तांबट हा साधारणपणे चिमणीच्या आकाराचा शेवाळी हिरव्या रंगाचा पक्षी आहे. पिसिफॉर्मिस गणाच्या मेगॅलेमिडी कुलातील हा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव मेगॅलेमा हीमासेफॅला आहे. दक्षिण आशिया आणि दक्षिणपूर्व आशियातील हा निवासी आहे. श्रीलंका, मलेशिया व फिलिपीन्स या देशांमध्येही तो दिसतो. भारतात हा पक्षी सर्वत्र आढळतो. दक्षिण भारतात पळणी टेकड्यांच्या परिसरात तो सु. १,१०० मी. खाली तर हिमालयाच्या परिसरात तो सस.पासून सु. १,००० मी. उंचीपर्यंत दिसून येतो. गर्द झाडी, विरळ वृक्षांचे प्रदेश, शेते व बागा अशा ठिकाणी त्याचा वावर असतो. वाळवंटात किंवा वर्षावनांत मात्र तो दिसत नाही.

तांबट (मेगॅलेमा हीमासेफॅला)

तांबट पक्ष्याची लांबी सु. १५ सेंमी. असून शरीर किंचित बसके व गुबगुबीत असते. पाठीच्या पंखांचा रंग शेवाळी हिरवा असतो. पोटाच्या बाजूला पिवळसर सफेद रंगावर राखाडी किंवा गडद तपकिरी रंगाचे फराटे असतात. डोळे काळे असून डोळ्यांभोवती पिवळी वर्तुळे असतात. डोक्यावर पुढच्या भागावर आणि गळ्याला भडक तांबडी पिसे असतात. त्यामुळे तो डोक्याला आणि गळ्याला गंध लावल्यासारखा दिसतो. डोक्याच्या मागच्या भागापासून निघून गालांमागून खाली गळ्यापर्यंत आणि पुढे चोचीपर्यंत पसरलेले काळे भाग असतात. डोळ्याच्या वर आणि खाली भुवयांप्रमाणे पिवळे पट्टे असतात. खालचे पिवळे पट्टे अधिक रुंद असतात. डोळे व भुवया यांच्यामधून जाणारी एक अरुंद काळी पट्टी चोचीपासून मागच्या काळ्या रंगापर्यंत गेलेली असते. चोच जाड व काळी असते. चोचीच्या बुडाशी धाग्यांसारखी काळी पिसे असतात. ही पिसे दाढीसारखी दिसतात, म्हणून फ्रेंच भाषेत बारबेट म्हणजे दाढीवाला. पाय लालसर असून नखर काळे असतात. शेपूट तोकडी असते. नर व मादी सारखेच दिसतात. पिलांमध्ये मात्र शरीरावरील रंग फिकट असतात. श्रीलंकेत आढळणाऱ्या तांबट पक्ष्याच्या छातीकडचा जास्त भाग लाल असतो, चेहऱ्यावर काळे डाग असतात तर पोटाकडच्या भागावर गडद फराटे असतात.

तांबट पक्षी वृक्षवासी असून जमिनीवर क्वचितच उतरतो. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात हा झाडाच्या शेंड्यावर बसलेला दिसून येतो. त्याच्या हिरव्या रंगामुळे तो सहसा दिसून येत नाही. फेब्रुवारी ते एप्रिल हा त्याचा विणीचा हंगाम असून या काळात त्याच्या ओरडण्याच्या विशिष्ट आवाजामुळे त्याची उपस्थिती जाणवते. दर दोन सेकंदात दोनदा किंवा तीनदा नियमितपणे तो ‘टँक, टँक असा तांब्याचा पत्रा ठोकल्यासारखा आवाज काढत राहतो. हा आवाज भांडी ठोकणाऱ्या तांबट या कारागिराने काढलेल्या आवाजासारखा असतो म्हणून नाव तांबट. प्रत्येक ठोक्याला तो आपले डोके किंचित उंचावून खाली घेत असतो. त्यावेळी त्याचा किरमिजी गळादेखील फुगत असतो आणि शेपटीला हलकासा झटका बसतो. ओरडताना तो सतत मान वळवीत असल्यामुळे दर वेळी आवाज वेगवेगळ्या दिशांनी येत असल्याचा भास होतो. त्याचे ओरडणे बराच वेळ चालू राहते. आवाजाच्या दिशेने शोधल्यास त्याच्या विशिष्ट हालचालींमुळे तो दिसून येतो. हिवाळ्यात मात्र त्याचा आवाज ऐकू येत नाही.

तांबट पक्षी एकेकटे किंवा जोडीने हिंडतात. वड, पिंपळासारख्या झाडांवर त्यांची विसकळीत टोळकी काही वेळा दिसून येतात. वड, पिंपळ व उंबर यांसारख्या झाडांची फळे हे त्यांचे मुख्य अन्न असून काही वेळा ते कीटक किंवा फुलांच्या पाकळ्याही खातात. वृक्षाच्या वठलेल्या फांदीवर बहुदा खालच्या बाजूला लाकूड पोखरून त्या पोकळीत आपले घरटे करतात. घरट्याचे तोंड सुबक वर्तुळाकार असून घरटे आतून सु.३० सेंमी. लांब असते. एकावेळी मादी सु. ३४ अंडी घालते. नर व मादी दोघेही अंडी उबवितात. पिलांना पिकलेली फळे भरविली जातात.