संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या व्दिपंखी गणातील एक उपद्रवी कीटक. जगभर डासांच्या सु. ३,२०० जाती आहेत. उष्ण प्रदेशात डास अधिक असून ध्रुवीय बर्फाळ प्रदेश, अतिशुष्क वाळवंटी प्रदेश आणि समुद्रसपाटीपासून ४,२०० मी. पेक्षा अधिक उंचीवरील प्रदेशात डास आढळत नाहीत. त्यांच्या अ‍ॅनॉफेलीस, क्युलेक्स आणि ईडिस या प्रजाती विविध रोगांचा प्रसार करतात. डासांच्या केवळ माद्या मनुष्याला चावतात तर नर चावत नाहीत. मनुष्याखेरीज गाय, म्हैस, घोडा, खार, ससा अशा सु. ७० प्राण्यांना डास चावतात.

डास डास ३-४ मिमी. लांबीचा, काळ्या अथवा करड्या रंगाचा व सडपातळ कीटक आहे. त्याच्या अंगावर सूक्ष्म खवले असतात. शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोके आखूड असून मानेने वक्षाला जोडलेले असते. डोक्यावर दोन शृंगिका, दोन मोठे संयुक्त डोळे आणि मुखांगे असतात. शृंगिका अनेक खंडांच्या बनलेल्या असून खंडांच्या सांध्यांभोवती केसांचे वलय असते. नराच्या शृंगिकांवरील केस आकाराने अधिक मोठे असून मादीच्या शृंगिकांवरचे केस आकाराने लहान व विरळ असतात. मुखांगात वरचा ओठ, खालचा ओठ, जंभ, जंभिका, जंभिकेचे स्पर्शक आणि जीभ यांचा समावेश असतो. मुखांगाचे रूपांतर एका निमुळत्या सोंडेमध्ये झालेले असते. या सोंडेतील जंभ आणि जंभिका यांचा उपयोग आश्रयीच्या त्वचेला छिद्र पाडण्यासाठी होतो. या छिद्रातून जीभ घुसवून सोंडेतून लाळ सोडली जाते आणि केशवाहिनीतील रक्त शोषून घेतले जाते.

डासांचे वक्ष तीन खंडांचे बनलेले असून प्रत्येक खंडावर पायांची जोडी असते. वक्षाच्या मधल्या खंडावर नाजूक, पारदर्शक व लांबट अशा पंखांची एक जोडी असते. पश्च खंडावर पंखांऐवजी संतोलकांची एक जोडी असते. तोल सांभाळण्यासाठी या संतोलकांचा उपयोग केला जातो. डासांच्या वक्ष भागात दोन आणि उदर भागात सहा अशा एकूण आठ श्वसन छिद्रांच्या जोड्या असतात. डासाचे उदर आठ खंडांचे बनलेले असते. नर-मादीच्या शेवटच्या खंडावर आलिंगके, गुदद्वार आणि जननरंध्र असते. मादीमध्ये शेवटच्या खंडावर अंडनिक्षेपक असते.

हवेत उडत असताना नर-मादीचे मीलन होते. मादी पाण्याच्या पृष्ठभागावर अंडी घालते. २-३ दिवसांत अंड्यांतून अळ्या बाहेर येतात. पुढील ८-१० दिवसांत अळ्या ४-५ वेळा कात टाकत मोठ्या होतात. त्यानंतर प्रत्येक अळीचे कोशात रूपांतर होते. २-३ दिवसांत हे हालचालक्षम कोश वारंवार पाण्याच्या पृष्ठभागी येऊन शेवटी प्रौढ डास पाण्याबाहेर हवेत झेपावतो. नराचा आयु:काल एक आठवड्याचा तर मादीचा एक महिन्याचा असतो. अंडे, अळी, कोश आणि प्रौढ कीटक या डासांच्या जीवनचक्रातील चार अवस्था असतात. डासांमध्ये पूर्ण रूपांतरण घडून येते.

अंडी घालण्यापूर्वी डासाच्या मादीला रक्त पिणे आवश्यक असते. कारण त्यातून मिळणारी प्रथिने वापरून ती अंड्यांची निर्मिती करीत असते. रक्तासाठी ती आश्रयीच्या शरीराची उब, आर्द्रता, कार्बन डाय-ऑक्साइड वायू, शरीराचा गंध, गडद रंगाचे कपडे इत्यादींमुळे आकर्षित होते. मादी सोंडेतील जंभ-जंभिकांच्या साहाय्याने त्वचेला छिद्र पाडून त्यातून जीभ खुपसते आणि आश्रयीच्या ऊतींंमध्ये लाळ सोडते. त्यामुळे त्या भागात जळजळ होते आणि तेथील रक्तपुरवठा वाढतो. लाळेत परजीवी असल्यास ते आश्रयीच्या शरीरात उतरतात. लाळेतील द्रव्यामुळे तेथील रक्त न साकळल्याने ते शोषून घेणे मादीला सुकर होते. लाळ सोडण्याच्या जिभेतील नलिकेतूनच मादी रक्त शोषते. नर डास जेव्हा वनस्पतींच्या कोमल भागांपासून रस शोषून घेतो तेव्हा त्यांनी लाळेतून सोडलेल्या विकरांमुळे वनस्पतींच्या ऊतींचे पचन होते आणि त्यांचे द्रवात रूपांतर होते. नर डास फुलांमधील मकरंदही शोषतात.

अ‍ॅनॉफेलीस, क्युलेक्स आणि ईडिस या प्रजातींतील डास वेगवेगळ्या रोगांचा प्रसार करतात.

अ‍ॅनॉफेलीस डास

अ) अ‍ॅनॉफेलीस : हे डास रात्री वावरतात. त्यांचे डोके, वक्ष आणि उदर सरळ रेषेत असल्याने वक्ष भागावर कुबड दिसत नाही. हे डास बसताना पृष्ठभागाशी कोन करून तिरके बसतात. त्यांच्या मार्फत प्लाझ्मोडियम या हिवतापाच्या कारक आदिजीवांचा प्रसार होतो. या आदिजीवांचे लैंगिक प्रजनन डासाच्या शरीरात होत असल्याने डास हा प्रथम आश्रयी आणि मनुष्य हा द्वितीय आश्रयी मानला जातो.

क्युलेक्स डास

(आ) क्युलेक्स : हे डास रात्री वावरतात. या डासांच्या वक्ष भागावर कुबडासारखा बाक असतो. त्यामुळे ते जिथे बसतात, त्या पृष्ठभागाशी त्यांचे उदर समांतर राहते. त्यांच्यामार्फत हत्तीताप रोगाचा कारक वुकेरेरिया बँक्रॉफ्टी या परजीवी गोलकृमींचा व जपानी मस्तिष्क ज्वराच्या कारक विषाणूंचा प्रसार होतो.

ईडिस ईजिप्ताय डास

(इ) ईडिस : हे डास आकाराने मोठे असून दिवसा संचार करतात. अंगावर आणि पंखांवर काळे-पांढरे पट्टे किंवा ठिपके असतात. म्हणून त्यांना वाघरू असेही म्हणतात. चिकुनगुन्या आणि डेंग्यू  यांच्या कारक विषाणूंचा प्रसार त्यांच्यामार्फत होतो.

डासांचे जीवनचक्र मुख्यत: पाण्यात पूर्ण होत असल्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी त्यांची उत्पत्तिस्थाने नष्ट करणे आवश्यक ठरते. त्यामुळे शक्यतो पाणी साचू देऊ नये. साचलेल्या पाण्यावर कीटकनाशक फवारणी करावी किंवा रॉकेल टाकावे. पाण्याचा साठा मोठा असल्यास त्यात गप्पी मासे सोडावेत. घरातील पाणी झाकून ठेवावे, घराजवळील पाण्याचा निचरा करावा आणि उघडी गटारे झाकून घ्यावीत. घराभोवती रिकामे डबे, बाटल्या व मोटारीचे टायर ठेवू नयेत. त्यामुळे डासांच्या प्रजननाला खीळ बसते. डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी वापरावी. तसेच दरवाजे, खिडक्या, संडास आणि सांडपाण्यातील वायू बाहेर सोडणाऱ्या नळ्यांवर शक्यतो डासप्रतिबंध जाळी बसवावी. डासांना मारणे सोपे नसते, परंतु डासांना पळवून लावता येते. त्यासाठी खास धूप, अगरबत्त्या, मलमे व वड्या यांचा वापर करावा. डासांना पळवून लावण्याकरिता बाष्परसायने हवेत सोडणारी, तसेच विशिष्ट ध्वनी निर्माण करणारी विजेवर चालणारी उपकरणे बाजारात मिळतात. यांपैकी योग्य मार्गाचा वापर करून डासांना घरापासून दूर ठेवून आरोग्याचे रक्षण करता येते.

ब्रिटिश वैद्यकीय अधिकारी सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये भारतात सिकंदराबाद येथे अ‍ॅनॉफेलीस डासांमधील प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या हिवतापाच्या परजीवीच्या अवस्थांचा अभ्यास करून डासांमार्फत हिवताप पसरतो, हे दाखवून दिले. या कार्याबद्दल १९०२ सालचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार रॉस यांना देण्यात आला.