसेच त्यांना लपण्यासाठी अडगळ साचू देऊ नये. वर्तमानपत्राची रद्दी वेळोवेळी काढून टाकावी.