मानवाचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील होमिनिडी कुलात करण्यात येतो. या कुलात लुप्त पूर्वगामी आणि आधुनिक मानवाचा समावेश होतो. मानवाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात येते; सृष्टी: प्राणी, संघ: रज्जुमान, उपसंघ: पृष्ठवंशी, विभाग: जंभयुक्त, अधिवर्ग: चतुष्पाद, वर्ग: स्तनी, उपवर्ग: अपरास्तनी, गण: नरवानर, उपगण: मानवीय, श्रेणी: कॅटॅऱ्हिनी, कुल: मानव (होमिनिडी), प्रजाती: होमो, जाती: सेपिएन्स. मानवाचे शास्त्रीय नाव होमो सेपिएन्स असून त्याचा लॅटिन भाषेतील अर्थ होमो म्हणजे मानव आणि सेपियन म्हणजे बुद्धिवान असा होतो.

मानव हा भूचर, द्विपाद म्हणजे दोन पायांवर ताठ उभा राहणारा असून पृथ्वीवर तो सर्वत्र आढळतो. तो अतिउष्ण ते अतिशीत प्रदेशांतही वावरतो. मानवाचे अतिखुजा तसेच अतिउंच असे दोन्ही प्रकार असले तरी सर्वसाधारणपणे सरासरी उंची सु. १·८ मी. असते. प्रौढ मानवाचे सरासरी वजन स्रियांमध्ये ५४–६४ किग्रॅ. आणि पुरुषांमध्ये ७६–८३ किग्रॅ. असते. उंची व वजन हे वय आणि लिंग यानुसार बदलत असते. मानवाचा आयु:काल सर्वसाधारणपणे ४० वर्षांपासून ७० वर्षांपर्यंत असतो. मानवाच्या शरीराचे डोके, मान आणि धड असे तीन भाग असतात. डोक्याचे आकारमान इतर नरवानर प्राण्यांपेक्षा मोठे असते. कवटीचे छिद्र (बृहदंध्र) कवटीच्या तळाशी मध्यभागी अथवा मध्याच्या थोडे पुढे असते. त्यामुळे डोके नीट व्यवस्थित तोलले जाते व नजर समांतर राहायला मदत होते. चेहरा उंचीने कमी असून त्याच्या तुलनेने दोन डोळ्यांमधील अंतर जास्त असते. नाकाचा आकार लांबट असून नाकाची कमान चेहऱ्याच्यावर बाहेर स्पष्ट दिसते. हनुवटी व्यवस्थित दिसते. डोक्यावर बाजूला दोन बाह्यकर्ण असतात. डोके आणि चेहरा यांवर केसांचे प्रमाण जास्त असते. नाकाखाली मुख असून ते वरच्या आणि खालच्या ओठांनी वेढलेले असते. डोके आणि धड यांच्यामध्ये मान असते व ती १८० अंशात वळविता येते. मानेची लांबी कमी-जास्त असते, परंतु मणक्यांची संख्या सातच असते. धडाचे वक्ष आणि उदर असे दोन भाग असून त्यात अनुक्रमे वक्षपोकळी आणि उदरपोकळी असते. या दोन पाकळ्यांमध्ये स्नायूंचा आडवा पडदा असतो, त्याला ‘मध्यपटल’ म्हणतात. धडाला हातांची व पायांची प्रत्येकी एक जोडी असते. हातापेक्षा पाय अधिक लांब असतात. हाताचे पंजे आणि बोटे सपाट असतात. हाताच्या बोटांची अवस्था परिग्राही असल्यामुळे अंगठा आणि इतर चार बोटे एकत्र करून जुळवून वस्तू पकडता व उचलता येतात. त्यामुळेच मानवाने हत्यारे बनविली व स्वत:ला उपयोगी येतील अशी साधने बनविली. मानवाव्यतिरिक्त चिंपँझी व गोरिला या कपींमध्ये बोटांची परिग्राही अवस्था दिसून येते. त्यामुळे त्यांनाही साधने बनविणे शक्य झाले. मानवाच्या पायाचे तळवे पुढून पाठीमागे व एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे बाकदार होत गेलेले असतात. हात आणि पाय यांच्या बोटांवर नखे असतात. शरीरावर केसांचे आवरण असले, तरी इतर नरवानर प्राण्यांच्या तुलनेत ते विरळ असतात. त्वचेमध्ये स्वेदग्रंथी, तैलग्रंथी आणि स्तनग्रंथी असतात. स्तनग्रंथीची एक जोडी असून ती वक्षीय भागात असते.

मानवाच्या शरीरात सर्वच संस्था विकसित झालेल्या आहेत. पचनसंस्थेत पचनमार्ग, यकृत, स्वादुपिंड व लाळग्रंथी यांसारख्या पचनग्रंथी असतात. मुखपोकळीत खालच्या आणि वरच्या जबड्यावर मिळून ३२ दात असून त्यांचे दोन बाजूस सममित दंतसूत्र २, १, २, ३ असे असते. पचनसंस्था मिश्र आहारासाठी अनुकुलित झालेली असते. मानव सर्वभक्षी व मिश्राहारी असून परिसरात उपलब्ध होणाऱ्या अन्नावर तो उपजीविका करतो. स्वत:च्या प्रयत्नाने तो शेती कृषिउत्पादने घेत असल्यामुळे विविध प्रकारचे अन्न त्याच्या आहारात असते. श्वसनसंस्थेत दोन फुप्फुसे असतात. मानव नियततापी म्हणजे उष्ण रक्ताचा असून शरीराचे तापमान सर्वसाधारणपणे ३७·५° से. असते. हृदय चार कप्प्यांचे असून दोन अलिंदे व दोन निलये असतात. हृदयाचे दर मिनिटाला साधारण ७२ ठोके पडतात. मानवाच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये पेशीकेंद्रक नसते. उत्सर्जनसंस्थेत दोन वृक्के असतात. वृक्के, फुप्फुसे आणि त्वचा यांच्याद्वारे उत्सर्जन आणि परासरण अशी दोन्ही कार्ये घडून येतात.

अंत:कंकाल म्हणजे शरीराचा सांगाडा अस्थि आणि कास्थि यांपासून बनलेला असतो. मनुष्याच्या बाल्यावस्थेत शरीरात २७० हाडे, तर प्रौढावस्थेत २०६ हाडे असतात. पाठीचा कणा इंग्रजी ‘S’ अक्षरासारखा असतो. अंत:कंकालामुळे शरीराला विशिष्ट आकार येतो आणि हृदय, फुफ्फुसे इ.चे संरक्षण होते. कंकाल स्नायू हाडांना जोडलेले असतात. त्यांचे नियंत्रण मध्यवर्ती चेतासंस्थेमार्फत होते. चालणे, पळणे, चढणे, पोहणे इ. विविध हालचाली या स्नायूंद्वारे करता येतात. पाठीच्या भागातील आणि श्रोणी भागातील स्नायू जास्त मजबूत व ताकदवान असतात. हे स्नायू चालताना शरीर पुढे ढकलतात आणि एकामागून एक पाऊले टाकत असताना शरीराचा तोल व्यवस्थित सांभाळतात. शरीराचा गुरुत्वमध्य श्रोणी भाग, गुडघा व पावलांमधून लंबरूप जात असल्याने मानव दोन पायांवर नीट व वेगाने चालू शकतो.

मानवात लैंगिक द्विरूपता ठळकपणे दिसून येते. बाह्य प्रजनन इंद्रियांवरून स्त्री आणि पुरुष वेगवेगळे ओळखता येतात आणि हे बदल स्त्री-पुरुषांमध्ये स्रवलेल्या संप्रेरकांमुळे होतात. स्रियांमध्ये इस्ट्रोजेन हे संप्रेरक स्रवले जाते, तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन संप्रेरक स्रवले जाते. पुरुषांमध्ये वृषणांची एक जोडी असून ती वृषणकोशांमध्ये असते. शिस्न एकच असून वृषणकोश आणि शिस्न लोंबती असतात. स्त्रियांमध्ये स्तनग्रंथी जास्त वाढलेल्या असतात. पौगंडावस्थेत स्त्री व पुरुषांमध्ये लैंगिक उपलक्षणे दिसून येतात. प्रजननसंस्था पूर्णपणे विकसित असून त्यांच्यात आंतरफलन घडून येते. स्त्रियांमध्ये मासिक चक्र २८ दिवसांचे असते. मासिक चक्रात रक्तस्राव होतो. सामान्यपणे एका वेळी एकच गर्भधारणा होते. गर्भावधी नऊ महिने नऊ दिवसांचा असतो. गर्भाच्या वाढीसाठी पोषक अशी रचना नाळेच्या रूपात असते. नाळ अर्थात वार ही गर्भ आणि अपरा यांना जोडलेली असते. गर्भावधी मोठा असल्यामुळे अर्भक प्रगत अवस्थेत जन्माला येते. प्रसूतीनंतर स्तनांमध्ये दूधनिर्मिती होते. मातेचे दूध नवजात अर्भकाच्या वाढीसाठी उपयोगी असते.

शरीरातील निरनिराळ्या क्रियांचे नियमन चेतासंस्था आणि अंत:स्रावी ग्रंथी संस्था यांद्वारे घडून येते. मानवी शरीरात पियुषिका, तृतीय नेत्रपिंड, अवटू, परावटू, यौवनलोपी, स्वादुपिंड, अधिवृक्क, वृषण, अंडाशय, अध:श्चेतक या अंत:स्रावी ग्रंथी असतात. चेतासंस्था पूर्णपणे विकसित असून तिचे मध्यवर्ती, परिघीय आणि स्वायत्त असे तीन विभाग केले जातात. सर्व प्राण्यांमध्ये मानवी मेंदूचे आकारमान जास्त असून निरनिराळ्या कार्यात्मक क्रियांसाठी जबाबदार असणाऱ्या मेंदूच्या भागांचाही विकास झालेला असतो. मानवी शरीरात नाक, कान, त्वचा, जीभ आणि डोळे अशी ज्ञानेंद्रिये असतात. जीभ ही ऐच्छिक स्नायूंची बनलेली असते. त्यामुळे वाचाशक्ती हे मानवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जीभ आणि दात यांच्या साहाय्याने शब्दोच्चार स्पष्ट व सुलभ करता येतात. मानवाचे डोळे मोठे असून दृष्टी त्रिमितीय असते. त्रिमितीय दृष्टीमुळे एखाद्या ठिकाणच्या खोलीची व्याप्ती समजते. मेंदू आणि ज्ञानेंद्रियांमुळे मानव अधिक समृद्ध झाला असून इतर सर्व प्राण्यांपेक्षा मानवाचे वेगळेपण दिसून आले आहे.

मानवी पेशीत द्विगुणीत गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात. या गुणसूत्रांवरील जनुकांची एकत्रित संख्या सु. ३०,००० असते. मानवाच्या वेगळेपणात या जनुकांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मानव आणि चिपँझी यांच्यात ९८ % जनुके एकच आहेत. त्यामुळे चिपँझी व गोरिला यांना मानवाचे सर्वांत जवळचे नातेवार्इक मानले जातात. मानवाचे जीवाश्म इतर सजीवांच्या तुलनेने क्वचित आणि तेही विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. त्यामुळे मानवाचा क्रमविकास निश्चितपणे ठरविता येत नाही. परंतु या क्रमविकासाचे टप्पे ओळखता आले आहेत.

मानव समाजप्रिय आहे. त्याचा विकसित मेंदू, भाषा, लिपी आणि परस्परसंपर्क यांमुळे मानवी संस्कृती निर्माण झाली. एकत्र राहणे, कुटुंबसंस्था, शेती यांमुळे मानवाचे समुदाय तयार झाले आणि मानवी समाज निर्माण होऊन मानव समाजप्रिय झाला. वस्तूंचा संग्रह करणे, कुटुंबाचे रक्षण करणे आणि समाजप्रियता असे मानवाचे गुणधर्म इतर प्राण्यांमध्ये विकसित झाले नाहीत, तर मधमाश्या, मुंग्या, वाळवी या कीटकांतील सुसामाजिकता जनुकीय पातळीवर मानवात विकसित झालेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा