मृदुकवचधारी कीटकांचा एक समूह. कीटकांच्या हेमिप्टेरा गणातील दहा कुलांमध्ये मावा कीटकाच्या सु. ४,४०० जातींचा समावेश केला जातो. त्यांचा आढळ प्रामुख्याने उपोष्ण प्रदेशांत असला, तरी ते सर्वत्र तुरळक प्रमाणात आढळतात. वनस्पतींच्या उवा, हिरव्या माश्या व काळ्या माश्या अशा स्थानिक नावांनी त्या ओळखल्या जातात.

मावा कीटकांचा समूह

मावा कीटक हे रंगाने हिरवे, काळे, तपकिरी-गुलाबी व करडे असतात. शरीराची लांबी १–१० मिमी.पर्यंत असते. डोके, वक्ष आणि उदर असे शरीराचे तीन भाग असतात. डोक्यावरील दोन लहान उंचवट्यांवर दोन संयुक्त डोळे असून प्रत्येक डोळ्यास तीन भिंगे असतात. तसेच डोक्यावर सहा वलयांकित स्पृशांची एक जोडी असते. जंभ आणि जंभिका यांनी युक्त अशा सोंडेने मावा कीटक पोशिंद्या वनस्पतींची पाने, देठ, अंकुर, कोवळी खोडे व फळे या भागांतील रस शोषून घेतात. वक्षावर पायांच्या तीन जोड्या असून त्यांच्या टोकाला दोन नखरे असतात. पंखधारी आणि पंखविरहित अशा दोन्ही अवस्था या कीटकांमध्ये असतात. त्यांच्या उदर भागात असणाऱ्या आणि शृंगिकाप्रमाणे दिसणाऱ्‍या निनालिकांमधून गोड द्रव स्रवतो. त्याला निनालिका मेण म्हणतात. उदरभागाच्या शेवटी गुदछिद्राच्या वरील बाजूला शेपटीसारखा एक छोटा भाग असतो.

काही जातींचे मावा कीटक आपल्या आवडीच्या विशिष्ट पोशिंद्या वनस्पतींवरच आढळतात आणि त्याच वनस्पतींपासून अन्न मिळवितात. हिरवे मावे मात्र अनेक कुलांतील वनस्पतींवर जगतात.

माव्यांच्या आहारामध्ये सुक्रोजचे प्रमाण खूप असले, तरी आवश्यक ॲमिनो आम्ले नसतात. तसेच अन्य प्राण्यांप्रमाणे ही ॲमिनो आम्ले त्यांना शरीरात तयार करता येत नाहीत. त्यांच्या शरीरातील बॅक्टेरिओसाइट नावाच्या पेशीमधील सहजीवी जीवाणूंमार्फत त्यांना ॲमिनो आम्लांचा पुरवठा होतो. माव्यांखेरीज इतर सु. १०% कीटकांमध्येसुद्धा जीवाणूंच्या साह्याने आवश्यक ॲमिनो आम्ले मिळविली जातात.

मावा कीटकांमध्ये बहुसंख्येने माद्या, तर अत्यल्प संख्येने नर असतात. त्यांच्यात अलैंगिक तसेच लैंगिक प्रजनन होते. अलैंगिक प्रजनन अनिषेकजनन पद्धतीने होते (पहा : कु. वि. भाग – १ अनिषेकजनन). उन्हाळ्यात सामान्यपणे लैंगिक प्रजनन, तर हिवाळ्यात अनिषेकजनन घडून येते. त्यांचा जीवनक्रम अपूर्ण प्रकारचा असून चार वेळा निर्मोचन होऊन अगदी कमी वेळात माद्या प्रजननक्षम होतात. एक मादी शंभर डिंभकांना जन्म देते. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढते. त्यांच्या निनालिकांपासून निघणाऱ्‍या मेणासारख्या आवरणामुळे त्यांच्यावर कीटकनाशकांचा फारसा परिणाम होत नाही. मावा कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अतिरसशोषण होऊन वनस्पतींची वाढ खुंटते. मावा कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास अनेक वनस्पतींना विषाणूंची बाधा होते. गुलाब, ॲस्टर, खरबूज, सफरचंद, बटाटा, वाटाणा, घेवडा, सोयाबीन इ. वनस्पतींवर या कीटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फळबागा व पिके यांचे मोठे नुकसान होते.

भक्षकापासून सावध होण्यासाठी अनेक जातींचे मावा कीटक इतर कीटकांना सूचना देण्यासाठी सूचक रसायने स्रवतात. या रसायनांचा गंध हवेत मिसळून इतर मावा कीटकांना धोक्याची सूचना मिळते आणि ते तेथून दूर निघून जातात. मावा कीटकांवर जैविक तसेच कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण मिळविता येते. या कीटकांवर जैविक नियमन राखण्यासाठी भुंगेरे (उदा., चित्रांग भुंगेरा), परजीवी गांधील माश्या इत्यादींचा वापर करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा