स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील समखुरी गणाच्या सुइडी कुलातील एक प्राणी. पाळीव डुकराचे शास्त्रीय नाव स्क्रोफा डोमेस्टिकस आहे. जगातील सर्व देशांत डुकरे आढळतात. इ .स २९००-१५०० या काळात रानटी डुकरे मनुष्याच्या सान्निध्यात असल्याचा उल्लेख आढळून आला आहे. पाळीव डुकरांची जाती वन्य पूर्वज डुकरांची म्हणजे सुस स्क्रोफा या जातीची उपजाती आहे, असे मानतात. पाळीव डुकरांचा उगम रानटी डुकरांपासून झालेला आहे. पाळीव डुकरांच्या बर्कशायर, यॉर्कशायर, लँड्रेस, हँप्शायर, टॅमवर्थ, पोलंड-चिनी चिनाज, ड्युरोक, कँटोनिस या परदेशी जाती आणि रानडुक्कर, ठेंगू डुक्कर, देशी डुक्कर या भारतीय जाती प्रसिद्ध आहेत. डुकराला सूकर आणि वराह अशीही नावे आहेत. प्राचीन काळी ग्रीसमध्ये डुक्कर हे सुपीकतेचे प्रतीक मानले जात असे.

डुक्कर (स्क्रोफा डोमेस्टिकस)

मोठे पोट, आखूड पाय, लांब व सुलभ हालचाल होणारे मुस्कट, आखूड बारीक वळलेले शेपूट, तसेच अंगावरील आखूड राठ केस ही डुक्करांची वैशिष्ट्ये आहेत. पूर्ण वाढलेल्या डुकरांची लांबी सु. १२० सेंमी., उंची ९० सेंमी. आणि वजन ५५—३५० किग्रॅ. असते. प्रत्येक पायाला चार खूर असतात. मुस्कटाच्या तोंडावर कास्थींपासून तयार झालेली चकती असते. डुकरांना ४४ दात असतात. सस्तन प्राण्यांमध्ये दातांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्यांच्या मेंदूमधील गंधपाली अधिक विकसित असल्याने गंधक्षमता तीव्र असते. गंधक्षमता तीव्र असल्याने विशिष्ट प्रकारच्या अळिंबांचा शोध घेण्यासाठी यूरोपात त्यांचा वापर करतात.

डुकरांना एकमेकांसोबत राहायला आवडते. मात्र, त्यांचे कळप लहान असतात. पाळीव डुकरे स्वत:ला अधिक स्वच्छ ठेवतात. घर्म-ग्रंथींचा अभाव असल्याने त्यांना घाम येत नाही. त्यामुळे ती पाण्यात अथवा चिखलात लोळून त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित राखतात. मोकाट डुकरे सर्वभक्षी असतात. ती अनेक तास सतत खात राहतात. तसेच अनेक तास झोपून राहतात. मृत कीटक, प्राण्यांची विष्ठा, नासकी फळे, कुजलेले पदार्थ इ. त्यांचे खाद्य आहे.

डुकरांच्या ठराविक जाती आंतरजननाने वाढविण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने मांसासाठी (पोर्क) डुकरे पाळली जातात. या व्यवसायाला वराहपालन असे म्हणतात. राहण्यासाठी बंदिस्त जागा व योग्य आहार यांद्वारे त्यांची वाढ जोमाने होते.चरबीची डुकरे धिप्पाड असून त्यांत चरबीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असू शकते. डुकराच्या आहारात मका, गहू किंवा तांदळाचा कोंडा, शेंगदाण्याची पेंड आणि कडधान्ये यांच्या मिश्रणाचा वापर होतो. यात मक्याचे प्रमाण अधिक असते. डुकराचे प्रजनन चक्र कमी कालावधीचे असते. सु. ८ महिन्यांनी माद्या प्रजननक्षम होतात. गर्भावधी ११४ दिवसांचा असतो. मादी एका वेळेस ९—१५ पिलांना जन्म देते. त्यामुळे थोड्या काळात डुकरांची संख्या वाढलेली दिसून येते.

डुकरांना प्लेग, ब्रुसेलोसिस, स्वाइन फ्ल्यू, एन्फ्ल्यूएंझा, जंत, यकृत पर्णकृमिविकार, पट्टकृमिविकार, काळपुळी, लाळरोग, क्षय इ. रोग होतात. डासांपासून डुकरांना होणारा मेंदू – आवरणदाह मनुष्यामध्ये पसरल्यामुळे महापालिका क्षेत्रात अधूनमधून डुकरे मारण्याची मोहीम आखली जाते. डुकरांना झालेल्या स्वाइन फ्ल्यूचा संसर्ग माणसांनाही होऊ शकतो.

डुकरांपासून मांसाशिवाय त्वचा, केस, रक्त, चरबी, हाडे आणि विविध ग्रंथी मिळविता येतात. त्वचेचा उपयोग भाजल्यामुळे झालेल्या जखमांवर तात्पुरते आच्छादन म्हणून करतात. त्यांच्या त्वचेपासून कमाविलेल्या कातड्याचा उपयोग पट्टे, बूट, हातमोजे, जॅकेट इ. वस्तू तयार करण्यासाठी होतो. केसांपासून ब्रश बनवितात. रक्त जनावरांच्या खाद्यामध्ये आणि खते व औषधे तयार करण्यासाठी वापरतात. चरबीपासून साबण, मेणबत्त्या, वंगण, सौंदर्यप्रसाधने आणि स्फोटके तयार करतात. हाडांपासून वंगण, तेल आणि सरस तयार केले जाते. त्यांच्या ग्रंथीपासून इन्शुलीन तसेच वृद्धिसंप्रेरके मिळविली जातात. हाडांपासून मिळणाऱ्या जिलेटिनाचा वापर औषधी पुटिकांचे (कॅप्सूल) बाह्यावरण तयार करण्यासाठी होतो. मानवी हृदयातील झडपा व्यवस्थित कार्यरत नसल्यास काही वेळा डुकराच्या हृदयातील झडपांचे प्रतिरोपण करतात.