आयुर्वेदानुसार शरीरातील सात धातूंपैकी हा शेवटचा धातू. आहारापासून सर्वप्रथम रसधातूची व यानंतर क्रमाक्रमाने पुढील धातूंची निर्मिती होते. यानुसार अस्थिधातूपासून शुक्रधातूची निर्मिती होते. पांढऱ्या रंगामुळे या धातूला शुक्र असे म्हटले जाते. शुक्रधातू हा सर्व धातूंचे सार स्वरूप असल्याने इतर धातूंप्रमाणे याचे मल अथवा उपधातू नाहीत. रसधातू ते शुक्रधातू पर्यंतचा निर्मितीचा काळ तीस दिवसांचा असतो.

आयुर्वेदाने शुक्रधातूचे दोन प्रकारे वर्णन केले आहे. पहिल्या प्रकारचा शुक्रधातू हा संतानोत्पत्तीसाठी कारणीभूत असून तो पुरुषांमध्येच असतो. हा स्फटिकाप्रमाणे वर्ण असलेला, स्निग्ध, पातळसर, चवीला गोड आणि मधाप्रमाणे गंध असणारा असतो. प्रत्येक धातूची वाहण्याची व्यवस्था असते त्याला स्रोतस असे म्हणतात. त्याची मूलस्थानेही आयुर्वेदाने सांगितली आहेत. शुक्रवह स्रोतसाचे मूलस्थान वृषण (अंडकोश) म्हणजे पुरुष जननेंद्रिय हे सांगितले आहे. दुसऱ्या प्रकारचा शुक्रधातू सर्व शरीरभर असतो. मनामध्ये धैर्य, प्रसन्नता, आनंद उत्पन्न करणे आणि शारीरिक बल उत्तम राखणे हे या शुक्रधातूचे कार्य आहे. हा शुक्रधातू पुरुषांप्रमाणे स्त्री शरीरामध्येदेखील असतो, परंतु हा गर्भनिर्मिती करण्यास सक्षम नसतो. पुरुषांमध्ये मात्र संपूर्ण शरीरात व्याप्त शुक्रधातू समागमाच्या वेळी अत्युच्च आनंदाच्या क्षणी पुरुषाच्या जननेंद्रियातून बाहेर पडतो आणि गर्भनिर्मितीसाठी कारणीभूत ठरतो.

ज्या स्त्री अथवा पुरुषामध्ये शुक्रधातू उत्तम असतो, त्याला शुक्रसार पुरुष म्हणतात. अस्थि तसेच दात स्निग्ध व संहत म्हणजे सुसंघटित असणे, कामेच्छा प्रबळ असणे आणि भरपूर संतती असणे ही शुक्रसार पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. चिंता, दीर्घकाळ आजारी असणे, खूप शारीरिक कष्ट करणे, अतिप्रमाणात मैथुन करणे आणि वार्धक्य यांमुळे शुक्रधातूचा क्षय होतो. शुक्रधातूचा क्षय झाल्यास वृषण प्रदेशात पीडा म्हणजे दुखणे, मैथुन करण्यास असमर्थता, तोंड कोरडे पडणे, थकवा येणे ही लक्षणे उत्पन्न होतात.

स्वस्थ व्यक्तीमध्ये शुक्रधातूचे प्रमाण अर्धी ओंजळ म्हणजे अंदाजे ९६ मिलि. सांगितले आहे.

पहा : दोषधातुमलविज्ञान, धातु-२, मज्जाधातु.

संदर्भ : 

  • अमरकोष २।६।६२.   
  • सुश्रुत संहिता–सूत्रस्थान, अध्याय ४ श्लोक १०; अध्याय १४ श्लोक १४, १५; अध्याय १५ श्लोक ९; अध्याय ३५ श्लोक १३.
  • सुश्रुत संहिता–शारीरस्थान, अध्याय २ श्लोक ११; अध्याय ४ श्लोक २०.
  • चरक संहिता –चिकित्सास्थान, अध्याय २ श्लोक ४३; अध्याय ५ श्लोक १०; अध्याय १५ श्लोक १६.
  • चरकसंहिता –शारीरस्थान, अध्याय ७ श्लोक १०.

समीक्षक – जयंत देवपुजारी