सोलॅनसी कुलातील दतुरा प्रजातीतील नऊ वनस्पतींना सामान्यपणे धोतरा म्हटले जाते. या सर्व वनस्पती विषारी आहेत. या वनस्पतींचा प्रसार जगभरातील सर्व उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत झालेला आहे. भारतात काळा धोतरा (दतुरा मेटल) आणि पांढरा धोतरा (दतुरा स्ट्रॅमोनियम) या जाती विशेषकरून दिसून येतात.
पांढरा धोतरा हे झुडूप १–१.५ मी.पर्यंत उंच वाढते. फांद्या विभाजित व थोड्याशा नागमोडी असतात. पाने फिकट हिरवी, मऊ, अनियमित तरंगित व किंचित दंतूर असतात. त्यांवर लव असून शिराविन्यास जाळीदार असतो. फुले सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत येतात आणि संध्याकाळी उमलतात. ती पांढरी, कर्ण्याच्या आकाराची व ६-२० सेंमी. लांब असून तिला पाच त्रिकोणाकृती खंडीत पाकळ्या असतात. फळ गोल बोंडासारखे असून ते सरळ व तीक्ष्ण काट्यांनी आच्छादिलेले असते. फळात अनेक लहान गडद बिया असतात.
धोतऱ्याच्या सर्व जातींच्या बियांमध्ये आणि फुलांमध्ये स्कोपोलामीन हे प्रमुख अल्कलॉइड असून हायोसायमीन व ॲट्रोपीन ही इतर अल्कलॉइडे असतात. ही संयुगे विषारी व उत्तेजक असतात. वेगवेगळ्या जातीच्या वनस्पतींमध्ये या अल्कलॉइडांचे प्रमाण कमी-जास्त असते. पांढऱ्या धोतऱ्यात हायोसायमीन अधिक प्रमाणात असते. दम्यावर, आकडीवर व वेदनांवर स्ट्रॅमोनियम उपयुक्त असते. औषधांमध्ये त्याचा वापर करतात. मूळव्याधीवर लावण्याच्या मलमात ते वापरतात. डोळे दुखणे, नाकाचा त्रास व केसतूट यांवर पाने गरम करून लावतात. बिया मादक, ज्वरनाशक व कृमिनाशक आहेत. त्या चुकून खाल्ल्यास डोके दुखते व उलटी होते. धोतऱ्याची मात्रा अधिक प्रमाणात सेवन केल्यास मृत्यूही ओढावतो.