मानवप्राण्याच्या उगमापासून ते आजपर्यंतच्या सर्व संस्कृतीचा उगम, वर्तन, विकास, रचना, तिचे कार्य इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो; मात्र यात कालखंडाचेच व विशिष्ट मानवसमाजाच्या संस्कृतीचेच अध्ययन करावे असे बंधन नाही. सांस्कृतिक मानवशास्त्रात लुप्त पावलेल्या संस्कृतीसोबतच आधुनिक समाजातील आदिवासी संस्कृती किंवा नागर संस्कृतीचेही अध्ययन करता येते. मानवाचे खरे वैशिष्ट्य त्याच्या आचार-विचारांत जाणवते. संस्कृतीविहीन असा मानव नसतोच. मानवाजवळ काही भौतिक वस्तुरूप उपकरणे असतात. तसेच अन्न मिळविण्याची सोपी व जटिल तंत्रे, श्रमविभाजन, सामाजिक व राजकीय संघटना, धर्मव्यवस्था आणि एकमेकांशी संवाद साधण्याकरिता भाषा अशी सांस्कृतिक सामग्रीही असते. मानवेतर प्राण्यांत ही सांस्कृतिक वैशिष्ट्ये नाहीत. सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती विशाल आहे. त्यात संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचा विचार करण्यात येतो.
संस्कृतीच्या व्याख्येत सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती साठवलेली आहे. संस्कृती म्हणजे मानवसमाजाची जीवन जगण्याची तऱ्हा. यात सर्व उपकरणे, आचार-विचार, नीतिमूल्ये, धार्मिक निष्ठा, अंधश्रद्धा इत्यादींचा अंतर्भाव होतो. समाजाचे घटक म्हणून राहण्याकरिता जे जे मानव शिकतो, ती संस्कृती. आपण जे जीवन जगतो, त्यातील अधिकांश भौतिक वस्तुरूप उपकरणे व आचार-विचार आपणास जनक पिढीने दिलेले असतात. ही क्रिया अनादिकाळापासून चालू आहे. प्रत्येक पिढीबरोबर, संस्कृतीत थोडा बदल होत असतो. या सर्व क्रियांचा विचार सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो.
संस्कृती मानवप्राण्याचे वैशिष्ट्य आहे. केवळ मानवालाच भाषा असते. मानव सतत उपकरणांचा उपयोग करीत असतो व आपल्या सहवासातील मानवाला आणि दुसऱ्या पिढीस संचित ज्ञान व अनुभवाचा वारसा देत असतो. मानवाच्या विशिष्ट प्रकारच्या शरीरविकासामुळेच संस्कृतीचा उगम होऊ शकला, हे आता सर्वमान्य झाले आहे.
मानवसंस्कृतीचा आविष्कार प्रत्यक्षात वेगवेगळ्या मानवसमूहांच्या वेगवेगळ्या संस्कृतींत पहावयास मिळतो. भिन्न मानवसमाजांची संस्कृती वेगवेगळी असते. आचार, विचार, भावना, मूल्ये, कल्पना, भाषा इत्यादी सर्व स्वतंत्र असते. इतकेच नव्हे, तर प्रत्येक समाजात या घटकांचे परस्परसंबंधही वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक संस्कृती एकात्मक, स्वतंत्र व पूर्ण असते.
मानवसमाजातील वेगवेगळ्या संस्कृतींमधील साम्य व फरकांचा तौलनिक अभ्यास करून त्या अनुषंगाने मानवाच्या स्वभावविषयक सिद्धांताची मांडणी करणे, सांस्कृतिक मानवशास्त्राचे मुख्य ध्येय असते. भिन्न संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करणे, त्यांच्या स्थिरतेचा, विकासाचा व परिवर्तनाचा आढावा घेणे हे सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांचे कार्यक्षेत्र आहे. मानवाच्या प्राणिभूत गरजांची पूर्ती, तसेच इतर मानवी गरजांची (धर्म, मनोरंजन, कला, संगीत, साहित्य इत्यादी) पूर्ती भिन्न समाजांत भिन्न प्रकारे केली जाते. थोडक्यात याची मांडणी अशी, (१) मानवी संस्कृतीचा विकास कसा झाला व तिच्यात कशी भिन्नता आढळते? (२) आचार-विचारांच्या भिन्नतेत कोणते घटक स्थिर अथवा सर्वव्यापी असतात? (३) सांस्कृतिक व्यवस्थेचे स्वरूप कसे असते? (४) सांस्कृतिक क्रियांचे नियंत्रण अथवा त्यांबाबत भाकित वर्तविता येते का?
सांस्कृतिक मानवशास्त्रात आदिवासी लोकांची संस्कृती, तसेच आधुनिक, प्रगत समजल्या जाणाऱ्या जटिल राष्ट्र–संस्कृतीचाही अभ्यास अंतर्भूत आहे. तसेच मानवाच्या विवेकयुक्त, अविवेकी व विवेकातील वर्तनाचा विचारही यात केला जातो. यात डोळ्यांना दिसणारी उपकरणे (भौतिक संस्कृती), धर्मश्रद्धा, अंधश्रद्धा इत्यादींचा समावेश होतो. संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचा अभ्यास यात केला जातो. त्यानुसार निसर्गापासून संपत्ती उत्पन्न करण्याची तंत्रे व उपकरणे, अर्थव्यवस्था, मानवांचे परस्पर सामाजिक संबंध, धर्म, भाषा, कला इत्यादी विषयक विचार अभिप्रेत आहेत. या वेगवेगळ्या उपांगांच्या कार्याची जशी चर्चा होते, तद्वतच या अंगाच्या परस्परसंबंधांबाबत चर्चाही महत्त्वाची असते; कारण संस्कृतीच्या विविध उपांगांचे संबंध परस्परावलंबित्वाचे असतात. धर्माचा आर्थिक व्यवहाराशी, सामाजिक गटांशी तसेच कलेशी संबंध असतो. भारतीय जातिसंस्थेचा हिंदू धर्मसंकल्पनांशी निकटचा संबंध आहे व त्याचा आर्थिक व्यवहारांवरही परिणाम होतो. तसेच भारतातील कला व संगीताचा धर्माशी व देवदेवतांशी संबंध दाखविता येतो. मानवशास्त्रज्ञास अध्ययनासाठी जितके शास्त्रीय शोध महत्त्वाचे वाटतात, तितकेच खेड्यातील रोजचे जीवनही महत्त्वाचे वाटते. सांस्कृतिक मानवशास्त्राच्या कक्षेत उच्चभ्रू नेते बसतात, तसेच खेड्यातील सामान्य शेतकरीही असतात. सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती सर्वांगीण आहे.
संस्कृतीच्या एका उपांगाचे अध्ययन करण्यासाठी इतर उपांगांचाही विचार करावा लागतो. संस्कृती पूर्ण व एकात्मिक असते. तिचे वेगवेगळे भाग एकमेकांशी निगडित असतात. एकाचा विचार करताना दुसऱ्या भागाचा विचार करावा लागतो. भारतातील शेती व्यवस्थेचा अभ्यास करण्यास धार्मिक बाबीही लक्षात घ्यावयास हव्यात. शेतीतील वेगवेगळ्या कामात, जसे वखरणी, पेरणी, डवरणी, कापणी इत्यादी वेळी नानाविध संस्कार केले जातात. उदा., शेतजमिनीची पूजा, शेतीच्या औजारांची पूजा, गाई−बैलांची पूजा, नवरात्रात देवीच्या घटाची स्थापना इत्यादी गोष्टी धर्म व आर्थिक व्यवहारांची जवळीक दाखवितात. या पद्धतीनुसार संस्कृतीच्या कोणत्याही एका उपांगाचे अध्ययन करावयाचे झाल्यास संस्कृतीची एकात्मता दृष्टिआड करून चालणार नाही. सांस्कृतिक मानवशास्त्रातील या अभ्यासपद्धतीमुळे प्राचीन व अर्वाचीन संस्कृतींचे संशोधन सुकर व शास्त्रीय झाले आहे.
मानवशास्त्रज्ञ क्षेत्रीय अभ्यासासाठी समाजात कित्येक आठवडे वा महिने राहतो. लोकांच्या जीवनात सहभागी होऊन निरीक्षणही करत असतो. या पद्धतीस सहभागी–निरीक्षण पद्धती म्हणतात. मानवशास्त्रज्ञ त्या लोकांची भाषा शिकतो. जमल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनात सहभागी होऊन त्यांच्याबरोबर स्नान, जेवण, खेळ, नृत्य, शिकार इत्यादी करतो आणि त्यांची प्रत्यक्ष माहिती गोळा करतो. एकदा लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या अनौपचारिक मुलाखती घेतो. या क्षेत्र अभ्यासपद्धतीमुळे शास्त्रज्ञास संस्कृतीच्या सर्व उपांगांचे ज्ञान मिळते. त्यास मानवाचे नैसर्गिक वर्तन, आचार-विचार पाहावयास मिळतात. आधारसामग्री सत्यस्थितीतून गोळा करता येते. त्रयस्थ माणसाला संस्कृतीबद्दल काय वाटेल व त्या समाजाच्या घटकांना काय वाटते, हे दोन्ही दृष्टिकोण शास्त्रज्ञास विचारात घेताना आपले पूर्वग्रह वा कल बाजूस ठेवावे लागतात.
क्षेत्र अभ्यासपद्धतीत इतर अनेक पद्धतींचा समावेश असतो. समाजशास्त्रीय, शिरगणती, छायाचित्रे, नकाशे, वंशवृक्ष, जीवन–वृत्तांत अभिलेख इत्यादी सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग वाढला आहे. प्रश्नावली पद्धत, नमुना प्रतिदर्श पद्धत हे त्यातलेच काही प्रकार होत; परंतु या पद्धतींमुळे आधारसामग्री गोळा झाली, तरी त्यांतला गुणात्मक अंश नष्ट होण्याची भीती असते. मानवशास्त्रातील शारीर व प्राबंधिक अभिबोधन कसोट्यांचाही उपयोग अलीकडे करण्यात येऊ लागला आहे. उत्खननात मिळालेल्या अवशेषांद्वारे प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करता येतो. त्याच प्रमाणे सांस्कृतिक मानवशास्त्रात वेगवेगळ्या प्रदेशांतील ग्रामिण लोकांचा, वेगवेगळ्या गावांतील संघटनांचा तौलोनिक पद्धतीद्वारे अभ्यास करून मानवसमाज व संस्कृतीत स्तरीकरणविषयक काही सिद्धांत मांडले जातात.
सांस्कृतिक मानवशास्त्रातील तत्त्वांच्या विकासास एक विशेष स्वरूप आहे. उत्खननांत मिळालेल्या भौतिक साहित्यांवरून उपकरणांवरून प्राचीन संस्कृतीबाबत काही निष्कर्ष काढतात. लोकांचे जीवन जवळून बघून सांस्कृतिक तत्त्वे मांडली जातात. इतर शास्त्रांप्रमाणेच सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांनीही क्षेत्रकार्यात कोणते प्रश्न विचारायचे, नेमके कशाकशाचे निरीक्षण करायचे, कोणती आधारसामग्री गोळा करायची यांबाबत काही मार्गदर्शक संकेत असतात; परंतु इतर सामाजिक विज्ञानांप्रमाणे मानवशास्त्रात सिद्धांतकल्प मांडून त्यास सिद्ध करण्याकरिता अथवा चुकीचे ठरविण्याकरिता क्षेत्रकार्य–संशोधन तितकेसे हिरीरीने करत नाहीत. मानवशास्त्रज्ञ सर्वसाधारणतः लहान समाजांचे अध्ययन करतात. लहान समाजात संस्कृतीची भिन्न भिन्न अंगे जास्त परस्परावलंबी असतात व संस्कृतीत जास्त एकसूत्री तत्त्व असते. त्याकरिता मानवशास्त्रज्ञ त्या संस्कृतीतील शक्य तेवढी उपलब्ध आधारसामुग्री गोळा करतो व नंतर सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतो. विश्लेषणाकरिता जे विषय निवडले जातात, ते त्या वेळच्या परिस्थितीनुसार वा अभ्यासलेल्या समाजाच्या समस्यांवरून ठरविले जातात. सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ संकल्पनेवर प्रकाश टाकण्याकरिता आधारसामुग्री गोळा करत नाही, तर लोकांचे जीवन समजण्याकरिता संकल्पनांची जुळवाजुळव करतो, त्यांची आखणी करतो, त्यांचा उपयोग करतो. जुनी संकल्पना स्पष्ट नसेल, तर नवीन संकल्पनांची मांडणी केली जाते.
सांस्कृतिक मानवशास्त्रात मानवतावादी दृष्टिकोण अभिप्रेत असतो. शास्त्रज्ञ हा सहभागी निरीक्षक असल्यामुळे त्यास लोकांच्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होतो. तसेच शास्त्रीय अलिप्ततेमुळे त्यास मध्यस्थिच्या भूमिकेतूनही संस्कृतीचे निरीक्षण करता येते. त्यामुळे मानवशास्त्रज्ञाच्या समाजविषयक लेखनात मानवतावादी व शास्त्रीय दृष्टिकोणांचा संगम झालेला आढळतो. वस्तुनिष्ठता व समरसता यांत समतोल राखावयास हवा. लोकांशी जास्त समरस झाल्यास अध्ययन शास्त्रीय न होता एकांगी होते. जास्त वस्तुनिष्ठ राहिल्यास समाजाचे अंतरंग समजण्यास अडचण होते व सत्य कळत नाही.
समीक्षक – संतोष ग्या. गेडाम