दोडका (लुफा ॲक्युटँगुला): फुले व फळांसह‍ित वेल

दोडका ही वेल कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा ॲक्युटँगुला आहे. ही वनस्पती मूळची भारतातील असून आशिया खंडातील अनेक देशांत तिची लागवड करतात. भारतात दोडक्याची व्यापारी लागवड भाजीसाठी म्हणजे कच्च्या फळांसाठी करतात. घोसाळे आणि दोडका या वनस्पती एकाच प्रजातीतील (लुफा) आहेत. महाराष्ट्रात दोडक्याला काही ठिकाणी शिराळे असेही म्हणतात.

दोडक्याचे फळ

दोडक्याची वेल आधाराने व तणावाच्या साहाय्याने वर चढते. खोड केसाळ असते. पाने साधी व एकाआड एक असून ती ५–७ खंडांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पानांच्या बगलेत येत असून नरफुले आणि मादीफुले एकाच वेलीवर येतात. नरफुले फुलोऱ्यात येतात तर मादीफुले एकेकटी येतात. फळ साधारणपणे १५–३० सेंमी. लांब, देठाकडे निमुळते व शेंड्याकडे फुगीर असते. फळावर दहा उभे व टणक कंगोरे (शिरा) असतात. बिया चपट्या, लांबट, काळ्या व १०–१५ मिमी. असतात. दोडक्याची काही फळे कडूही असतात.

दोडक्याचे फळ भाजीसाठी उपयुक्त आहे. पानांचे पोटीस मूळव्याध व प्लीहादाह यांवर उपयोगी आहे. ताज्या पानांचा रस मुलांच्या डोळे येण्यावर वापरतात. बियांचे तेल व पेंड विषारी असते. पेंड खतासाठी वापरतात. वाळलेली फळे आंघोळ करताना अंग घासण्यासाठी वापरतात.