(ब्रायोफायटा). वनस्पतिसृष्टीतील भूवनस्पतींचा (जमिनीवरील वनस्पतींचा) एक उपगट. या उपगटातील वनस्पती असंवहनी असतात. म्हणजे त्यांच्यात पाणी वाहून नेणाऱ्या (प्रकाष्ठ) आणि अन्नघटक वाहून नेणाऱ्या (परिकाष्ठ) ऊती नसतात. शेवाळी वनस्पतींचे तीन विभाग आहेत; शेवाळ किंवा हरिता (मॉसेस), यकृतका (लिव्हरवर्ट्स) आणि शृंगका (हॉर्नवर्ट्स). हे तीन विभाग आणि संवहनी वनस्पती मिळून भूवनस्पतींचा गट होतो. या गटातील वनस्पतींना भ्रूणोद्भिद (एम्ब्रायोफायटा) असेही म्हणतात, कारण त्या भ्रूणापासून वाढतात. हा एकपूर्वजी गट (क्लेड) आहे; अशा गटातील सर्व सजीव एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले असतात (पहा : वनस्पतिसृष्टी).

शेवाळी वनस्पती शैवालांपासून (अल्जी) वेगळ्या आहेत. शेवाळी वनस्पतींचा अधिवास जमिनीवर असतो, तर शैवाले सागरी किंवा गोड्या पाण्यांत राहतात. सर्व शेवाळी वनस्पती बहुपेशीय असतात, मात्र शैवालांपैकी काही एकपेशीय असतात (पहा : शैवाल). हरित शैवाल आणि भूवनस्पती मिळून वनस्पतिसृष्टी बनते. वर्गीकरण विज्ञानात रेण्वीय जीवशास्त्रातील प्रगतीमुळे बदल होत आहेत. २०१५ साली झालेल्या संशोधनानुसार हरित शैवाल वगळता इतर शैवालांचा समावेश वनस्पतिसृष्टीत केला जात नाही.

शेवाळी वनस्पती मुख्यत: आर्द्र अधिवासात वाढतात, परंतु शुष्क वातावरणातही त्या तग धरून राहू शकतात. त्यांच्या सुमारे सु. २०,००० जाती आहेत. या वनस्पतींच्या प्रजननक्षम संरचना – युग्मकधानी (गॅमेटँजियम) आणि बीजाणुधानी (स्पोरँजियम) – आच्छादित असतात. शेवाळी वनस्पती निरनिराळ्या ठिकाणी दिसून येतात. अतिथंड आर्क्टिक प्रदेश ते उष्ण वाळवंटी प्रदेश, समुद्रकिनारे ते पर्वतीय प्रदेश, रखरखीत शुष्क वाळवंटी प्रदेश ते आर्द्र पर्जन्यवने असे वेगवेगळे तापमान असलेल्या जागी त्या वाढतात. त्या खडक, उघडी माती अशा जागीही वाढू शकतात व टिकून राहू शकतात. जेथे संवहनी वनस्पती वाढू शकत नाहीत तेथे शेवाळी वनस्पती वाढतात, कारण जमिनीतून पोषक घटक मिळवण्यासाठी त्या मुळांवर अवलंबून नसतात. त्यांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

(१) शेवाळी वनस्पतींच्या जीवनचक्रात युग्मकोद्भिद अवस्था दीर्घकाळ असते, तर बीजाणुद्भिद अवस्था अल्पकाळ टिकते. संवहनी वनस्पतींच्या जीवनचक्रात हे नेमके उलट असते.

(२) बीजाणुद्भिद अवस्थेत शेवाळी वनस्पती शाखाहीन असतात.

(३) ज्यांना खऱ्या संवहनी ऊती म्हणतात, अशा लिग्निनयुक्त संवहनी युती शेवाळी वनस्पतींमध्ये नसतात.

शेवाळी वनस्पती दोन प्रकारच्या असू शकतात; (१) प्रकायी व (२) पर्णिल.

प्रकायी प्रकारच्या वनस्पतींचे मुळे, खोड, पाने असे विभेदन झालेले नसते. त्या एकतर चपट्या (उदा., रिक्सिया) किंवा यकृताच्या आकाराच्या (उदा., यकृतका, मार्केन्शिया) असतात. त्यांच्या प्रकायाला (शरीराला) मूलाभ (मुळासारख्या संरचना) असलेला थर खाली जोडलेला असतो. मूलाभ आधाराला पकडून ठेवतात आणि ते जमिनीतून पाणी व पोषक घटक शोषून घेतात. प्रकाय हवेतील बाष्प शोषून घेते.

पर्णिल प्रकारात उभे खोड आणि त्यांच्या बाजूंनी पर्णिले (पानांसारख्या संरचना) असतात (उदा., शेवाळ). खोड शाखायुक्त किंवा शाखाहीन असतात. पाने खोडावर सर्पिलाकार मांडणीत रचलेली असतात आणि ती खोडाच्या किंवा पानांच्या टोकाला दाटीदाटीने असतात. या वनस्पतीही आधाराला मूलाभांनी पकडून ठेवतात. मूलाभ बहुपेशीय, शाखायुक्त असून त्यांच्या पेशीभित्तिका तिरक्या असतात; ती जमिनीतून पाणी व पोषक घटक शोषून घेतात. शेवाळी वनस्पतींमध्ये खऱ्या संवहनी ऊती नसल्या, तरी त्यांच्यात जाड पेशींपासून बनलेले वहनी स्तंभ दिसून येतात.

शेवाळी वनस्पतींमध्ये प्रजनन (पुनरुत्पादन) शाकीय आणि लैंगिक प्रकारचे असते; (१) प्रकायाचे जुने, मागचे भाग मृत झाल्यावर किंवा त्यांचा ऱ्हास झाल्यावर त्यांच्या पुढच्या कोवळ्या भागांपासून नवे प्रकाय तयार होतात. प्रकाय इंग्लिश वाय (Y) आकाराचे आल्याने हे घडून येते. (२) त्यांच्या आगंतुक शाखा तुटून पडल्यावर मूळ वनस्पतीपासून दूर जातात, रुजतात व त्यांच्यापासून नवी वनस्पती तयार होते. (३) पानांवर किंवा खोडावरील मुकुलांपासून युग्मकधर (गॅमेटोफोर) तयार होतात.

जमिनीवरील सर्व वनस्पतींप्रमाणे शेवाळी वनस्पतींमध्ये पिढी एकांतरण घडून येते. मात्र शेवाळी वनस्पतींतील एकांतरण संवहनी वनस्पतीतील एकांतरणाच्या उलटे असते. त्यांची एकगुणित युग्मकोद्भिद अवस्था दीर्घकाळ टिकते. शेवाळी वनस्पतींच्या ज्या अवस्थेला आपण वनस्पती समजतो, ती एकगुणित युग्मकोद्भिद अवस्था असते. याउलट संवहनी वनस्पतींमध्ये ज्या अवस्थेला आपण वनस्पती समजतो ती बीजाणुद्भिद अवस्था असते. शेवाळी वनस्पतींत द्विगुणित बीजाणुद्भिद अवस्था अल्पकाळ टिकते. त्यांच्यातील बीजाणुद्भिद नेहमीच शाखाहीन असतात आणि ते केवळ बीजाणू निर्माण करणाऱ्या एकाच बीजाणुधानीची निर्मिती करतात. या वनस्पतींचे युग्मकोद्भिद स्त्रीधानी तसेच पुंधानी यांची निर्मिती करतात. या युग्मकधानी (स्त्रीधानी व पुंधानी) सामान्यपणे प्ररोहाच्या टोकाला, पानांच्या बगलेत किंवा प्रकायाखाली दिसून येणार नाही अशा ठिकाणी येतात. शेवाळी वनस्पतींच्या शुक्रपेशी कशाभिकायुक्त असतात आणि ज्या पुंधानीत त्या निर्माण होतात तेथून स्त्रीधानीकडे त्यांना पाण्यावर तरंगत जावे लागते, जी कदाचित दुसऱ्या वनस्पतीवर असू शकते. या कामी शेवाळी वनस्पतींना संधिपाद प्राण्यांची मदत होते.

शेवाळी वनस्पती : (१) रिक्सिया, (२) अँथोसिरोस, (३) फ्युनेरिया.

स्त्रीधानीत फलित अंडपेशीपासून युग्मनज बनतो आणि त्यापासून बीजाणुद्भिद (भ्रूण) तयार होतात. पक्व बीजाणुद्भिद युग्मकोद्भिदाला जुळलेले असतात. त्यांना एक देठ (दंड) आणि एक बीजाणुधानी असते. बीजाणुधानीत अर्धसूत्री विभाजनाने एकगुणित बीजाणू तयार होतात. त्यांचा प्रसार सामान्यपणे वाऱ्यामार्फत होतो आणि ते योग्य पर्यावरणात पडल्यास त्यांच्यापासून नवीन (एकगुणित) युग्मकोद्भिद उत्पन्न होतात. अशा प्रकारे शेवाळी वनस्पतींचा प्रसार हा नेचे तसेच इतर अबीजी वनस्पतींच्या शुक्रपेशी आणि बीजाणू जसे तरंगत जातात, तसा होतो.

शेवाळी वनस्पतींचे वर्गीकरण या गटातील वनस्पतींची संरचना व लैंगिक प्रजननाची पद्धत यांनुसार पुढील वर्गात करतात;

(अ) मार्केन्शियोप्सिडा : यांना सामान्यपणे यकृतका म्हणतात. उदा., रिक्सिया, मार्केन्शिया.

(ब) अँथोसिरोटोप्सिडा : यांना सामान्यपणे शृंगका म्हणतात. युग्मकोद्भिद चपटे असतात. त्यांच्या बीजाणुउद्भिदांना पाद आणि संपुटे (कॅप्सूल) असतात. संपुटात वंध्य स्तंभिका असते. उदा., अँथोसिरोस.

(क) ब्रायोप्सिडा : युग्मकोद्भिद उभे आणि विभेदित असतात. बीजाणुउद्भिदांचे विभेदन पाद, दंड आणि संपुट असे झालेले असते. संपुटात स्तंभिका असते. उदा., फ्युनेरिया.

शेवाळी विभागातील वनस्पती पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या असतात. उघड्या खडकांवर शेवाळांची (हरितांची) वाढ होणे हा जैविक बदलाच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या प्रक्रियेमुळे खडकाचे रूपांतर मृदेत होते. जमिनीवर शेवाळ दाटीवाटीने व झुबक्याने वाढते. ते मातीच्या कणांना घट्ट पकडून ठेवतात आणि त्यांना पावसाच्या पाण्यापासून वाहून जाण्याचे टाळतात. शेवाळ आणि काही पर्णिल यकृतका यांच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. स्फॅग्नम प्रजातीतील शेवाळ त्यांच्या वजनापेक्षा १८–२६ पट पाणी धरून ठेवतात. म्हणून रोपे, कापलेल्या वनस्पतींच्या फांद्या व रोपे, वनस्पतींचे तुकडे, भाज्या, फळे, कंद इ. वाहून नेताना किंवा साठवण करताना स्फॅग्नम  प्रजातीतील ओल्या शेवाळांचा वापर करतात.