खाऱ्या पाण्यातील एक खाद्य मासा. मांदेलीचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिइडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिरी आहे. उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात मांदेली मासे आढळतात. भारतात मुंबई व गुजरात यांच्या समुद्रकिनाऱ्याला आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील नदीमुखखाड्यांत ते विपुल प्रमाणात मिळतात.

मांदेली (कोइलिया डुस्सुमिरी)

मांदेलीची  लांबी १८–२० सेंमी. असते. शरीर लांबट व दोन्ही बाजूंनी चपटे असून शेपटीकडे खूपच निमुळते असते. डोळे मोठे व मुस्कट काहीसे टोकदार असून वरचा जबडा पुढे आलेला असतो. तोंडाची फट खालच्या बाजूला व डोळ्यांपर्यंत खोलवर गेलेली असते. मुख रुंद व तिरपे असून जिभेवर व तालूवर बारीक दात असतात. शरीरावर लहान खवले असतात. डोक्यावर अजिबात खवले नसतात. शरीराचा रंग सोनेरी पिवळा व चमकदार असून खालच्या अर्ध्या बाजूवर काळसर चकचकीत ठिपक्यांच्या दोन ते तीन रांगा असतात. पृष्ठपर लहान असून तो शेपटीपर्यंत गेलेला असतो. गुदपर मागच्या बाजूला वाढून पुच्छपराला मिळालेला असतो. शेपटी टोकदार व लांब असून पुच्छपर दोन खंडांमध्ये विभागलेला असतो. मांदेलीचे शरीर अर्धपारदर्शक असते. ते झुंडीने आढळतात.

मांदेली मासे वर्षभर उपलब्ध असतात. त्यांच्या मांसात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ते ताजे, वाळवून, तसेच खारवून खातात.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा